नीतिसूत्रे 19
19
1ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे, त्याच्यापेक्षा सात्त्विकपणे चालणारा दरिद्री बरा.
2आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही; उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो.
3मनुष्याची मूर्खता त्याला मार्गभ्रष्ट करते, आणि त्याचे मन परमेश्वरावर रुष्ट होते.
4संपत्ती मित्र जोडते, गरिबाला मित्र सोडतात.
5खोटी साक्ष देणार्याला शिक्षा चुकणार नाही; लबाड बोलणारा सुटणार नाही.
6थोर मनुष्याची बहुत लोक हांजीहांजी करतात; दानशूराचा प्रत्येक जण मित्र असतो.
7दरिद्र्याचे सर्व भाऊ त्याचा द्वेष करतात; मग त्याचे मित्र त्याला सोडून जातात ह्यात नवल ते काय? त्यांनी आपल्याशी बोलावे म्हणून तो त्यांच्या मागून जातो, परंतु ते निघून जातात.
8जो ज्ञान संपादन करतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो; ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याचे कल्याण होते.
9खोटी साक्ष देणार्याला शिक्षा चुकणार नाही, लबाड बोलणारा नष्ट होईल.
10ऐशआराम मूर्खाला शोभत नाही; सरदारांवर दासाने सत्ता करावी हे त्याला कसे शोभणार?
11विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.
12राजाचा कोप सिंहाच्या गर्जनेसारखा आहे; त्याची प्रसन्नता गवतावर पडलेल्या दहिवरासारखी आहे.
13मूर्ख मुलगा आपल्या बापाला अरिष्टाप्रमाणे आहे; बायकोच्या कटकटी सतत गळणार्या ठिपक्यांप्रमाणे आहेत.
14घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग होत; सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते.
15आळस घोर निद्रेत लोटतो; रिकामा फिरणारा उपाशी मरतो.
16जो आज्ञा पाळतो तो आपले प्राण रक्षतो; जो आपल्या वर्तनाविषयी बेपर्वा असतो तो मरेल.
17जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्यांची फेड परमेश्वर करील.
18काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर; त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नकोस,
19क्रोधिष्ट मनुष्याने आपला दंड भोगला पाहिजे, कारण त्याला एकदा दंडमुक्त केले तर तसे पुनःपुन्हा करावे लागेल.
20सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील.
21मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते.
22मनुष्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा असते; लबाडापेक्षा दरिद्री बरा.
23परमेश्वराचे भय जीवनप्राप्तीचा मार्ग होय; जो ते धरतो तो सुखाने नांदतो. त्याचे वाईट होणार नाही.
24आळशी एकदा आपला हात ताटात घालतो, तो पुन्हा तोंडाकडे वर नेत नाही.
25निंदकाला ताडन कर म्हणजे भोळा शहाणपणा शिकेल. समंजसाला वाग्दंड कर म्हणजे त्याला कळेल.
26जो आपल्या बापाशी दंडेली करतो व आपल्या आईला हाकून लावतो, तो लज्जा व अप्रतिष्ठा आणणारा मुलगा होय.
27माझ्या मुला, ज्ञानाची वचने सोडून भटकायचे असले तर शिक्षण घेणे सोडून दे.
28अधम साक्षी न्यायाची विटंबना करतो; दुर्जनांचे मुख अन्याय गिळते.
29निंदकांसाठी दंड, व मूर्खास पाठीसाठी फटके सिद्ध केले आहेत.
Currently Selected:
नीतिसूत्रे 19: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.