YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 30

30
आगूराचे स्वानुभवाचे बोल
1याकेचा पुत्र आगूर ह्याची वचने म्हणजे देववाणी आहे. त्या पुरुषाने इथीएलाला व इथीएलाने उकालाला म्हटले, हे देवा, मी स्वत: कष्टी आहे; हे देवा, मी स्वत:ला कष्ट दिले आहेत, मी क्षीण झालो आहे;
2मला मनुष्य म्हणू नये इतका मी मूढ आहे, मनुष्यात समज असतो तो माझ्यात नाही.
3परमपवित्राचे ज्ञान मला व्हावे इतके सुज्ञान मी शिकलो नाही.
4आकाशात चढून कोण उतरला आहे? वायू आपल्या ओंजळीत कोणी धरून ठेवला आहे? जलाशय वस्त्रात कोणी बांधून ठेवला आहे? पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापल्या आहेत? त्याचे नाव काय? त्याच्या पुत्राचे नाव काय? तुला ठाऊक असल्यास सांग.
5ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे; त्याचा आश्रय करणार्‍यांची तो ढाल आहे.
6त्याच्या वचनांत तू काही भर घालू नकोस, घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील.
7मी तुझ्याजवळ दोन वर मागतो; मी मरण्यापूर्वी ते मला दे, नाही म्हणू नकोस;
8व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख; दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस; मला आवश्यक तेवढे अन्न खायला दे.
9माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन, आणि “परमेश्वर कोण आहे?” असे म्हणेन; मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन, आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन.
10चाकराची चुगली त्याच्या धन्याजवळ करू नकोस; करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील.
11बापाला शाप देणारा व “तुला आशीर्वाद प्राप्त होवो” असे आईला न म्हणणारा अशा लोकांचा एक वर्ग आहे.
12आपला मळ धुतलेला नसता आपल्या मते स्वतःला शुद्ध समजणारा असा एक वर्ग आहे.
13ज्याची दृष्टी कितीतरी उंच, व ज्याच्या पापण्या वर चढलेल्या आहेत असा एक वर्ग आहे.
14पृथ्वीवरून गरीब व मनुष्यांपैकी कंगाल ह्यांना खाऊन नाहीतसे करावे, असे तलवारींसारखे ज्यांचे दात व सुर्‍यांसारख्या ज्यांच्या दाढा, असा एक वर्ग आहे.
15जळवेच्या दोन कन्या आहेत, त्या “दे, दे” असे ओरडत असतात; कधी तृप्त होत नाहीत अशा तीन वस्तू आहेत; “पुरे” म्हणून कधी म्हणत नाहीत अशा चार वस्तू आहेत;
16त्या ह्या : अधोलोक, वांझेचे उदर, पाण्याने कधी पोट भरत नाही अशी पृथ्वी, “पुरे” म्हणून कधी न म्हणणारा अग्नी.
17जो डोळा बापाची थट्टा करतो, आईचे ऐकणे तुच्छ मानतो, त्याला खोर्‍यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील, त्याला गिधाडांची पिले खाऊन टाकतील.
18तीन गोष्टी माझ्या समजापलीकडे आहेत, चार मला कळत नाहीत :
19गरुडाचे आकाशात उडणे, सर्पाचे खडकावर सरपटणे, जहाजाचे समुद्रावर चालणे, व पुरुषाचा तरुणीशी संबंध.
20जारिणीचा रिवाज असा असतो : ती खाऊनपिऊन तोंड पुसते, आणि म्हणते, “मी काही दुष्कर्म केले नाही.”
21तीन गोष्टींनी भूमी कंपित होते, चार्‍हींचा भार तिला सहन होत नाही;
22त्या ह्या : राजा झालेला दास, अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख,
23लग्न झालेली त्रासदायक स्त्री, व धनिणीची वारस झालेली दासी.
24लहान व अत्यंत शहाणे असे चार प्राणी पृथ्वीवर आहेत :
25मुंग्या अशक्त कीटक आहेत, तरी उन्हाळ्यात त्या आपले अन्न साठवून ठेवतात.
26ससे हे सशक्त प्राणी नाहीत, तरी ते खडकांत आपली बिळे करतात;
27टोळांना कोणी राजा नाही, तरी ते टोळ्या करून एकदम उडतात.
28पाल हाताने धरता येते; तरी ती राजमहालात असते.
29डौलदार चालणारे तीन प्राणी आहेत, चौघांची चाल सुरेख आहे.
30ते हे : सर्व वनपशूंत बलवान व कोणालाही पाठ न दाखवणारा सिंह;
31कसलेला शिकारी कुत्रा, बोकड व सैन्याबरोबर असलेला राजा.
32तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केलेस, अथवा मनात दुष्कर्म योजलेस; तर तू आपल्या मुखावर हात ठेव.
33दूध घुसळल्याने लोणी निघते नाक पिळल्याने रक्त निघते, तसा राग चेतवल्याने तंटा उपस्थित होतो.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in