YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 27

27
परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे
दाविदाचे स्तोत्र.
1परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू?
2दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच लागून पडले.
3सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही; माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहीन.
4परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन.
5कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील; मला तो आपल्या डेर्‍याच्या गुप्त स्थळी ठेवील; तो मला खडकावर उचलून ठेवील.
6आता सभोवतालच्या माझ्या वैर्‍यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल; त्याच्या डेर्‍यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन. मी गायनवादन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन.
7मी उच्च स्वराने तुझा धावा करत आहे, हे परमेश्वरा, ऐक; माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक.
8“माझे दर्शन घ्या,” असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, “हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे.”
9तू आपले मुख माझ्या दृष्टिआड करू नकोस आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नकोस. तू माझे साहाय्य होत आला आहेस; हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नकोस, मला सोडू नकोस.
10माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करील.
11हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव; लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने.
12माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नकोस. कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे फूत्कार टाकणारे माझ्यावर उठले आहेत.
13ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खातरीने माझे कल्याण करील.
14परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in