YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 49

49
संपत्तीवर भरवसा ठेवण्याचा वेडेपणा
मुख्य गवयासाठी; कोरहाच्या मुलाचे स्तोत्र.
1अहो सर्व लोकहो, हे ऐका; जगात राहणारे उच्च व नीच,
2श्रीमंत व दरिद्री लोकहो, तुम्ही सर्व कान द्या.
3माझे मुख ज्ञान वदणार आहे; माझ्या मनचे विचार सुज्ञतेचे असणार.
4मी दृष्टान्ताकडे कान लावीन; मी वीणेवर गाणी गाऊन गूढवचन उलगडून सांगेन.
5मला फसवणार्‍यांचा दुष्टपणा मला वेढतो; अशा विपत्काली मी का भ्यावे?
6ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, व आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवतात.
7कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करता येत नाही; किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही.
8त्याने सर्वदा जगावे, त्याला कधी गर्तेचा अनुभव घडू नये, म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही;
9कारण त्याच्या जिवाची खंडणी इतकी मोठी आहे की तिची भरपाई करण्याचे नेहमी अपुरेच राहणार.
10कारण तो पाहतो की, ज्ञानी मरतात, तसेच मूढ व पशुतुल्य नष्ट होतात, आणि आपले धन दुसर्‍यांना ठेवून जातात.
11त्यांनी आपल्या जमिनीस आपली नावे दिली; तरी त्यांच्या कबरांच त्यांची कायमची घरे आणि त्यांची पिढ्यानपिढ्यांची वसतिस्थाने होतील.
12मनुष्य प्रतिष्ठा पावला तरी टिकत नाही; तो नश्वर पशूंसारखा आहे.
13जे अभिमानी आहेत त्यांची, व त्यांचे बोलणे ज्यांना पसंत पडते अशा त्यांच्या अनुयायांचीही हीच गत आहे.
(सेला)
14ते मेंढरांच्या कळपासारखे अधोलोकासाठी नेमलेले आहेत; मृत्यू त्यांचा मेंढपाळ आहे; प्रभातकाल झाला म्हणजे नीतिमान त्यांच्यावर प्रभुत्व करतील; त्यांचे देह अधोलोकात क्षय पावतील; त्यांना वस्तीला कोठे थारा राहणार नाही;
15परंतु देव माझा जीव अधोलोकाच्या कबजातून सोडवील; कारण तो मला आपणाजवळ घेईल.
(सेला)
16कोणी मनुष्य धनवान झाला, त्याच्या घरचा डामडौल वाढला तरी तू घाबरू नकोस;
17कारण तो मृत्यू पावेल तेव्हा बरोबर काहीच घेऊन जाणार नाही; त्याचा थाटमाट त्याच्यामागून खाली उतरणार नाही.
18तो जिवंत असता आपल्या जिवाला धन्य समजून म्हणे, “तू आपले बरे करून घेतलेस म्हणजे लोक तुझी स्तुती करतील,”
19तरी तो आपल्या वडिलांच्या पिढीला जाऊन मिळेल; त्यांच्या दृष्टीस प्रकाश कधीच पडणार नाही.
20मनुष्य प्रतिष्ठित असून त्याला अक्कल नसली, तर तो नश्वर पशूंसारखा आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in