स्तोत्रसंहिता 72
72
नीतिमान राजाची कारकीर्द
शलमोनाचे स्तोत्र.
1हे देवा, राजाला आपले न्यायानुशासन आणि राजपुत्राला आपले नीतिमत्त्व दे.
2तो नीतीने तुझ्या लोकांचा न्याय करो, तुझ्या दीनांचा निवाडा न्यायबुद्धीने करो.
3पर्वत व डोंगर नीतीच्या द्वारे लोकांना शांतिदायक होवोत.
4तो प्रजेतल्या दीनांचा न्याय करो. तो दरिद्र्यांच्या मुलाबाळांचे तारण करो, तो जुलूम करणार्यांना चिरडून टाको.
5सूर्य व चंद्र आहेत तोपर्यंत ते पिढ्यानपिढ्या तुझे भय धरोत.
6कापलेल्या गवतावर पडणार्या पर्जन्याप्रमाणे, भूमी सिंचन करणार्या सरींप्रमाणे तो उतरो.
7त्याच्या कारकिर्दित नीतिमान उत्कर्ष पावो; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असो.
8समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या1 नदीपासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो.
9अरण्यातले रहिवासी त्याला नमन करोत; त्याचे वैरी धूळ चाटोत.
10तार्शीश व द्वीपे ह्यांचे राजे खंडणी देवोत, शबा व सबा ह्यांचे राजे नजराणे आणोत.
11सर्व राजे त्याला दंडवत घालोत; सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत.
12कारण धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्यांना तो सोडवील.
13दुबळा व दरिद्री ह्यांच्यावर तो दया करील, दरिद्र्यांचे जीव तो तारील.
14जुलूम व जबरदस्ती ह्यांपासून त्यांचे जीव तो मुक्त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्त अमोल ठरेल;
15तो चिरायू होवो व त्याला शबाचे सोने मिळो; त्याच्यासाठी सतत प्रार्थना केली जावो; त्याचा धन्यवाद दिवसभर होवो.
16भूमीत भरपूर पीक येवो, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलो; त्याची कणसे लबानोनासारखी होवोत. नगरोनगरीचे लोक पृथ्वीवरील गवताप्रमाणे विपुल होवोत.
17त्याचे नाव सर्वकाळ राहो; सूर्य आहे तोवर त्याचे नाव वृद्धिंगत होवो; त्याच्या नावाने लोक आपणांस धन्य म्हणोत; सर्व राष्ट्रे त्याचा धन्यवाद करोत.
18परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, तोच काय तो अद्भुत कृत्ये करतो; त्याचा धन्यवाद होवो.
19त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो; त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो. आमेन! आमेन!
20इशायाचा पुत्र दावीद ह्याच्या प्रार्थना समाप्त.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 72: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.