स्तोत्रसंहिता 74
74
देवाच्या प्रजेच्या शत्रूंविषयी गार्हाणे
आसाफाचे मस्कील (बोधपर स्तोत्र).
1हे देवा, तू आम्हांला कायमचे का टाकले आहेस? आपल्या कुरणातल्या कळपावर तुझा कोपाग्नी का धुमसतो?
2जी मंडळी पुरातन काळी तू विकत घेतलीस, जिला तू आपले वारस होण्याकरता खंडणी भरून सोडवलेस तिचे, व ज्या सीयोन पर्वतावर तू वस्ती केली त्याचे स्मरण कर.
3सर्वस्वी उद्ध्वस्त झालेल्या स्थलाकडे पाय उचलून चल; वैर्याने पवित्रस्थानाची अगदी नासाडी केली आहे.
4तुझ्या सभागृहात तुझ्या शत्रूंनी हलकल्लोळ मांडला आहे; त्यांनी आपले ध्वज चिन्हांसाठी उभारले आहेत.
5दाट झाडीवर कुर्हाड उचलणार्या लोकांसारखे ते दिसले.
6त्यांचे एकंदर नक्षीकाम ते कुर्हाडीने व हातोड्याने फोडून टाकतात.
7त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला आग लावली आहे; तुझ्या नावाचे निवासस्थान भ्रष्ट करून अगदी धुळीस मिळवले आहे.
8ते आपल्या मनाशी म्हणाले, “आपण ह्यांचा नायनाट करून टाकू;” त्यांनी देशात असलेली देवाची सर्व सभास्थाने जाळून टाकली आहेत.
9आमची चिन्हे आमच्या दृष्टीस पडत नाहीत; कोणी संदेष्टा उरला नाही; असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही.
10हे देवा, शत्रू कोठवर निंदा करणार? वैरी तुझ्या नावाची निर्भर्त्सना सदा करणार काय?
11तू आपला हात, म्हणजे आपला उजवा हात, का आवरून धरतोस? तो आपल्या छातीवरून काढून तू त्याचा संहार कर.
12तरी देव पुरातन कालापासून माझा राजा आहे; पृथ्वीवर उद्धार करणारा तो आहे.
13तू आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागलास; जलाशयातील मगरींची मस्तके तू ठेचून टाकलीस.
14तू लिव्याथानाच्या मस्तकांचा चुराडा केलास, ओसाड प्रदेशातील प्राण्यांना तो तू खाऊ घातलास.
15तू झरा खोदून जलप्रवाह बाहेर काढलास; तू निरंतर वाहणार्या नद्या सुकवून टाकल्यास.
16दिवस तुझा आहे, रात्रही तुझी आहे; चंद्र व सूर्य तूच स्थापन केले.
17पृथ्वीच्या सर्व सीमा तूच ठरवल्यास. उन्हाळा व हिवाळा हे तूच केलेस.
18हे परमेश्वरा, वैर्याने कशी विटंबना मांडली आहे, मूर्ख राष्ट्राने तुझ्या नावाची कशी निंदा चालवली आहे हे लक्षात असू दे.
19तू आपल्या कबुतराला श्वापदापुढे टाकू नकोस; आपल्या दीन जनांच्या प्राणांचा विसर कायमचा पडू देऊ नकोस.
20तू कराराकडे लक्ष दे; कारण देशाचे कोनेकोपरे केवळ जुलमाची वसतिस्थाने झाली आहेत.
21पीडितांना लज्जित होऊन मागे फिरू देऊ नकोस; दीन व दरिद्री तुझ्या नावाची स्तुती करोत.
22हे देवा, ऊठ, तू स्वतःच आपला वाद चालव; मूर्ख तुझी निंदा कशी नित्य करीत आहे हे लक्षात आण.
23शत्रूंची आरडाओरड, तुझ्याविरुद्ध उठणार्यांचा गोंगाट एकसारखा वर तुझ्यापर्यंत पोचत आहे तो विसरू नकोस.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 74: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.