YouVersion Logo
Search Icon

रोमकरांस पत्र 10

10
इस्राएलाविषयी पौलाची मनीषा
1बंधुजनहो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की, त्यांचे तारण व्हावे.
2मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.
3कारण त्यांना देवाच्या नीतिमत्त्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्त्व स्थापण्यास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्त्वाला ते वश झाले नाहीत.
4कारण विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्त्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे.
नीतिमत्त्वाचा नवा मार्ग सर्वांसाठी आहे
5कारण मोशे असे लिहितो, “जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्त्व आचरतो तो तेणेकरून वाचेल.”
6परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व म्हणते, “तू आपल्या मनात म्हणू नकोस की, उर्ध्वलोकी कोण चढेल?” (अर्थात ख्रिस्ताला खाली आणण्यास).
7किंवा “अधोलोकी कोण उतरेल?” (अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यांतून वर आणण्यास).
8तर ते काय म्हणते? “ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे”; (आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवत आहोत) ते हेच आहे
9की, येशू प्रभू आहे असे जर ‘तू आपल्या मुखाने’ कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा ‘आपल्या अंत:करणात’ विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.
10कारण जो अंत:करणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.1
11कारण शास्त्र म्हणते, ‘त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजीत होणार नाही.’
12यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही; कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्याइतका तो संपन्न आहे.
13कारण “जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.”
14तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणार्‍यांवाचून ते कसे ऐकतील?
15आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? “चांगल्या गोष्टींची (शांतीची) सुवार्ता सांगणार्‍यांचे चरण किती मनोरम आहेत!” असा शास्त्रलेख आहे.
16तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो,
“हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर
कोणी विश्वास ठेवला आहे?”
17ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे2 होते.
18पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते.
“त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर,
व त्यांचे शब्द दिगंतरी पोहचले.”
19आणखी मी विचारतो की, इस्राएलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो,
“जे राष्ट्र नव्हे त्याच्या योगे
मी तुम्हांला ईर्ष्येस पेटवीन,
एका मूढ राष्ट्राच्या योगे मी तुम्हांला चीड आणीन.”
20आणि यशया फार धीट होऊन म्हणतो,
“जे माझा शोध करत नसत त्यांना मी पावलो;
जे विचारत नसत त्यांना मी प्रकट झालो.”
21पण इस्राएलाविषयी तो म्हणतो,
“आज्ञा मोडणार्‍या व उलटून बोलणार्‍या लोकांकडे
मी सारा दिवस आपले हात पसरले आहेत.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for रोमकरांस पत्र 10