YouVersion Logo
Search Icon

रोमकरांस पत्र 2

2
यहूदीही दोषी आहेत
1तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही; कारण ज्यात तू दुसर्‍याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस.
2पण अशा गोष्टी करणार्‍यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे.
3तर हे मानवा, अशा गोष्टी करणार्‍यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय?
4किंवा देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?
5की, आपल्या हटवादीपणाने पश्‍चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?
6तो प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.
7म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच;
8परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांच्यावर क्रोध व कोप, संकट व क्लेश येतील.
9म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी अशा प्रत्येकाच्या जिवावर ती येतील;
10पण सत्कृत्य करणारा प्रत्येक, प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी, ह्यांना गौरव, सन्मान व शांती ही मिळतील.
11कारण देवाजवळ पक्षपात नाही.
12कारण ज्यांना नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्राव्यतिरिक्त नाश पावतील आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल.
13कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरवण्यात येतील.
14कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावत: करत असतात, तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही, तरी ते स्वत:च आपले नियमशास्त्र आहेत.
15म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंत:करणात लिहिलेला आहे असे दाखवतात; त्यांच्याबरोबर त्यांची सदसद्विवेकबुद्धीही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां-विषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात.
16ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल.
17आता जर तू स्वतःला यहूदी म्हणवत आहेस, आणि नियमशास्त्राचा आधार घेतोस व देवाविषयी अभिमान बाळगतोस,
18तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्रातले शिक्षण मिळाल्यामुळे जे सर्वोत्तम ते तू पसंत करतोस;
19आणि नियमशास्त्रात आपल्याला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप उपलब्ध झाले आहे, म्हणून आपण आंधळ्यांचे वाटाडे, अंधारात असलेल्यांचा प्रकाश,
20अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक, बालकांचे गुरू आहोत, अशी तुझी खातरी झाली आहे;
21तर मग दुसर्‍याला शिकवणारा तू स्वतःलाच शिकवत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करतोस काय?
22व्यभिचार करू नये असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करतोस काय? मूर्तींचा विटाळ मानणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय?
23नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राच्या उल्लंघनाने देवाचा अपमान करतोस काय?
24“तुमच्यामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,” असे शास्त्रात लिहिलेले आहे.
25कारण जर तू नियमशास्त्राप्रमाणे वागत असलास तर सुंतेचा उपयोग आहे खरा; परंतु जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा असलास तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे.
26तर मग सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर त्याचे सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय?
27आणि तुला शास्त्रलेख असूनही व तुझी सुंता होऊनही जो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा आहेस त्या तुझा न्याय, जो शारीरिक सुंता न झालेल्यांपैकी असून नियमशास्त्र पाळतो, तो करील.
28कारण जो बाह्यात्कारी यहूदी तो यहूदी नव्हे आणि देहाची बाह्यात्कारी सुंता ती सुंता नव्हे;
29परंतु जो अंतरी यहूदी तो यहूदी होय; आणि लेखाप्रमाणे व्हायची ती सुंता नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्या जी अंतःकरणाची व्हायची ती सुंता होय; अशाची प्रशंसा माणसाकडून नव्हे, तर देवाकडून होते.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for रोमकरांस पत्र 2