YouVersion Logo
Search Icon

रूथ 2

2
बवाजाच्या शेतात रूथ सरवा वेचते
1नामीच्या नवर्‍याचा एक नातेवाईक होता, तो अलीमलेख ह्याच्या कुळातला असून मोठा श्रीमान माणूस होता आणि त्याचे नाव बवाज असे होते.
2मवाबी रूथ नामीस म्हणाली, “मला शेतात जाऊ द्या म्हणजे कोणाची माझ्यावर कृपादृष्टी झाल्यास त्याच्यामागून मी धान्याचा सरवा वेचत जाईन; ती म्हणाली, “मुली जा.
3ती जाऊन शेतात कापणी करणार्‍यांच्या मागून सरवा वेचू लागली. आणि असे झाले की, शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातल्या बवाजाचा होता.
4बवाज बेथलेहेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणार्‍यांना म्हणाला, “परमेश्वर तुमच्याबरोबर असो.” ते त्याला म्हणाले, “परमेश्वर तुमचे अभीष्ट करो.”
5मग बवाज कापणी करणार्‍यांच्या मुकादमाला म्हणाला, “ही मुलगी कोणाची?”
6कापणी करणार्‍यांच्या मुकादमाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशातून आलेली ही मवाबी मुलगी होय.
7ती मला म्हणाली, ’कृपा करून कापणी करणार्‍यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू द्या; ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यंत वेचत आहे, थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती.”’
8बवाज रूथला म्हणाला, “मुली, ऐकतेस ना? तू दुसर्‍याच्या शेतात सरवा वेचायला येथून जाऊ नकोस; येथेच माझ्या मोलकरणींबरोबर राहा.
9हे ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा; तुला काही त्रास पोचू नये अशी आज्ञा मी ह्या गड्यांना दिली नाही काय? तुला तहान लागल्यास तू भांड्यांकडे जाऊन ह्या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी.”
10तेव्हा ती त्याला दंडवत घालून म्हणाली, “माझ्यासारख्या परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतलात ह्याचे काय कारण बरे?”
11बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली मातापितरे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकांत आलीस ही सविस्तर हकिकत मला समजली आहे.
12परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या पंखांखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देवो.”
13ती म्हणाली, “महाराज आपली कृपादृष्टी माझ्यावर राहू द्यावी; मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.”
14भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये, भाकर खा; ह्या कढीत आपली भाकर बुडव.” त्या कापणी करणार्‍यांच्या पंक्तीला ती बसली. त्यांनी तिला हुरडा दिला; तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला.
15ती सरवा वेचायला निघाली तेव्हा बवाजने आपल्या गड्यांना सांगितले, “तिला पेंढ्यांत वेचू द्या, मना करू नका;
16आणि चालता चालता पेंढ्यांतून मूठमूठ टाकत जा; तिला वेचू द्या, तिला धमकावू नका.”
17तिने ह्या प्रकारे संध्याकाळपर्यंत सरवा वेचला. तिने वेचून आणलेला सरवा झोडला, त्याचे एफाभर सातू निघाले.
18ते घेऊन ती नगरात गेली; तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले; तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले.
19तिच्या सासूने तिला विचारले, “आज तू कोठे सरवा वेचलास? हे श्रम तू कोठे केलेस? ज्याने तुझा समाचार घेतला त्याचे कल्याण होवो.” मग आपण कोणाच्या शेतात काम केले ते तिने आपल्या सासूला सांगितले; ती म्हणाली, “ज्या माणसाच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बवाज.”
20नामी आपल्या सुनेला म्हणाली, “ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करायचे सोडले नाही तो त्याचे कल्याण करो.” नामी तिला आणखी म्हणाली, “हा माणूस आपल्या आप्तांपैकीच आहे. एवढेच नव्हे तर आपले वतन सोडवण्याचा त्याला हक्क आहे.”
21मग मवाबी रूथने सांगितले की, “तो मला असेही बोलला की, ’माझे गडी सर्व कापणी करीपर्यंत त्यांच्या मागोमाग राहा.”’
22नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, “मुली, तू त्याच्याच मोलकरणींबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकांना आढळू नयेस हे बरे.”
23ह्या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या मोलकरणींबरोबर सरवा वेचला; आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली.

Currently Selected:

रूथ 2: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in