YouVersion Logo
Search Icon

निर्ग. 16

16
देव स्वर्गातून मान्ना देतो
1मग इस्राएली लोकांची मंडळी प्रवास करीत एलीम या ठिकाणाहून निघाली व मिसरमधून निघाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम व सीनाय यांच्या दरम्यान असलेल्या सीन रानात येऊन पोहचले. 2त्या रानात इस्राएल लोकांच्या मंडळीने मोशे व अहरोन यांच्यासंबंधी कुरकुर केली; 3इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “परमेश्वराच्या हातून आम्हांला मिसर देशामध्येच मरण आले असते तर बरे झाले असते, कारण तेथे आम्हांला खावयास लागणारे सर्व प्रकारचे अन्न भरपूर होते; परंतु तुम्ही आम्हांला येथे रानात उपासाने मारावे म्हणून आणले आहे.” 4मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुम्हास खाण्याकरता मी आकाशातून अन्नवृष्टी करीन; प्रत्येक दिवशी या लोकांनी आपल्याला त्या दिवसास पुरेल एवढे अन्न बाहेर जाऊन गोळा करावे. यावरुन ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात की नाही हे पाहण्यासाठी मी त्यांची परीक्षा पाहीन. 5सहाव्या दिवशी#शुक्रवार मात्र ते इतर दिवशी गोळा करतात त्याच्या दुप्पट असावे. ते जे गोळा करतील ते ते शिजवतील.” 6म्हणून मोशे व अहरोन सर्व इस्राएल लोकांस म्हणाले, “आज संध्याकाळी तुम्ही परमेश्वराचे सामर्थ्य पाहाल; तेव्हा मिसरमधून तुम्हास वाचविणारा परमेश्वर हाच आहे हे तुम्हास कळेल. 7उद्या सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल; तुम्ही परमेश्वराविरुध्द कुरकुर केली त्याने ती ऐकली आहे. आम्ही कोण की तुम्ही आम्हाविरुध्द कुरकुर करावी?” 8आणि मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हास संध्याकाळी मांस खावयास देईल; आणि सकाळी पोटभर भाकरी देईल; कारण तुम्ही परमेश्वराविरूद्ध कुरकुर करीत आहा ती त्याने ऐकली आहे. आम्ही कोण आहो? तुमचे कुरकुरणे आमच्याविरुध्द नाही तर परमेश्वराविरुध्द आहे.” 9मग मोशे अहरोनाला म्हणाला, “तू इस्राएल लोकांच्या मंडळीला सांग की, तुम्ही परमेश्वराकडे एकत्र या; कारण त्याने तुमच्या तक्रारी ऐकल्या आहेत.” 10मग अहरोन सर्व इस्राएल मंडळीशी बोलत असताना सर्व लोकांनी वळून रानाकडे पाहिले; आणि त्यांना मेघात परमेश्वराचे तेज दिसले. 11परमेश्वर मोशेला म्हणाला, 12“मी इस्राएल लोकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत तेव्हा त्यांना सांग, रात्री तुम्ही मांस खाल आणि दररोज सकाळी तुम्हास पाहिजे तितक्या भाकरी खाल; मग परमेश्वर मी तुमचा देव आहे हे तुम्हास समजेल.” 13त्या संध्याकाळच्या वेळी, तेथे लावे पक्षी येऊन छावणीभर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती जमिनीवर दव पडले. 14सूर्य उगवल्यावर दव विरून गेले, परंतु त्यानंतर जमिनीवर खवल्यासारखे हिमकणाएवढे सूक्ष्म कण पसरलेले दिसले. 15ते पाहून इस्राएल लोकांनी एकमेकांना विचारले, “हे काय आहे?” कारण ते काय आहे हे त्यांना माहीत नव्हते. तेव्हा मोशेने त्यांना सांगितले, “परमेश्वर हे अन्न तुम्हास खाण्याकरता देत आहे. 16परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही आहे की, प्रत्येकाने आपल्याला जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढेच गोळा करावे; ज्याच्या तंबूत जेवढी माणसे असतील तेवढ्यासाठी त्याच्या आहाराप्रमाणे प्रत्येकी एकएक ओमर गोळा करावे.” 17इस्राएल लोकांनी तसे केले, कोणी कमी, कोणी जास्त गोळा केले. 18त्यांनी ओमरच्या मापाने ते मापून पाहिले; तेव्हा ज्याने अधिक गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही. तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही. प्रत्येकाने आपआपल्या आहाराच्या मानाने ते गोळा केले. 19मोशेने लोकांस सांगितले, “कोणीही यापैकी काहीएक सकाळपर्यंत ठेवू नये.” 20परंतु लोकांनी मोशेचे ऐकले नाही, काही लोकांनी त्या अन्नातून सकाळपर्यंत ठेवले त्यामध्ये किडे पडले व त्याची घाण येऊ लागली. त्यावरून मोशे त्यांच्यावर फार रागावला. 21प्रत्येक दिवशी ते लोक आपल्याला पुरेसे अन्न गोळा करीत, ऊन फार वाढल्यावर ते वितळून जाई. 22सहाव्या दिवशी त्यांनी दुप्पट म्हणजे प्रत्येक माणशी दोन ओमर गोळा केले. तेव्हा मंडळीचे सर्व पुढारी लोक मोशेकडे आले व त्यांनी हे त्यास कळवले. 23तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचे सांगणे असे आहे की, उद्या विश्रामवार, परमेश्वराचा पवित्र शब्बाथ आहे. तुम्हास भाजावयाचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा आणि जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवावे.” 24मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत ठेवले. पण त्याची घाण सुटली नाही किंवा त्यामध्ये कोठेही किडे पडले नाहीत. 25मग मोशे म्हणाला, “ते आज खा, कारण आज परमेश्वराचा शब्बाथ आहे, आज रानात ते तुम्हास मिळावयाचे नाही. 26तुम्ही सहा दिवस ते गोळा करावे, परंतु आठवड्याचा सातवा दिवस हा शब्बाथ आहे. त्या दिवशी काही मिळणार नाही.” 27तरी काही लोक सातव्या दिवशी ते गोळा करावयास बाहेर गेले, परंतु त्यांना काहीच मिळाले नाही. 28नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझ्या आज्ञा व माझे नियम पाळावयास तुम्ही कोठवर नाकारणार? 29पाहा परमेश्वराने तुम्हास शब्बाथ दिला आहे; म्हणून सहाव्या दिवशी तो तुम्हास तो दोन दिवस पुरेल एवढे अन्न देतो, तेव्हा सातव्या दिवशी आपआपल्या ठिकाणी स्वस्थ असावे, आपले स्थान सोडून कोणीही बाहेर जाऊ नये.” 30याप्रमाणे लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला. 31इस्राएल लोकांनी त्या अन्नाचे नाव मान्ना ठेवले; ते धण्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती. 32मोशे म्हणाला, “परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की ह्यातले एक ओमर पुढील पिढ्यांच्या लोकांसाठी राखून ठेवा. मी तुम्हास मिसर देशातून काढून नेल्यावर रानात कसे अन्न दिले हे त्यांना समजेल.” 33तेव्हा मोशेने अहरोनाला सांगितले, “एक भांडे घे आणि त्यामध्ये एक ओमर मान्ना घाल. तो परमेश्वरापुढे सादर करण्यासाठी आपल्या पुढील पिढ्यांसाठी राखून ठेव.” 34मग परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने परमेश्वराच्या आज्ञापटापुढे #साक्षपट (पाहा - 25:10-12)ते भांडे ठेवले. 35इस्राएल लोक तो मान्ना चाळीस वर्षे, कनान देशाच्या सरहद्दीपर्यंत जाऊन पोहोचेपर्यंत खात होते. 36एक ओमर मान्ना म्हणजे “एक एफाचा दहावा भाग#साधारण तेवीस लिटर ” आहे.

Currently Selected:

निर्ग. 16: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in