YouVersion Logo
Search Icon

निर्ग. 21

21
गुलामासंबंधी नियम
अनु. 15:12-18; लेवी. 25:39-55
1आता जे इतर नियम तू इस्राएल लोकांस लावून द्यावेत ते हेच: 2तुम्ही जर एखादा इब्री गुलाम विकत घेतला तर त्याने फक्त सहा वर्षे काम करावे; सातव्या वर्षी त्याच्याकडून काही भरपाई न घेता त्यास मुक्त होऊन जाऊ द्यावे. 3जर तो एकटाच आला असेल तर त्याने मुक्त होताना एकटेच निघून जावे; परंतु जर तो त्याची पत्नी घेऊन आला असेल तर त्याने त्याच्या पत्नीला घेऊन जावे. 4जर तो एकटा आला असेल तर त्याच्या मालकाने त्यास पत्नी करून द्यावी; तिला पुत्र किंवा कन्या झाल्या असतील तर ती व तिची मुले मालकाची राहतील; त्याने एकट्यानेच जावे. 5मी माझ्या मालकावर व माझ्या पत्नीमुलांवर प्रेम करतो, मी मुक्त होऊ इच्छित नाही, असे जर तो स्पष्टपणे सांगतो, 6तर त्याच्या मालकाने त्यास देवासमोर अथवा त्यास दाराच्या चौकटीजवळ उभे करावे व अरीने त्याचा कान टोचावा. मग तो त्याची आयुष्यभर चाकरी करील. 7कोणी आपली कन्या गुलाम म्हणून विकली तर तिने पुरुष गुलामाप्रमाणे मुक्त होऊन जाऊ नये. 8तिच्या मालकाने तिला आपली पत्नी करून घेण्याचे ठरवले असेल, पण पुढे तिच्यावरून त्याची मर्जी उडाली तर त्याने खंडणी घेऊन तिची मुक्तता करावी. तिला परक्या लोकांस विकण्याचा त्यास अधिकार नाही. तिच्याशी कपटाने वागल्यामुळे तिला विकण्याचा त्यास अधिकार नाही. 9आपल्या मुलासाठी पत्नी म्हणून तिला ठेवून घ्यायची तिच्या मालकाची इच्छा असेल, तर त्याने तिला आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवावे. 10त्याने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले तरी त्याने पहिल्या पत्नीस अन्न वस्त्र कमी पडू देऊ नये, किंवा तिच्या वैवाहिक अधिकारांना बाधा येऊ देऊ नये. 11या तीन गोष्टी त्याने तिच्यासाठी केल्या नाहीत तर मग ती त्यास काही खंडणी न देता मुक्त होईल.
शारीरिक इजा करण्याच्या गुन्हांसंबंधी नियम
12कोणी एखाद्याला मारले व त्यामुळे तो मेला तर त्यास अवश्य जिवे मारावे. 13पूर्वसंकल्प न करता, पण आपघाताने जर एखाद्याच्या हातून कोणाचा मृत्यू झाला. तर त्यास पळून जात येईल असे ठिकाण मी नेमून देईल. 14परंतु जर कोणी एकाने जाणूनबुजून व ठरवून रागाने किंवा द्वेषाने दुसऱ्या मनुष्यास ठार मारले तर मात्र त्यास शिक्षा करावी; त्यास वेदीपासून खेचून आणून ठार मारावे. 15कोणी आपल्या पित्याला किंवा आईला मारहाण करील त्यास अवश्य ठार मारावे. 16जो कोणी एखाद्याला चोरून नेऊन विकेल किंवा त्याच्याकडे तो सापडेल तर त्यास अवश्य जिवे मारावे. 17जो कोणी आपल्या पित्याला किंवा आईला शिव्याशाप देईल त्या मनुष्यास अवश्य जिवे मारावे. 18दोघेजण भांडत असताना एकाने दुसऱ्याला दगड किंवा ठोसा मारला आणि त्यामुळे तो मेला नाही, पण त्यास अंथरूणात पडून रहावे लागले, 19तर मारणाऱ्याने त्यास त्याच्या वाया गेलेल्या वेळेबद्दल नुकसान भरपाई द्यावी व तो मनुष्य बरा होईपर्यंत त्याच्यासाठी लागणारा खर्च द्यावा. 20काही वेळा लोक आपल्या गुलामाला किंवा गुलाम स्त्रीला छडीने मारहाण करतात, त्यामुळे जर तो गुलाम किंवा ती गुलाम स्त्री मरण पावली तर त्यांना मारणाऱ्याला अवश्य शिक्षा करावी; 21पण तो एकदोन दिवस जिवंत राहिला तर मालकाला शिक्षा होणार नाही कारण तो त्याचेच धन आहे. 22दोघे जर मारामारी करीत असतील व त्यांचा धक्का एखाद्या गरोदर स्त्रीला लागला आणि त्या स्त्रीचा गर्भपात झाला पण तिला इतर कोणतीही इजा झाली नाही, तर ज्याचा धक्का तिला लागला तिचा पती न्यायाधीशांच्या सल्ल्याने जो दंड ठरवील तो दंड त्याने द्यावा. 23पण दुसरी काही जास्त इजा झाल्यास जिवाबद्दल जीव, 24डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय, 25चटक्याबद्दल चटका, ओरखड्याबद्दल ओरखडा, व जखमेबद्दल जखम असा बदला घ्यावा. 26जर एखाद्याने आपल्या गुलामाच्या किंवा गुलाम स्त्रीच्या डोळ्यावर मारल्यामुळे त्याचा किंवा तिचा डोळा गेला तर त्याने त्यास मुक्त करावे. 27एखाद्या मालकाने आपल्या पुरुष दासाच्या किंवा स्त्री दासीच्या तोंडावर मारल्यामुळे त्याचा किंवा तिचा दात पडला तर त्याने त्यास दास्यमुक्त करून जाऊ द्यावे.
धन्याच्या जबाबदारीविषयी नियम
28एखाद्याच्या बैलाने एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला हुंदडून जिवे मारले तर त्या बैलाला दगडमार करून जिवे मारावे, त्या बैलाचे मांस कोणी खाऊ नये, परंतु त्या बैलाच्या मालकाला सोडून द्यावे. 29परंतु त्या बैलाला हुंदडण्याची सवयच असली आणि त्याविषयी त्याच्या मालकाला सूचना केली असूनही त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही आणि त्यानंतर कोणा पुरुषाला किंवा स्त्रीला त्याने जिवे मारले तर त्याबद्दल त्याचा मालक दोषी आहे, त्या बैलाला धोंडमार करून जिवे मारावे व त्याच्या मालकालाही जिवे मारावे. 30त्याच्याकडून खंडणी मागितल्यास त्याने आपला प्राण वाचविण्यासाठी आपल्यावर लादलेली खंडणी देऊन टाकावी. 31बैलाने एखाद्याच्या पुत्राला किंवा कन्येला हुंदडून जिवे मारले तर त्याबाबतीत हाच नियम लागू करावा. 32एखाद्या बैलाने जर कोणाच्या पुरुष दासास किंवा स्त्री दासीला हुंदडून ठार मारले तर त्या बैलाच्या मालकाने त्याच्या मालकाला चांदीची तीस शेकेल नाणी#साधारण 342 ग्राम चांदी द्यावी आणि त्या बैलालाही दगडमार करावी; 33एखाद्या मनुष्याने बुजलेला खड्डा उकरला किंवा त्याने खड्डा खणून त्यावर झाकण ठेवले नसेल आणि जर कोणाचा बैल, गाढव वगैरे त्या खड्डयात पडून मरण पावले तर खड्ड्याचा मालक दोषी आहे; 34त्याने त्या जनावराच्या मालकाला भरपाई म्हणून त्याची किंमत द्यावी आणि ते मरण पावलेले जनावर खड्ड्याच्या मालकाचे होईल. 35जर एखाद्याच्या बैलाने दुसऱ्याच्या बैलाला हुंदडून मारून टाकले तर जिवंत राहिलेला बैल विकून आलेले पैसे दोघा मालकांनी विभागून घ्यावेत आणि मरण पावलेला बैलही विभागून घ्यावा. 36परंतु तो बैल पूर्वीपासून मारका आहे हे ठाऊक असून मालकाने त्यास बांधून ठेवले नाही, तर त्याने बैलाबद्दल बैल द्यावा व मरण पावलेला बैल त्याचा व्हावा.

Currently Selected:

निर्ग. 21: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in