YouVersion Logo
Search Icon

निर्ग. 20

20
दहा आज्ञा
अनु. 5:1-21
1देवाने ही सर्व वचने सांगितली, 2मी परमेश्वर तुझा देव आहे. ज्याने तुला मिसर देशातून, गुलामगिरीतून सोडवून आणले. 3माझ्यासमोर तुला इतर कोणतेही दुसरे देव नसावेत. 4तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस; 5त्यांची सेवा करू नको; किंवा त्यांच्या पाया पडू नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव ईर्ष्यावान देव आहे. जे माझा विरोध करतात, त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो; 6परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. 7तुझा देव परमेश्वर याचे नाव तू व्यर्थ घेऊ नकोस; कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. 8शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव; 9सहा दिवस श्रम करून तू तुझे कामकाज करावेस; 10परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी तू, तुझा पुत्र, तुझी कन्या, तुझे दास व दासी यांनी तसेच तुझे पशू, किंवा तुझ्या वेशीत राहणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये; 11कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे. 12आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तू चिरकाळ राहशील. 13खून करू नकोस. 14व्यभिचार करू नकोस. 15चोरी करू नकोस. 16आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देऊ नकोस. 17“तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस; आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीचा लोभ धरू नकोस; आपल्या शेजाऱ्याचा दासदासी, बैल, गाढव, किंवा त्याच्या कोणत्याही वस्तूचा लोभ धरु नकोस.”
लोकांस भीती वाटते
18लोकांनी पर्वतावरील ढगांचा गडगडाट ऐकला, विजांचा चकचकाट पाहिला, शिंगाचा नाद होत आहे व पर्वतातून धूर वर चढताना पाहून भीतीने त्यांचा थरकाप झाला. ते दूर उभे राहिले. 19ते मोशेला म्हणू लागले आमच्याशी तूच बोल, आम्ही ऐकू; देव आमच्याशी न बोलो, तो बोलेल तर आम्ही मरून जाऊ. 20मग मोशे लोकांस म्हणाला, “भिऊ नका, कारण तुमची परीक्षा करावी आणि त्याचे भय तुमच्या डोळ्यांपुढे राहून तुम्ही पाप करू नये यासाठी देव आला आहे.” 21मोशे, ढगांच्या दाट अंधारात, जेथे देव होता तेथे गेला, तोपर्यंत लोक पर्वतापासून लांब उभे राहिले.
वेदीसंबंधी नियम
22मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, मी तुमच्याशी आकाशातून बोललो हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. 23माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका.” 24माझ्यासाठी मातीची वेदी बांधा आणि तिजवर तुझी मेंढरे व तुझे बैल यांची होमार्पणे व शांत्यर्पणे वाहा; जेथे जेथे मी माझ्या नावाची आठवण व्हावी म्हणून मी सांगतो तेथे तेथे मी येऊन तुम्हास आशीर्वाद देईन. 25तुम्ही जर दगडाची वेदी बांधणार असाल तर ती घडलेल्या चिऱ्याची नसावी; कारण तुम्ही आपले हत्यार दगडाला लावल्यास तो भ्रष्ट होईल. 26तुझ्या शरीराची नग्नता माझ्या वेदीवर दिसून येऊ नये म्हणून तू पायऱ्यांनी चढता कामा नये.

Currently Selected:

निर्ग. 20: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in