YouVersion Logo
Search Icon

मत्त. 11

11
बाप्तिस्मा करणारा योहान
लूक 7:18-35
1येशूने त्याच्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे संपविल्यावर तो तेथून निघाला आणि गालील प्रांतातील गावामध्ये फिरून शिकवू आणि उपदेश करू लागला.
2बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या कामाविषयी ऐकले. तेव्हा त्याने आपल्या काही शिष्यांच्या हाती निरोप पाठवला. 3आणि त्यास विचारले, “जो येणार होता, तो तूच आहेस? किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” 4येशूने उत्तर दिले, “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. 5आंधळे पाहतात. पांगळे चालतात. कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. 6जो कोणी माझ्यामुळे अडखळत नाही तो धन्य आहे.”
7मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला, तुम्ही वैराण प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय? 8तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे घातलेल्या मनुष्यास पाहायला गेला होता काय? तलम वस्त्रे घालणारे राजाच्या घरात असतात. 9तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होतात? संदेष्ट्याला पाहायला काय? होय. मी तुम्हास सांगतो आणि संदेष्ट्यांपेक्षाही अधिक मोठा असा त्याला.
10 त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे की,
पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो
तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.
11 मी तुम्हास खरे सांगतो की, स्त्रीयांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही, तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. 12बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्यावर जोराने हल्ला करीत आहे आणि हल्ला करणारे ते हिरावून घेतात. 13कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी भविष्य सांगितले. 14आणि जर तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर येणारा एलीया तो हाच आहे. 15ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.
16 या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारतात त्यांच्यासारखी ही पिढी आहे. ती म्हणतात.
17 आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजवले तरी तुम्ही नाचला नाहीत. आम्ही विलाप केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाही. 18योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात त्यास भूत लागले आहे. 19मनुष्याचा पुत्र खातपीत आला. ते म्हणतात, पाहा, हा खादाडा व दारूबाज, जकातदार व पापी लोकांचा मित्र, परंतु ज्ञानाची योग्यता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते.
पश्चात्ताप न करणाऱ्या शहरांविषयी काढलेले दुःखोद्गार
उत्प. 19:12; लूक 10:13-15
20तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चात्ताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला. 21“हे खोराजिना नगरा, तुझा धिक्कार असो, हे बेथसैदा नगरा तुझा धिक्कार असो, कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये करण्यात आली ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये केली असती तर त्यांनी त्वरेने पूर्वीच गोणपाट नेसून व अंगाला राख फासून पश्चात्ताप केला असता. 22पण मी तुम्हास सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन या शहरांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल. 23आणि तू कफर्णहूम शहरा, तू आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील, कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते नगर आतापर्यंत टिकले असते. 24पण मी तुम्हास सांगतो की, न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोम नगराला सोपे जाईल.”
बालसदृश मनोवृत्ती
25मग येशू म्हणाला, “हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू मी तुझे उपकार मानतो कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धीमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकासारखे अशिक्षित आहेत त्यांना तू प्रकट केल्या. 26होय पित्या, तू हे केलेस, कारण खरोखर तुला हेच योग्य वाटले होते. 27माझ्या पित्याने मला सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही आणि पुत्रावाचून ज्याला प्रकट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही.
28 अहो जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन. 29मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. 30कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.”

Currently Selected:

मत्त. 11: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in