YouVersion Logo
Search Icon

मत्त. 14

14
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा मृत्यू
मार्क 6:14-29; लूक 9:7-9
1त्यावेळी चौथाई देशांचा राजा हेरोदाने येशूची किर्ती ऐकली. 2तेव्हा त्याने आपल्या चाकरांना म्हटले, “येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. त्यास मरण पावलेल्यातून उठविण्यात आले आहे म्हणून याच्याठायी सामर्थ्य कार्य करीत आहे.” 3हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरूंगात टाकले होते. 4कारण योहान त्यास सांगत होता, “तू तिला पत्नी बनवावे हे देवाच्या नियमशास्त्राच्या योग्य नाही.” 5हेरोद त्यास मारावयास पाहत होता, पण तो लोकांस भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे. 6हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले. 7त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले. 8तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणारा योहानाचे शीर तबकात घालून मला इथे आणून द्या.” 9हेरोद राजाला फार वाईट वाटले. तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावयाची आज्ञा केली. 10आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर उडवले. 11मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलीला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले. 12मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्यास पुरले आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले.
पाच हजारांना भोजन
मार्क 6:30-44; लूक 9:10-17; योहा. 6:1-14
13मग ते ऐकून येशू तेथून होडीत बसून निवांत जागी निघून गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरांतून त्याच्यामागे पायीपायी गेले. 14मग जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्यास त्यांच्याविषयी कळवळा आला व जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले. 15मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “ही अरण्यातील जागा आहे आणि भोजनाची वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.” 16परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना काही खायला द्या.” 17ते त्यास म्हणाले, आमच्याजवळ केवळ “पाच भाकरी व दोन मासे आहेत.” 18तो म्हणाला, “ते माझ्याकडे आणा.” 19मग लोकांस गवतावर बसण्याची आज्ञा केली. त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. 20ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या. 21जेवणारे सुमारे पाच हजार पुरूष होते. शिवाय स्त्रिया व मुले होतीच.
येशू समुद्रावरून चालतो
मार्क 6:45-52; योहा. 6:15-21
22मी लोकसमुदायास निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लगेच शिष्यांना पाठवून दिले. 23लोकांस पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोंगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता. 24पण तारू सरोवरामध्ये होते. इकडे वारा विरूद्ध दिशेने वाहत असल्यामुळे तारू लाटांनी हेलकावत होते व त्यामुळे ते त्याच्यावर ताबा ठेवू शकत नव्हते. 25तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी#म्हणजे पहाटे तीन वाजता येशू त्याच्याकडे आला. तो पाण्यावरून चालत होता. 26शिष्य त्यास पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, हे “भूत आहे.” आणि ते भिऊन ओरडले 27पण येशू लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.”
28पेत्र म्हणाला, प्रभूजी जर आपण असाल तर मला पाण्यावरून आपणाकडे येण्यास सांगा. 29येशू म्हणाला, “ये.” मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला. 30पण तो पाण्यावर चालत असताना जोराचा वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला “प्रभूजी, मला वाचवा.” 31आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्यास धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?” 32मग येशू व पेत्र होडीत गेल्यावर वारा थांबला. 33तेव्हा जे शिष्य होडीत होते ते त्यास नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”
34नंतर ते पलीकडे गनेसरेताच्या भागात गेले. 35तेथील लोकांनी येशूला ओळखून व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठवला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले. 36आणि आम्हास आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.

Currently Selected:

मत्त. 14: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in