मत्त. 26
26
येशूला ठार मारण्याचा कट
मार्क 14:1, 2; लूक 22:1, 2; योहा. 11:45-53
1मग येशूने ही सर्व वचने सांगण्याचे संपविल्यानंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला, 2“दोन दिवसानी वल्हांडणाचा सण आहे हे तुम्हास माहीत आहे आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळून जिवे मारला जाण्यासाठी धरून दिला जाईल.”
3मग मुख्य याजक लोक आणि वडीलवर्ग, महायाजकाच्या महलात जमले. मुख्य याजकाचे नाव कयफा होते. 4सभेत त्यांनी मिळून मसलत केली की, येशूला कपटाने अटक करून आणि जिवे मारावे. 5तरीही ते म्हणत होते, “सणाच्या दिवसात नको, नाही तर लोकांमध्ये दंगा होईल.”
बेथानी येथे येशूला करण्यात आलेला तैलाभ्यंग
मार्क 14:3-9; योहा. 12:1-8
6तेव्हा येशू बेथानी गावामध्ये शिमोन जो कुष्ठरोगी होता त्याच्या घरात होता. 7येशू तेथे असताना एक स्त्री त्याच्याकडे आली. अतिमौल्यवान सुवासिक तेलाची अलाबास्त्र कुपी तिच्याजवळ होती आणि तो जेवणास टेकून बसला असता तिने ते त्याच्या डोक्यावर ओतले. 8पण त्याच्या शिष्यांनी ते पाहिले, तेव्हा त्यांना राग आला. शिष्य विचारू लागले, असा नाश कश्याला? 9ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबांना देता आले असते. 10पण येशूला ते काय म्हणत आहेत हे माहीत होते, त्याने त्यांना विचारले, “तुम्ही त्या स्त्रीला का त्रास देत आहात? तिने माझ्यासाठी फार चांगले काम केले आहे. 11गरीब लोक तुमच्याबरोबर नेहमीच असतील पण मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही. 12कारण तिने माझ्या शरीरावर हे सुवासिक तेल ओतले ते मला पुरण्याच्या तयारीसाठी हिने केले. 13मी तुम्हास खरे सांगतो, सर्व जगात जेथे सुवार्ता गाजवली जाईल तेथे तेथे या स्त्रीने जे केले त्याचे वर्णन तिची आठवण म्हणून सांगण्यात येईल.”
यहूदाची फितुरी
मार्क 14:10, 11; लूक 22:3-6
14बारा शिष्यांपैकी एक यहूदा इस्कार्योत मुख्य याजकांकडे गेला. 15यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्यास चांदीची तीस नाणी दिली. 16तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला.
शेवटले भोजन
मार्क 14:12-21; लूक 22:7-13
17बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले. ते म्हणाले, “आम्ही आपल्यासाठी वल्हांडणाचे जेवण कोठे करावे अशी आपली इच्छा आहे?” 18येशू म्हणाला, “तुम्ही नगरात अमुक मनुष्याकडे जा आणि त्यास सांगा; ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वल्हांडण साजरा करणार आहे.” 19येशूने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले आणि त्यांनी वल्हांडण सणाचे जेवण तयार केले.
20संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर जेवावयास बसला. 21जेवण करीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो तुमच्यातला एकजण माझा विश्वासघात करील.” 22ते खूप दुःखी झाले आणि त्यांच्यातील प्रत्येकजण त्यास विचारु लागला, प्रभूजी, तो मी तर नाही? 23मग येशूने उत्तर दिले, “ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला तोच माझा विश्वासघात करील. 24जसे मनुष्याच्या पुत्राविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तसा तो जातो खरा; पण जो त्याचा विश्वासघात करतो त्यास धिक्कार असो! तो मनुष्य जर जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते.” 25मग यहूदा, जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो येशूकडे वळून म्हणाला, “रब्बी, तो मी आहे का?” येशू त्यास म्हणाला, “तू म्हणालास, तसेच आहे.”
26ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली. तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि ती मोडली. त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, खा. हे माझे शरीर आहे.” 27नंतर येशूने प्याला घेतला. त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो त्यांना दिला. येशू म्हणाला, “तुम्ही सर्वांनी यातून प्यावे. 28कारण हे माझे कराराचे रक्त आहे. हे पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जात आहे. 29परंतु मी तुम्हास सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यांत तुम्हाबरोबर नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत द्राक्षाचा हा उपज मी पिणारच नाही.”
शिष्य आपल्याला सोडून जातील याबाबत येशूचे भविष्य
30मग त्यांनी एक स्तोत्रगीत गाईल्यावर ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले. 31येशूने सांगितले, “आज रात्री माझ्यामुळे, तुम्ही सर्व अडखळाल; कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘मी मेंढपाळाचा वध करीन,
कळपातील मेंढरांची दाणादाण होईल.’
32 पण मी मरणातून उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालील प्रांतात जाईन.” 33पेत्र उत्तर देत म्हणाला, “इतर सर्व जरी आपणाविषयी अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.” 34येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” 35पेत्र म्हणाला, “मला तुझ्याबरोबर मरावे लागले तरी मी तुला नाकारणार नाही.” आणि इतर शिष्यसुद्धा तसेच म्हणाले.
गेथशेमाने बागेत येशू
मार्क 14:32-42; लूक 22:39-46
36नंतर गेथशेमाने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला. येशू त्यांना म्हणाला, “मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांबा.” 37येशूने पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र यांना आपल्याबरोबर यायला सांगितले. यानंतर येशू फार दुःखी व कासावीस होऊ लागला. 38येशू पेत्राला व जब्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, “माझा जीव फार दुःखीत व मरणप्राय झाला आहे. येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.” 39तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओणवून प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दुःखाचा प्याला माझ्यापुढून जाऊ दे, तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” 40मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्यास आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांस माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय? 41तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा खरोखर उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे.” 42नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, जर दुःखाचा हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही तर तुझी इच्छा असेल तसे होवो.” 43नंतर येशू शिष्यांकडे परत गेला तेव्हा त्यास आढळून आले की, त्यांचे डोळे जड झाले होते व ते झोपी गेले आहेत कारण जागे राहणे त्यांना शक्य होत नव्हते. 44नंतर येशू शिष्यांना पुन्हा सोडून तसाच पुढे गेला आणि तिसऱ्या वेळी प्रार्थना करताना त्याने पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली. 45यानंतर येशू परत शिष्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजून झोप आणि विसावाच घेत आहात का? पाहा! मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. 46उठा, चला. पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.”
येशूला अटक
मार्क 14:43-52; लूक 22:47-53; योहा. 18:1-11
47येशू हे बोलत असतानाच बारा जणांपैकी एक जो यहूदा, तो तेथे आला. त्याच्याबरोबर बरेच लोक होते. मुख्य याजक लोक आणि वडीलजन यांनी त्यांना पाठवले होते. ते लोक तलवारी व सोटे घेऊन आले होते. 48आणि त्यास धरून देणार्याने त्यांना खूण देऊन म्हणले होते की, मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास तुम्ही धरा, 49मग यहूदा येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी,” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले. 50येशू त्यास म्हणाला, “मित्रा, जे करण्यास आलास ते कर.” मग ते येशूकडे आले. त्यांनी येशूवर हात टाकले व त्यास धरले. 51हे झाल्यावर येशूबरोबर असलेल्या एका अनुयायाने तलवारीला हात घातला आणि ती उपसली. त्याने महायाजकाच्या सेवकाचा कान कापला. 52येशू त्या मनुष्यास म्हणाला, “तू आपली तलवार म्यानात ठेव. जे तलवारीचा वापर करतात ते तलवारीनेच मरतात. 53मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या सहा हजार सैन्याची एक अशा बारा पेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हास कळत नाही काय? 54परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिजे असा जो शास्त्रलेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?” 55यानंतर येशू सर्व लोकसमुदायाला म्हणाला, “जसा मी कोणी गुन्हेगार आहे, अशा रीतीने तुम्ही तलवारी व सोटे हाती घेऊन मला धरायला माझ्यावर चाल करून आला काय? मी दररोज परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असता तुम्ही मला धरले नाही. 56परंतु या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की, संदेष्ट्यांनी जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.” नंतर येशूचे सर्व शिष्य त्यास सोडून पळून गेले.
मुख्य याजकांपुढे येशूची चौकशी
मार्क 14:53-65; लूक 22:66-71; योहा. 18:12-14, 19-24
57त्या लोकांनी येशूला धरले, त्यांनी त्यास महायाजक कयफा याच्या घरी नेले. तेथे नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र जमले होते. 58पेत्र काही अंतर ठेवून येशूच्या मागे चालला होता. पेत्र येशूच्या मागे महायाजकाच्या आवारापर्यंत गेला आणि जाऊन शेकत बसला, काय होते ते पाहण्यासाठी कामदारांसोबत बसला. 59येशूला मरणदंड द्यावा म्हणून मुख्य याजक लोक आणि सर्व यहूदी अधिकारी सभा त्याच्याविरुध्द काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले. 60पुष्कळ खोटे साक्षीपुढे आले आणि येशूविरूद्ध साक्ष देऊ लागले. परंतु येशूला जिवे मारण्याचे काहीही कारण यहूदी सभेला सापडेना. शेवटी दोन माणसे पुढे आली, ती म्हणू लागली, 61“हा मनुष्य असे म्हणाला की, देवाचे भवन मी पाडू शकतो आणि ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकतो.” 62तेव्हा महायाजक उठून येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहेत, तुझ्यविरूद्ध जे आरोप आहेत, त्याविषयी तुला काही सांगायचे आहे का? हे सर्व खरे सांगत आहेत काय?” 63पण येशूने काहीच उत्तर दिले नाही. परत एकदा महायाजक येशूला म्हणाला, “जिवंत देवाच्या नावाची शपथ. मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग! तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय?” 64येशू त्यांना म्हणाला, “होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हास सांगतोः यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही सामर्थ्याच्या उजवीकडे बसलेले व आकाशातून येताना पाहाल.” 65जेव्हा महायाजकाने हे ऐकले, तेव्हा तो फार संतापला. आपले कपडे फाडून तो म्हणाला, “याने देवाविरूद्ध निंदा केली आहे! आम्हास आणखी साक्षीदारांची गरज राहिली नाही. याला देवाची निंदा करताना तुम्ही ऐकले! 66तुम्हास काय वाटते?” यहूद्यांनी उत्तर दिले, “तो अपराधी आहे आणि त्यास मरण पावलेच पाहिजे.” 67तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्यास मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या. 68ते म्हणाले, “ख्रिस्ता आमच्यासाठी भविष्य सांग! तुला कोणी मारले?”
पेत्र येशूचा नाकार करतो
मार्क 14:66-72; लूक 22:54-62; योहा. 18:15-18, 25-27
69यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. महायाजकाच्या दासीपैकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, “तू सुद्धा गालील प्रांताच्या येशूबरोबर होतास.” 70पण पेत्राने सर्वांसमोर ते नाकारले. तो म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही.” 71मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्यास पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांस म्हणाली, “नासरेथकर येशूबरोबर हा होता.” 72पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारून, म्हणाला, “मी त्यास ओळखत नाही!” 73काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्यास म्हणाले, “तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस, हे आम्हास माहीत आहे, तुझ्या बोलण्यावरून हे आम्हास स्पष्ट दिसून येते.” 74मग तो स्वतःला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, “मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!” पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवला. 75नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले, “कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला.
Currently Selected:
मत्त. 26: IRVMar
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.