YouVersion Logo
Search Icon

मीखा 7

7
इस्त्राएलाचा नैतिक अधःपात
1मला हायहाय! मी अस्वस्थ झालो आहे,
कारण माझी स्थिती उन्हाळ्यातल्या वगळ फळांसारखी झाली आहे,
काढणीच्या द्राक्षांसारखी झाली आहे,
खायला एकही घोंस नाही,
पण तरीही प्रथम पिकलेल्या अंजीर फळाची हाव आहे.
2धार्मिक मनुष्य पृथ्वीवरून नष्ट झाला आहे,
आणि मनुष्यांमध्ये कोणीही सरळ नाही;
ते सर्व रक्त पाडायला टपतात;
ते प्रत्येकजण जाळे घेऊन आपल्या भावाची शिकार करतात.
3त्यांचे हात दुष्कृत्ये करण्यात पटाईत आहेत.
अधिकारी पैसे मागतात व न्यायाधीश लाच घेण्यास तयार आहेत.
सामर्थ्यवान मनुष्या दुसऱ्याला आपल्या जिवाची वाईट इच्छा बोलून दाखवतो.
असे ते एकत्र येऊन योजना करतात.
4त्यांच्यातील अतिशय चांगलाही काटेरी झुडुपाप्रमाणे आहे.
त्यातला अति सरळ तो काटेरी कुंपणापेक्षा वाईट आहे.
हा दिवस, तुझ्या पाहारेकऱ्यांचा दिवस येतो,
आता त्यांचा गोंधळ उडेल.
5कोणत्याही शेजाऱ्यावर विश्वास ठेवू नको.
मित्रावरही विश्वास ठेवून राहू नको.
तुझ्या उराशी जी स्त्री निजते तिला देखील काही सांगू नको,
तू काय बोलतो त्या बद्दल सावध राहा.
6स्वत:च्या घरातील माणसेच वैरी होतील.
मुलगा वडिलांना मान देणार नाही.
मुलगी आईविरुध्द जाईल.
सून सासूच्या विरोधात जाईल.
परमेश्वर प्रकाश पाडतो व सुटका करतो
7परंतू मी तर परमेश्वराकडे दृष्टी लावीन,
मी आपल्या तारणाऱ्या देवाची वाट पाहीन,
माझा परमेश्वर माझे ऐकेल.
8माझ्या शत्रूंनो, मी पडल्यावर मला हसू नका, मी तेव्हा उठेन.
जेव्हा मी अंधारात बसेन
तेव्हा परमेश्वर माझ्यासाठी प्रकाश होईल.
9परमेश्वर माझा वाद करेल
आणि माझा न्याय साधेल तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन,
कारण मी त्याच्याविरुध्द पाप केले आहे.
तो मला प्रकाशाकडे आणील,
आणि त्याच्या न्यायीपणात त्याने मला सोडवलेले मी पाहीन.
10मग माझा शत्रू हे पाहिल; “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?”
असे ज्याने मला म्हटले त्यास लाज झाकून टाकेल.
माझे डोळे तिच्याकडे पाहतील,
रस्त्यावरील चिखलाप्रमाने ती तुडवली जाईल.
11तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल.
त्या दिवसात तुझी सीमा फार विस्तारीत होईल.
12त्या दिवसात ते अश्शूर देशातून
आणि मिसर देशापासून,
फरात नदीपर्यंतच्या प्रांतातून,
दूरदूरच्या समुद्रतीरावरून व दूरदूरच्या पर्वताकडून लोक तुझ्याकडे येतील.
13देशात राहणाऱ्या लोकांमुळे व त्यांच्या कृत्यांच्या फळांमुळे ओसाड होईल.
परमेश्वराची इस्त्राएलावर करुणा
14म्हणून तू आपल्या लोकांस,
तुझ्या वतनाचा कळप जो रानात चरतो त्याला,
आपल्या काठीने पाळ. जसे ते प्राचीन दिवसात तसे बाशानांत व गिलादांत ते चरोत.
15जेव्हा तू मिसरदेशातून बाहेर निघालास,
त्या दिवसाप्रमाणे त्यास मी अद्भुत कृत्ये दाखवीन.
16राष्ट्रे ते चमत्कार पाहतील व आपल्या सर्व बलाविषयी लज्जित होतील.
ती आपला हात आपल्या मुखाला लावतील,
त्यांचे कान बहिरे होतील.
17ते सापाप्रमाणे धुळ चाटतील,
भूमीतल्या सरपटणाऱ्यांप्रमाणे ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर निघतील.
परमेश्वर आमचा देव याच्याकडे ती भयभीत होऊन येतील,
आणि ते तुझ्यामुळे घाबरतील.
18तुझ्यासारखा देव कोण आहे?
जो तू पापांची क्षमा करतोस
आणि आपल्या वतनाच्या उरलेल्यांचा अपराध मागे टाकतो.
तो अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणार नाही,
कारण त्यास दयाळू व्हायला आवडते.
19तो आम्हावर पुन्हा दया करील;
तो आमच्या पापांचा आपल्या पायाखाली चुराडा करील
आणि आमची सर्व पापे समुद्रात खोलवर फेकून देईल.
20पुरातन दिवसात आमच्या पूर्वजांशी तू ज्याविषयी शपथ वाहीली ती अशी की,
तू याकोबाला सत्यता आणि अब्राहामाला कराराचा विश्वासूपणा देशील.

Currently Selected:

मीखा 7: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in