1 करिंथ 12
12
पवित्र आत्म्याच्या दानांची विविधता
1बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. 2तुम्ही यहुदीतर होता तेव्हा जसे वळण तुम्हांला लावण्यात येत होते, तसे तुम्ही त्या निर्जीव मूर्तींकडे बहकले जात होता, हे तुम्हांला ठाऊक आहे. 3म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही, “येशू शापभ्रष्ट आहे”, असे म्हणू शकत नाही आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्यावाचून कोणालाही “येशू प्रभू आहे”, असे म्हणता येत नाही.
4कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु एकच पवित्र आत्मा ती दाने देत असतो. 5सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु त्यांच्याद्वारे एकाच प्रभूची सेवा केली जाते 6आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. 7सार्वजनिक हितासाठी प्रत्येक माणसाच्या जीवनात पवित्र आत्म्याचा अविष्कार होत असतो. 8एखाद्याला पवित्र आत्म्याद्वारे शहाणपणाचे बोल मिळतात तर दुसऱ्याला त्याच पवित्र आत्म्याकडून विद्येची वाणी दिली जाते. 9एखाद्याला त्याच आत्म्याकडून विश्वास, एखाद्याला त्याच आत्म्याद्वारे निरोगी करण्याची कृपादाने, 10अद्भुत कार्य करणे, संदेश देणे, आत्मे ओळखणे, अपरिचित भाषा बोलणे, निरनिराळ्या अपरिचित भाषांचा अर्थ सांगणे ही कृपादाने एकेकाला दिली जातात. 11ही सर्व कृपादाने देणारा व कार्ये करून घेणारा पवित्र आत्मा एकच आहे; तो आपल्या इच्छेप्रमाणे ती एकेकाला वाटून देतो.
शरीरावरून घेतलेले उदाहरण
12जसे शरीर एक असून त्याला पुष्कळ अवयव असतात आणि त्या शरीराचे पुष्कळ अवयव असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. 13त्याचप्रमाणे आपण यहुदी असू किंवा ग्रीक असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने अभिषिक्त झालो आहोत.
14कारण शरीर म्हणजे एक अवयव नव्हे, तर अनेक अवयव मिळून शरीर झालेले असते. 15जर पाय म्हणेल, “मी हात नाही, म्हणून मी शरीराचा नाही”, तर त्यावरून तो शरीराचा नाही, असे होत नाही. 16जर कान म्हणेल, “मी डोळा नाही, म्हणून मी शरीराचा नाही”, तर त्यावरून तो शरीराचा नाही, असे होत नाही. 17सबंध शरीर डोळा असते, तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? 18देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव जोडून ठेवला आहे. 19ते सर्व मिळून एकच अवयव असते, तर शरीर कोठे असते? 20तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक आहे.
21डोळा हाताला म्हणू शकत नाही, “मला तुझी गरज नाही.” तसेच मस्तक पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.” 22उलट, शरीराचे जे अवयव कमजोर दिसतात त्यांच्याविना आपले चालू शकत नाही. 23शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांची आपण खास काळजी घेतो आणि आपल्या कुरूप अंगांना महत्त्व देतो. 24आपल्या सुरूप अंगांना अशी गरज नाही. ज्यांना गरज आहे, त्यांना विशेष महत्त्व मिळावे अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे. 25म्हणून शरीरात फूट नाही, तर अवयव एकमेकांची सारखीच काळजी घेत असतात. 26एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव दुखावतात किंवा एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव सुखावतात.
27तुम्ही सर्व मिळून ख्रिस्ताचे शरीर असून एकेक जण त्याचे अवयव आहात. 28देवाने ख्रिस्तमडंळीत प्रत्येकाला विशिष्ट जागी नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, त्यानंतर अद्भुत कृत्ये करणारे, आरोग्य देण्याचे कृपादान मिळालेले, साहाय्यक , नेतृत्व करणारे व अपरिचित भाषा बोलणारे असे नेमले आहेत. 29सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्ये करणारे आहेत काय? 30आरोग्य देण्याचे कृपादान सगळ्यांनाच मिळाले आहे काय? सगळेच अपरिचित भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय? 31परंतु तुम्ही अधिक महान कृपादाने मिळवण्यासाठी झटा. मी मात्र तुम्हांला एक अधिक उत्कृष्ट मार्ग दाखवतो.
Currently Selected:
1 करिंथ 12: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.