1 करिंथ 3
3
व्यक्ति पूजेचा निषेध
1बंधुजनहो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे, तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे ऐहिक लोकांबरोबर किंबहुना जसे ख्रिस्ती श्रद्धेतील बालकांबरोबर बोलावे तसे मला बोलावे लागते. 2मी तुम्हांला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्या वेळेस तुम्ही त्यासाठी तयार नव्हता आणि अजूनही नाही. 3तुम्ही अजूनही ऐहिक लोकांसारखे आहात. ज्याअर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्याअर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही व मानवी प्रवृत्तीने चालता की नाही? 4कारण जेव्हा एखादा म्हणतो, “मी पौलाचा आहे,” दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसचा आहे”, तेव्हा तुम्ही दैहिकच आहात की नाही?
5तर मग अपुल्लोस कोण, पौल कोण? ज्यांच्याद्वारे तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला, असे ते सेवक आहेत. ते प्रभूने नेमून दिल्याप्रमाणे आपले कार्य करीत आहेत. 6मी रोप लावले, अपुल्लोसने त्याला पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली. 7त्यामुळे लावणारा आणि पाणी घालणारा महत्त्वाचा नाही, तर वाढवणारा देव हाच काय तो महत्त्वाचा आहे. 8लावणारा व पाणी घालणारा हे सारखेत आहेत, तरी देव प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे त्याची मजुरी देईल. 9आम्ही देवाचे सहकारी आहोत, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात.
शिक्षकांवरील जबाबदारी
10माझ्यावर झालेल्या देवाच्या कृपेच्या परिमाणाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधकाम करत आहे. मात्र त्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहोत, ह्याविषयी प्रत्येक कामगाराने दक्षअसले पाहिजे. 11येशू ख्रिस्त हा पाया आहे, त्याच्यावाचून दुसरा पाया नाही. 12ह्या पायावर जो तो सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत किंवा पेंढा ह्यांनी ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे बांधकाम करतो आहे 13आणि बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, ख्रिस्ताचा दिवस ते उघडकीस आणील, कारण तो दिवस अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे, ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल. 14त्या पायावर बांधलेले ज्याचे काम टिकेल त्याला पारितोषिक मिळेल. 15ज्याचे काम जळून जाईल, त्याचे नुकसान होईल, तथापि तो स्वतः जणू काही अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारला जाईल.
16तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वसती करतो, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? 17जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश केला, तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्ही ते मंदिर आहात.
18कोणी स्वतःला फसवून घेऊ नये, ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत, असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे. 19कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे; कारण ‘तो ज्ञानी लोकांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो’, असा धर्मशास्त्रलेख आहे 20आणि ‘ज्ञानी लोकांचे विचार व्यर्थ आहेत, हे परमेश्वर जाणतो’, असा दुसरा धर्मशास्त्रलेख आहे. 21म्हणून माणसांविषयी कोणी अभिमान बाळगू नये. कारण सर्व काही तुमचे आहे. 22पौल, अपुल्लोस व पेत्र; जग, जीवन व मरण; वर्तमानकाळाच्या गोष्टी व भविष्यकाळाच्या गोष्टी - सर्व काही तुमचे आहे. 23आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.
Currently Selected:
1 करिंथ 3: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.