1 करिंथ 6
6
ख्रिस्ती लोकांची न्यायालयात गेलेली भांडणे
1तुमच्यापैकी कुणाचा दुसऱ्याबरोबर वाद असला, तर त्याचा निकाल लावून घेण्यासाठी तो आपले प्रकरण पवित्र जनांपुढे न आणता अनीतिमान न्यायाधीशांपुढे नेण्याचे धाडस करीत आहे काय? 2पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करतील, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुमच्याकडून जगाचा न्यायनिवाडा व्हावयाचा आहे, तर तुम्ही अगदी क्षुल्लक बाबींचा न्याय करण्यास अपात्र आहात काय? 3आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत, हे तुम्हाला ठाऊक आहे ना? तर मग सर्वसामान्य गोष्टींविषयी सांगणे नकोच. 4तुम्हांला सर्वसामान्य प्रकरणांचा न्यायनिवाडा करायचा असतो, तेव्हा ख्रिस्तमंडळीत ज्यांना स्थान नाही त्यांना कसे नेमता? 5तुम्हांला शरम वाटावी म्हणून मी असे म्हणतो. ज्याला भावाभावाचा निवाडा करता येईल, असा एकही सुज्ञ माणूस तुमच्यांमध्ये नाही की काय? 6परंतु भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीही विश्वास न ठेवणाऱ्यापुढे करतो, हे कसे?
7तुम्ही एकमेकांवर खटले भरता हे तुमच्या अपयशाचे लक्षण आहे. त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करत नाही? त्यापेक्षा झालेली फसवणूक का सोसून घेत नाही? 8उलट तुम्ही स्वतः अन्याय व फसवणूक करता आणि तीही बंधुजनांची करता!
अशुद्धता ख्रिस्ती जीवनक्रमाशी विसंगत
9अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, समलिंगी, लैंगिक दृष्ट्या विकृत जन, 10चोर, लोभी, मद्यपी, चहाडखोर व लुटारू ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही 11आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही आता तुमच्या पापांपासून शुद्ध झाला आहात; तुम्ही स्वतःचे समर्पण देवाला केले आहे; आपल्या प्रभू ख्रिस्ताने व आपल्या देवाच्या आत्म्याने तुमचे देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित केले आहेत.
12ज्या गोष्टींची मला कायद्याने मुभा दिली आहे त्या सर्व गोष्टी माझ्या हिताच्या असतीलच असे नाही. सर्व गोष्टींची मला मुभा आहे, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही. 13अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे, तरीही त्या दोहोंचाही अंत देव करील. शरीर जारकर्मासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे. 14देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील.
15तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते वेश्येचे अवयव करावेत काय? कधीच नाही! 16जो वेश्येशी संबंध ठेवतो, तो तिच्याबरोबर एकशरीर होतो, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? कारण ‘ती दोघे एकदेह होतील’, असे धर्मशास्त्र म्हणते. 17परंतु जो प्रभूशी नाते जोडतो, तो आध्यात्मिकरीत्या त्याच्याशी एकरूप होतो.
18जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो, ते शरीराबाहेरून होते. परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीरामध्ये पाप करतो. 19तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तुम्ही स्वतःचे मालक नाही. तर तुम्ही प्रभूचे आहात; 20कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करा.
Currently Selected:
1 करिंथ 6: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.