1 थेस्सल 2
2
शुभवर्तमानप्रसारकार्याचे समर्थन
1बंधुजनहो, तुमच्यामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हांला स्वतःलाही माहीत आहे. 2पूर्वी फिलिप्पै येथे आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून, तीव्र विरोधाला तोंड देत असतानाही देवाचे शुभवर्तमान तुम्हांला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हांला मिळाले, हे तुम्हांला माहीतच आहे. 3आमचे आवाहन चुकीच्या शिकवणुकीवर किंवा अनुचित उद्दिष्टांवर आधारित नसून आम्ही कोणाची फसवणूक करू इच्छीत नाही. 4उलट, शुभवर्तमान आमच्याकडे सोपवून देण्यास देवाने आम्हांला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ते त्याच्या इच्छेनुसार सांगतो. आम्ही माणसांना खुश करण्यासाठी न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव ज्यामुळे प्रसन्न होईल, ते बोलतो. 5आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो, हे तुम्हांला माहीत आहे. तसेच लोभ झाकण्याकरिता शब्द वापरत नव्हतो. देव आमचा साक्षी आहे! 6आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते तरी माणसांकडून म्हणजे तुमच्याकडून किंवा दुसऱ्यांपासून सन्मान मिळविण्याची खटपट आम्ही करत नव्हतो. 7तर आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. 8आम्हांला तुमच्याविषयी जिव्हाळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हांला केवळ देवाच्या शुभवर्तमानाचे दानच देण्यास नव्हे, तर तुमच्यावरील आमच्या गाढ प्रीतीमुळे तुमच्याकरिता आपला जीवही देण्यास तयार होतो. 9बंधुंनो, आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे. तुमच्यातील कुणावर आमचा भार पडू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुमच्यापुढे देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा केली.
10तुम्हां विश्वास ठेवणाऱ्यांत आमची वर्तणूक शुद्ध, सात्विक व निर्दोष कशी होती, ह्याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही साक्षी आहे. 11तुम्हांला ठाऊक आहे की, बाप आपल्या मुलांना बोध करतो तसे आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आवर्जून विनंती करीत सांगत होतो की, 12त्याच्या राज्यात व वैभवात तुम्हांला पाचारण करणाऱ्या देवाला शोभेल असे तुम्ही वागावे.
छळ
13दुसऱ्या एका कारणासाठीदेखील आम्ही देवाचे निरंतर आभार मानतो. ते म्हणजे तुम्ही आमच्याकडून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे, तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक ते तसेच आहे; कारण देव तुम्हां विश्वास ठेवणाऱ्यांत कार्य करीत आहे. 14बंधूंनो, यहूदीयातील देवाच्या ज्या ख्रिस्तमंडळ्या ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झालात म्हणजे त्यांनी यहुदी लोकांच्या हातून जी दुःखे सोसली तीच तुम्हीदेखील आपल्या देशबांधवांच्या हातून सहन केलीत. 15यहुदी लोकांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही ठार मारले आणि आमचा छळ करून आम्हांला बाहेर घालविले. ते देवाला जे प्रिय आहे, ते करत नाहीत व ते सर्व माणसांचेही विरोधक झाले आहेत. 16यहुदीतरांचे तारण व्हावे म्हणून आम्ही संदेश देतो, त्यालाही ते मनाई करतात. त्यांच्या पापांचा घडा भरला आहे. परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर ओढवला आहे!
पौलाचे वाचकांकडे लक्ष
17बंधुजनहो, आम्ही मनाने नव्हे तर देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हांला दुःख होऊन तुम्हांला प्रत्यक्ष भेटण्याचा आम्ही फार उत्कंठेने प्रयत्न केला. 18आम्ही तुमच्याकडे येण्याची इच्छा प्रकट केली. मी पौलाने एकदा नाही तर अनेकदा तशी इच्छा बाळगली. परंतु सैतानाने आम्हांला अडविले. 19अर्थात, आपल्या प्रभू येशूच्या आगमनसमयी त्याच्यासमोर तुम्हीच आमची आशा, आनंद व अभिमानास्पद मुकुट आहात ना? 20खरोखर तुम्ही आमचे वैभव व आमचा आनंद आहात.
Currently Selected:
1 थेस्सल 2: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.