YouVersion Logo
Search Icon

1 तीमथ्य 5

5
1ज्येष्ठ माणसाला टाकून बोलू नकोस, तर त्याला पित्यासमान समजून त्याचा आदर कर. 2युवकांना बंधूसमान मानून, वडीलधाऱ्या स्त्रियांस मातेसमान मानून व तरुण स्त्रियांना पूर्ण शुद्धतेने बहिणीसमान मानून बोध कर.
ख्रिस्तमंडळीतील विधवांविषयी
3ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत, त्यांचा सन्मान कर. 4कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली, तर त्यांनी प्रथम आपल्या घरातल्या कुटुंबीयांबरोबर धार्मिकतेने वागून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे; कारण हे देवाला आवडते. 5जी विधवा खरोखरीची विधवा आहे, तिने आपली आशा देवावर ठेवली आहे आणि रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करत राहते. 6परंतु जी विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे. 7त्यांनी दोषविरहित व्हावे म्हणून त्यांना मार्गदर्शन कर. 8परंतु जर कोणी व्यक्ती नातलगांची व विशेषकरून आपल्या घरच्यांची देखभाल करत नसेल, तर तिने विश्वास नाकारला आहे. ती व्यक्ती विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तींपेक्षा वाईट आहे.
9साठ वर्षांपेक्षा अधिक वयाची विधवा असेल, तिचेच नाव विधवांच्या यादीत समाविष्ट करावे. 10शिवाय तिचे एकदाच लग्न झालेले असावे व सत्कृत्यांसाठी, मुलाबाळांचा सांभाळ, पाहुणचार, पवित्र लोकांची नम्र सेवा, संकटग्रस्तांना साहाय्य ह्यासाठी ती नावाजलेली असावी.
11परंतु तरुण विधवांची ह्या यादीत नोंद करू नये; कारण जेव्हा त्या कामुक होऊन लग्न करावयास पाहतात तेव्हा त्या ख्रिस्ताच्या विरुद्ध वागतात 12आणि आपल्या पहिल्या विश्‍वासाचा भंग केल्यामुळे त्या दोषी ठरतात. 13शिवाय घरोघर फिरून त्या वेळ वाया घालवितात. इतकेच नव्हे, तर वटवट व लुडबूड करणाऱ्या होतात आणि बोलू नये ते बोलतात. 14ह्यास्तव माझी इच्छा अशी आहे की, तरुण विधवांनी लग्न करावे, मुलांना जन्म द्यावा, घर चालवावे ज्यामुळे विरोधकांना निंदा करण्यास निमित्त सापडू नये; 15कारण कित्येक विधवा बहकून सैतानामागे गेल्या आहेत. 16मात्र जर कोणा विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात विधवा असल्या, तर त्या व्यक्तीने त्यांची देखभाल करावी, ख्रिस्तमंडळीवर त्यांचा भार पडू देऊ नये, म्हणजे ज्या खरोखरीच्या विधवा आहेत त्यांची ख्रिस्तमंडळीला तरतूद करता येईल.
वडीलजन
17जे वडीलजन चांगल्या प्रकारे आपली सेवा करतात, विशेषकरून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात त्यांना दुप्पट सन्मान मिळावा; 18कारण धर्मशास्त्र म्हणते, ‘बैल मळणी करीत असताना त्याला मुसके बांधू नकोस आणि कामगाराला आपली मजुरी मिळणे योग्य आहे.’ 19दोन किंवा तीन साक्षीदार असल्यावाचून कोणत्याही वडीलजनावरील आरोप स्वीकारू नकोस. 20इतरांना भय वाटावे म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वांसमक्ष निषेध कर.
21देव, ख्रिस्त येशू व निवडलेले देवदूत ह्यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की, मनात पूर्वग्रह न ठेवता हे आदेश पाळ, पक्षपाताने काही करू नकोस. 22प्रभूच्या सेवेसाठी समर्पित करण्याकरिता प्रार्थना करण्यास उतावीळपणे कोणावर हात ठेवू नकोस. दुसऱ्यांच्या पापात तू सहभागी होऊ नकोस तर स्वतःला शुद्ध राख.
23ह्यापुढे नुसते पाणीच पीत राहू नकोस, तर चांगल्या पचनक्रियेसाठी आणि आपल्या वारंवार होणाऱ्या आजारासाठी थोडा द्राक्षारस घे.
24कित्येक माणसांची पापे उघड असून ती न्यायनिवाड्यासाठी त्यांच्या पुढे असतात परंतु इतर काहींचा न्यायनिवाडा नंतर होतो. 25त्याचप्रमाणे काही चांगली कृत्येही उघड आहेत आणि जी तितकीशी उघड नाहीत, ती गुप्त राखली जाऊ शकत नाहीत.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in