YouVersion Logo
Search Icon

2 करिंथ 2

2
1मी मनात निश्चय केला होता की, दुःख देण्यास तुमच्याकडे पुन्हा येऊ नये. 2जर मी तुम्हांला दुःख देऊ लागलो, तर मला आनंद कोण देणार? ज्यांना मी दुःखी केले होते तेच ना? 3म्हणूनच मी तुम्हांला पहिले पत्र लिहिले होते, ज्यामुळे मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद होईल, त्यांच्यापासून मला दुःख होऊ नये. मला तुम्हां सर्वांविषयी अशी खातरी आहे की, माझा आनंद तो तुमच्या सर्वांचा आनंद आहे. 4मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळीत तुम्हांला लिहिले होते. तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नव्हे, तर तुमच्यावर माझी जी विपुल प्रीती आहे, ती तुम्हांला कळून यावी म्हणून लिहिले.
पश्चात्ताप केलेल्यास क्षमा
5परंतु जर कोणी दुसऱ्याला दुःख दिले असेल, तर त्याने ते मलाच नाही, तर काही प्रमाणात तुमच्या सर्वांना दिले. 6अशा मनुष्याला तुमच्यापैकी बहुतेकांनी दिली ती शिक्षा पुरे. 7म्हणून आता तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे, म्हणजे तो अतिदुःखात बुडून जाऊ नये. 8म्हणून मी तुम्हांला आर्जवून सांगतो, त्याच्यावर तुमची प्रीती आहे, अशी त्याची पुन्हा खातरी करून द्या. 9हे मी जे लिहिले होते त्यात माझा आणखी एक हेतू होता तो असा की, तुम्ही सर्व बाबतीत आज्ञापालन करता की नाही, हे मला पहायचे होते. 10ज्या कोणाला तुम्ही क्षमा करता त्याला मीही क्षमा करतो. मी क्षमा केली असली, तर ज्या कशाची क्षमा केली ती तुमच्याकरता ख्रिस्तासमक्ष केली आहे. 11यात हेतू हा की, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.
संकटे व जयोत्सवाचे प्रसंग
12असो, मी ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगण्यासाठी त्रोवस येथे आल्यावर माझ्यासाठी प्रभूने दार उघडले. 13परंतु माझा बंधू तीत हा मला भेटला नाही म्हणून माझ्या जिवाला चैन पडेना. तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियात निघून गेलो.
14परंतु ख्रिस्ताच्या विजययात्रेत बंदिवान म्हणून सहभागी करणाऱ्या आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध पसरविणाऱ्या देवाला आम्ही धन्यवाद देतो! 15कारण तारण होत असलेल्या आणि नाश होत असलेल्या अशा लोकांसाठी आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा सुगंध आहोत; 16नाश होत असलेल्या लोकांसाठी मृत्यूचा मरणसूचक गंध आणि तारणप्राप्ती होत असलेल्या लोकांसाठी जीवनाचा जीवनदायक गंध आहोत. हे कार्य करावयास कोण सक्षम आहे? 17पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर देवाने आम्हांला पाठवले आहे म्हणून प्रामाणिकपणे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताचे सेवक म्हणून बोलणारे आहोत.

Currently Selected:

2 करिंथ 2: MACLBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in