2 पेत्र 1
1
नमस्कार
1येशू ख्रिस्ताचा सेवक व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून:
आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मूल्यवान विश्वास मिळालेल्या लोकांना,
2देव व आपला प्रभू येशू ह्यांच्या ज्ञानाद्वारे तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.
ख्रिस्ती मनुष्याचे हक्क व शील
3ज्याने त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने तुम्हांआम्हांला त्याच्या स्वतःच्या वैभवात व चांगुलपणात सहभागी होण्यासाठी पाचारण केले; त्याच्या ज्ञानाच्या द्वारे जीवनास व धार्मिकतेस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. 4त्याच्या योगे मूल्यवान व अतिमहान अशी अभिवचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठी की, त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. 5ह्याच कारणासाठी तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात चांगुलपणाची, चांगुलपणात ज्ञानाची, 6ज्ञानात आत्मनियंत्रणाची, आत्मनियंत्रणात धीराची, धीरात धार्मिकतेची, 7धार्मिकतेत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. 8कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढत असले तर, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानात तुम्ही सक्रिय व फलद्रूप व्हाल. 9ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, दूरदृष्टी नसलेला आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे.
10तर मग बंधूंनो, तुम्हांला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे कधीही पतन होणार नाही 11आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या शाश्वत राज्यात पूर्ण हक्काने तुमचा प्रवेश होईल.
जागृत राहण्याबाबत इशारा
12ह्या कारणासाठी जरी तुम्हांला ह्या गोष्टी माहीत आहेत आणि तुम्हांला प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झालेले आहात 13तरी मी जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हांला त्याची आठवण देऊन जागृत ठेवणे, हे मला उचित वाटते. 14मला ठाऊक आहे की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळविल्याप्रमाणे मला हे जग लवकरच सोडावे लागणार आहे 15आणि माझ्या निधनानंतरही ह्या गोष्टीची आठवण सर्वदा तुम्हांला करता यावी म्हणून मी शक्य ती व्यवस्था करीन.
पेत्राची स्वतःची साक्ष व संदेष्ट्यांची साक्ष
16चातुर्याने कल्पिलेल्या कथांस अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्यासबंधाने तुम्हांला कळविले असे नाही, तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहिले आहे. 17त्याला देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाला, तेव्हा सर्वोच्च गौरवशाली देवाकडून अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र आहे, तो मला परमप्रिय आहे, मी त्याच्यावर प्रसन्न आहे!’ 18त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली.
19म्हणून आम्हांला अधिक खात्री वाटते की, संदेष्ट्यांचे वचन जे आमच्याजवळ आहे, ते काळोखात प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल, तर बरे होईल. 20प्रथम हे ध्यानात ठेवा की, धर्मशास्त्रातील कोणत्याही परमेश्वरप्रेरित संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने करता येत नाही. 21कारण परमेश्वरप्रेरित संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही. तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश सांगितला आहे.
Currently Selected:
2 पेत्र 1: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.