YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांचे कार्य 12

12
हेरोदने केलेला छळ व पेत्राची सुटका
1ह्याच सुमारास हेरोद राजाने ख्रिस्तमंडळीतल्या काही जणांचा छळ सुरू केला. 2योहानचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने ठार मारले. 3ते यहुदी लोकांना आवडले, असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. 4त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात टाकले आणि त्याच्यावर पहारा ठेवण्यासाठी त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. ओलांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे सादर करावे, असा त्याचा बेत होता. 5ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता. मात्र त्याच्याकरिता देवाजवळ ख्रिस्तमंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती.
6हेरोद त्याला बाहेर लोकांसमोर आणणार होता, त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायांमध्ये झोपला होता. पहारेकरी तुरुंगाच्या दरवाजापुढे पहारा करत होते. 7अचानक, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड पडला. त्याने पेत्राच्या खांद्यावर थापटून त्याला जागे करून म्हटले, “लवकर उठ.” तत्क्षणी त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. 8देवदूत त्याला म्हणाला, “तयार हो व पायांत वाहाणा घाल.” त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, “तू आपला झगा घालून माझ्यामागे ये.” 9तो निघून त्याच्यामागे गेला. तरी देवदूताने जे केले ते खरोखर घडत आहे, यावर त्याचा विश्वास बसेना. आपण दृष्टान्त पाहत आहोत, असे त्याला वाटले. 10नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते शहरात जाण्याऱ्या लोखंडी दरवाज्याजवळ आल्यावर तो त्यांच्यासाठी आपोआप उघडला गेला. ते बाहेर पडून पुढे एका रस्त्यावरून चालून गेले, तोच देवदूत पेत्रला सोडून गेला.
11पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला खरोखर कळले आहे की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदच्या तावडीतून यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”
12हे लक्षात आल्यावर तो योहान ऊर्फ मार्कची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते. 13तो बाहेरच्या दरवाजाची कडी वाजवत असता रूदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली. 14तिने पेत्राचा आवाज ओळखला आणि तिला इतका आनंद झाला की, दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सर्वांना सांगितले, “पेत्र दाराशी उभा आहे.” 15त्यांनी तिला म्हटले, “तू वेडी आहेस”, तरीही तिने खातरीपूर्वक सांगितले, “मी म्हणते तसेच आहे.” ते म्हणाले, “तो त्याचा देवदूत आहे.”
16पेत्र तसाच ठोठावत राहिला असता शेवटी त्यांनी दरवाजा उघडला. त्याला पाहून ते थक्क झाले! 17त्याने हाताने त्यांना खुणावून गप्प राहायला सुचवून आपणाला प्रभूने कसे बाहेर काढले, हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले आणि म्हटले, “हे याकोबला व बंधुजनांना सांगा.” नंतर तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला.
18दिवस उगवल्यावर, पेत्राचे काय झाले, ह्याविषयी शिपायांत मोठी गडबड उडाली. 19हेरोदने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही म्हणून त्याने पहारेकऱ्यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. त्यानंतर हेरोद यहुदियातून निघून कैसरियात जाऊन राहिला.
हेरोदचा मृत्यू
20सोर व सिदोन येथील लोकांवर हेरोद रागावला होता म्हणून ते एक गट करून त्याच्याकडे आले व राजाच्या महालावरील अधिकारी ब्लस्त ह्याला अनुकूल करून घेऊन त्यांनी समेट करण्याची विनंती केली कारण त्यांच्या देशाला हेरोद राजाचा देश अन्नसामग्री पुरवीत असे. 21नंतर एका नियुक्त दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. 22लोक ओरडत राहिले, “ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे.” 23त्याने देवाला श्रेय दिले नाही म्हणून प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला.
24दरम्यानच्या काळात देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला.
25बर्णबा व शौल हे आपले सेवाकार्य पूर्ण करून योहान ऊर्फ मार्कला बरोबर घेऊन यरुशलेमहून परत निघाले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for प्रेषितांचे कार्य 12