YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांचे कार्य 14

14
इकुन्य येथे पौल व बर्णबा
1इकुन्य येथे असे झाले की, यहुदी लोकांच्या सभास्थानात पौल व बर्णबा दोघे मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले की, यहुदी व ग्रीक ह्यांच्या विशाल लोकसमुदायाने विश्वास ठेवला. 2परंतु विरोधी यहुदी लोकांनी यहुदीतरांचे मन बंधुजनांविरुद्ध चिथवून कलुषित केले. 3ते बरेच दिवस तेथे राहिले व प्रभूविषयी निर्भीडपणे बोलले. प्रभूनेदेखील त्याच्या कृपेच्या वचनाचे समर्थन केले म्हणजे त्यांच्या हस्ते चिन्हे व अद्भूत कृत्ये होऊ दिली. 4हे पाहून नगरातील लोकसमुदायात फूट पडली. काही जणांनी यहुदी लोकांची बाजू घेतली तर इतरांनी प्रेषितांची बाजू उचलून धरली.
5त्यांचा उपमर्द करून त्यांना दगडमार करण्याकरिता काही परराष्ट्रीय व यहुदी आपल्या अधिकाऱ्यांसह त्यांच्यावर धावून जाणार होते. 6हे ओळखून प्रेषित लुकवनिया येथील लुस्त्र व दर्बे ह्या नगरांत व सभोवतालच्या प्रदेशांत पळून गेले. 7आणि तेथे ते शुभवर्तमान घोषित करीत राहिले.
लुस्त्र येथे पौल व बर्णबा
8त्या वेळी लुस्त्रा येथे पायांनी अधू असा एक माणूस होता. तो जन्मतः पांगळा होता व कधीच चालला नव्हता. 9तो पौलाचे बोलणे ऐकत बसला होता. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ, असा विश्वास आहे, असे पाहून 10मोठ्याने म्हटले, “तू आपल्या पायांवर नीट उभा राहा.” तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. 11पौलने जे केले ते पाहून लोकसमुदाय लुकवनी भाषेत ओरडून बोलले, “देव माणसाच्या रूपाने आपल्यामध्ये उतरले आहेत.” 12त्यांनी बर्णबाला ज्यूपिटर म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले. 13नगरापुढे असलेल्या ज्यूपिटरच्या याजकाने बैल व फुले प्रवेशद्वाराजवळ आणली. लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे, असे त्याच्या मनात होते.
14हे ऐकून बर्णबा व पौल ह्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून ओरडून म्हटले, 15“गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही मर्त्य माणसे आहोत, तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले. त्या जिवंत देवाकडे वळावे, असे शुभवर्तमान आम्ही तुम्हांला सांगतो. 16त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गाने चालू दिले. 17त्याने त्याच्या सत्कृत्यांद्वारे त्याच्या अस्तित्वाचे पुरावे सादर केले आहेत. तो आकाशातून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हांला देतो आणि अन्नाने व हर्षाने तुम्हांला मन भरून तृप्त करतो.” 18असे सांगून त्यांनी आपणाला बलिदान अर्पण करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले.
19पिसिदियामधील अंत्युखिया येथून व इकुन्य येथून कित्येक यहुदी आले, त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मरण पावला, असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले. 20पण त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर तो उठला व नगरात आला. दुसऱ्या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बे येथे गेला.
अंत्युखियास परतणे
21त्या नगरात शुभवर्तमान घोषित करून त्यांनी पुष्कळ शिष्य मिळवल्यावर लुस्त्र, इकुन्य व पिसिदियामधील अंत्युखिया या नगरांत ते परत आले. 22शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला, “विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांतून देवाच्या राज्यात जावे लागते.” 23त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक ख्रिस्तमंडळीत वडीलजन निवडले आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्याच्याकडे त्यांना सोपवले.
24ते पिसिदियामधून पंफुल्यात गेले 25आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले. 26तेथून ते अंत्युखियास जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते, त्याकरिता त्यांना येथूनच देवाच्या कृपेवर सोपवून पाठविण्यात आले होते.
27तेथे पोहचल्यावर त्यांनी ख्रिस्तमंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि यहुदीतरांकरिता विश्वासाचे दार कसे उघडले, हे सांगितले. 28तेथे ते बराच काळ शिष्यांबरोबर राहिले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for प्रेषितांचे कार्य 14