YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांचे कार्य 17

17
थेस्सलनीका येथे पौल
1पौल व सीला अंफिपुली व अपुल्‍लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास गेले. तेथे यहुदी लोकांचे प्रार्थनामंदिर होते. 2तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन तीन साबाथ त्यांच्याबरोबर धर्मशास्त्राविषयी वादविवाद केला. 3त्याने धर्मशास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले, “ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते आणि ज्या येशूची मी तुमच्यापुढे घोषणा करीत आहे, तोच तो ख्रिस्त आहे.” 4तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खातरी होऊन ते पौल व सीला ह्यांना येऊन मिळाले. तसेच ग्रीक लोकांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यांत प्रमुख स्त्रिया काही थोड्याथोडक्या नव्हत्या.
5परंतु यहुदी लोकांनी हेव्याने आपल्याबरोबर बाजारातले काही लोक घेऊन व घोळका जमवून शहरभर भय निर्माण केले. यासोन नावाच्या गृहस्थाच्या घरावर ह्रा करून पौल व सीला ह्यांना बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली. 6परंतु ते त्यांना मिळाले नाहीत, तेव्हा त्यांनी यासोनला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढत नेऊन आरडाओरड करत म्हटले, “ज्यांनी जगाची उलथापालथ केली, ते येथेही आले आहेत. 7त्यांना यासोनने आपल्या घरात घेतले आहे आणि हे सर्व जण कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे, असे म्हणतात.” 8ह्या वक्तव्यामुळे लोक व शहराचे अधिकारी खवळले. 9त्यानंतर त्यांनी यासोनचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले.
बिरुया येथे पौल
10बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लगेच रातोरात बिरुया येथे पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहुदी लोकांच्या प्रार्थनामंदिरात गेले. 11तेथील लोक थेस्सलनीकामधल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते, त्यांनी मोठ्या उत्सुकतेने त्यांच्या संदेशाचा स्वीकार केला आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते दररोज धर्मशास्त्राचा अभ्यास करू लागले. 12ह्यावरून त्यांतील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित ग्रीक स्त्रीपुरुषांनी विश्वास ठेवला. 13परंतु पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे, हे थेस्सलनीकातल्या यहुदी लोकांना समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांचे कान फुंकले. 14त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्रकिनाऱ्याजवळ त्वरित पाठवले. मात्र सीला व तीमथ्य हे तेथेच राहिले. 15पौलाला पोहचविणाऱ्यांनी त्याला अथेनैपर्यंत नेले. सीला व तीमथ्य ह्यांनी आपणाकडे होईल तितक्या लवकर यावे, असा पौलाचा आदेश घेऊन ते परत आले.
अथेनै येथे पौल
16पौल अथेनै येथे सीला व तीमथ्य यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे, असे पाहून तो मनात खवळला. 17ह्यामुळे तो प्रार्थनामंदिरात यहुदी लोक, यहुदीतर लोक आणि चौकात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज चर्चा करीत असे. 18एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी यांपैकी कित्येक तत्वज्ञान्यांनी त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले, “हा बडबड्या काय बोलतो?”
दुसरे म्हणाले, “हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो.” कारण पौल येशू व पुनरुत्थान ह्यांविषयीच्या शुभवर्तमानाची घोषणा करीत असे. 19म्हणून त्यांनी त्याला धरून अरीयपगा परिषदेत नेऊन म्हटले, “तुम्ही देत असलेली ही नवी शिकवण काय आहे, हे आम्हांला समजावून सांगाल काय? 20तुम्ही आम्हांला काही अपरिचित गोष्टी ऐकवीत आहात, त्यांचा अर्थ काय हे समजून घ्यावे, अशी आमची इच्छा आहे.” 21काहीतरी नवलाईच्या गोष्टी सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथेनैकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांचा वेळ जात नसे.
परिषदेपुढे पौलाने केलेले भाषण
22पौल सभेपुढे उभा राहून म्हणाला, “अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्व फार धार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्मिक आहात, असे मला दिसते; 23कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, ‘अज्ञात देवाला’ ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता, ते मी तुम्हांला प्रकट करतो. 24ज्या देवाने जग व त्यातले सर्व निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही. 25त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही; कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. 26त्याने एका माणसापासून माणसांचे सर्व वंश निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या पाठीवर राहावे, अशी व्यवस्था केली आहे. त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत. 27अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध घ्यावा, म्हणजे त्याला प्राप्त करून घ्यावे. तरीही तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. 28आपले जीवन, आपली हालचाल आणि आपले अस्तित्व त्याच्या ठायी आहे. जसे तुमच्या कवींपैकीही काहींनी म्हटले आहे, “आपण त्याचीच लेकरे आहोत.”
29तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे, असे आपल्याला वाटता कामा नये. 30अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा, अशी आज्ञा तो माणसांना करतो. 31कारण त्याने असा एक दिवस नेमला आहे की, त्या दिवशी त्याने निवडलेल्या मनुष्याच्याद्वारे तो जगाचा न्यायनिवाडा नीतीने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून ह्याच्याविषयीचे प्रमाण सर्वांना पटवून दिले आहे!”
32त्या वेळी मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. परंतु इतर काही जण म्हणाले, “ह्याविषयी पुन्हा कधीतरी तुमचे विचार ऐकायला आम्हांला आवडेल.” 33इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. 34काही माणसांनी पौलाशी सहमत होऊन त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यांत अरीयपगा परिषदेचा सभासद दिओनुस्य, दामारी नावाची स्त्री व इतर काही लोक होते.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for प्रेषितांचे कार्य 17