प्रेषितांचे कार्य 25
25
फेस्तसमोर पौलाची चौकशी
1फेस्त प्रांतात आल्यावर तीन दिवसांनी तो कैसरियातून यरुशलेम येथे गेला. 2तेव्हा उच्च याजक व यहुदी लोकांमधील पुढारी ह्यांनी त्याच्याकडे पौल विरुद्ध फिर्याद नेली 3आणि त्याला यरुशलेममध्ये बोलावून घ्यावे, अशी त्याच्याकडे आग्रहाची विनंती केली. वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता. 4फेस्तने उत्तर दिले, “पौल कैसरियात कैदेत आहे, मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे. 5त्या माणसाचा काही अपराध असला, तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा.”
6तो त्यांच्यामध्ये आठदहा दिवस राहून कैसरियास गेला. दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलला आणण्याचा हुकूम केला. 7तो आल्यावर यरुशलेमहून आलेल्या यहुदी लोकांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ गंभीर आरोप त्याच्यावर ठेवले. 8पौलाने प्रत्युत्तर केले, “मी यहुदी लोकांच्या नियमशास्त्राचा, मंदिराचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही.”
9मात्र यहुदी लोकांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलला म्हणाला, “यरुशलेममध्ये जाऊन तेथे माझ्यापुढे ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा, अशी तुझी इच्छा आहे काय?”
10पौलाने म्हटले, “कैसरच्या न्यायासनापुढे मी उभा आहे, येथेच माझा न्याय झाला पाहिजे. मी यहुदी लोकांचा काही अपराध केला नाही, हे आपणही चांगले जाणता. 11मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले, तर मी मरावयास तयार नाही असे नाही, परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत, त्यातला एकही जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मी कैसरजवळ न्याय मागतो.”
12फेस्तने सभेची मसलत घेऊन उत्तर दिले, “तू कैसरजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरपुढे जाशील.”
अग्रिप्पा व बर्णीका
13काही दिवसांनंतर राजा अग्रिप्पा व बर्णीका ही दोघे कैसरियास येऊन फेस्तला भेटली. 14तेथे ती दोघे पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्तने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्सने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे. 15मी यरुशलेमला गेलो होतो, तेव्हा त्याच्यावर यहुदी लोकांच्या मुख्य याजकांनी व वडीलजनांनी फिर्याद करून त्याला शिक्षा करावी अशी विनंती केली. 16त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची संधी आरोपीला मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरता सोपवून देण्याची रोमन लोकांची रीत नाही. 17म्हणून ते तेथे आल्यावर काही उशीर न करता दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणावयाचा हुकूम केला. 18वादी उभे असता ज्या दुष्ट गुन्ह्यांचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता, त्याबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही. 19केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे म्हणून पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्याच्याविषयी त्यांचा व पौलाचा वाद होता. 20ह्याची चौकशी कशी चालवावी, हे मला समजेनासे झाल्यामुळे मी त्याला विचारले, ‘यरुशलेम येथे जाऊन ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा, अशी तुझी इच्छा आहे काय?’ 21परंतु बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे अशी पौलाने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की, ह्याला कैसरकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे.”
22अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “त्या माणसाचे म्हणणे ऐकावे असे माझ्याही मनात आहे.” त्याने उत्तर दिले, “उद्या आपल्याला त्याचे म्हणणे ऐकावयास मिळेल.”
23दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा व बर्णीका ही मोठ्या थाटामाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात गेली आणि फेस्तने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणण्यात आले. 24फेस्त म्हणाला, “हे राजा अग्रिप्पा व उपस्थित असलेले सर्व जनहो, ह्या माणसाला तुम्ही पाहता ना! ह्याला ह्यापुढे जिवंत ठेवू नये असे ओरडत यहुदी लोकांच्या सर्व समुदायाने यरुशलेम व येथेही मला अर्ज केला. 25परंतु त्याने मरणदंडास योग्य असे काही केले नाही, असे मला कळून आले आणि त्याने स्वतः बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला पाठविण्याचे मी ठरवले. 26ह्याविषयी मी आपल्या स्वामीला निश्चित असे लिहिण्यासारखे काही नाही म्हणून तुमच्यापुढे व विशेषकरून हे राजा अग्रिप्पा, आपणापुढे ह्याला आणले आहे. अशा हेतूने की, चौकशी झाली म्हणजे मला काहीतरी लिहावयास सापडावे; 27कारण बंदिवानास पाठविताना त्याच्यावरील दोषारोप न कळविणे मला ठीक दिसत नाही.”
Currently Selected:
प्रेषितांचे कार्य 25: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.