प्रेषितांचे कार्य 7
7
स्तेफनचे भाषण
1उच्च याजकांनी स्तेफनला विचारले, “ह्या गोष्टी खऱ्या आहेत काय?”
2त्याने उत्तर दिले, “बंधुजनहो व वडीलजनांनो, ऐका. आपला पूर्वज अब्राहाम हा हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता गौरवशाली देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले, 3‘आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात तू जा’. 4म्हणून तो खासद्यांच्या देशातून निघून हारान येथे जाऊन राहिला. त्याचा पिता निधन पावल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले. 5त्यात देवाने त्याला वतन दिले नाही, पाऊलभरदेखील जमीन दिली नाही. त्याला मूलबाळ नव्हते, तरी हा देश त्याच्या व त्याच्यामागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायमचा करण्याचे अभिवचन मात्र देवाने त्याला दिले. 6देवाने आणखी असे सांगितले की, ‘त्याची संतती परदेशात जाऊन उपरी होईल आणि तेथील लोक त्यांना दास करून चारशे वर्षे छळतील. 7ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्या राष्ट्राचा मी न्याय करीन’, असे देवाने सांगितले आणि ‘त्यानंतर ते तेथून बाहेर पडतील व ह्या ठिकाणी माझी उपासना करतील.’ 8नंतर देवाने त्याला सुंतेचा विधी कराराचे चिन्ह म्हणून नेमून दिला, हा करार झाल्यानंतर अब्राहामला इसहाक झाला. त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली. मग इसहाकने याकोब ह्या त्याच्या मुलाची सुंता केली व याकोबने त्याच्या बारा पुत्रांची - जे कुलपती झाले - त्यांची सुंता केली.
9याकोबच्या मुलांनी त्यांचा भाऊ योसेफ ह्याला मिसर देशात विकून टाकले पण त्याच्याबरोबर देव होता. 10त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडविले आणि मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने सभ्यता व सुज्ञता यांनी संपन्न केले. त्यामुळे त्याने त्याला मिसर देशावर व राजघराण्यावर व्यवस्थापक म्हणून नेमले. 11मग मिसर व कनान या देशांत सर्वत्र दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. 12तेव्हा मिसर देशात धान्य आहे, हे ऐकून याकोबने त्याच्या मुलांना म्हणजेच तुमच्या आमच्या पूर्वजांना पहिल्या सफरीवर पाठविले. 13मग दुसऱ्या सफरीच्या वेळी योसेफने आपल्या भावांना ओळख दिली. त्यामुळे योसेफचे कूळ फारो राजाला कळले. 14योसेफने आपला बाप याकोब व आपले सगळे नातलग - सर्व मिळून पंचाहत्तर माणसे - ह्यांना बोलावून घेतले. 15ह्याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला आणि तेथे तो मरण पावला व आपले पूर्वजही तेथे मरण पावले. 16त्यांना शखेम या स्थळी नेण्यात आले आणि जी कबर अब्राहामने तिथे हमोराच्या पुत्राकडून रोख रक्कम देऊन विकत घेतली होती, तीत त्यांना पुरले.
17देवाने अब्राहामला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याची वेळ जसजशी जवळ आली तसतशी त्या लोकांची मिसर देशातील संख्या वाढली. 18योसेफची माहिती नसलेला दुसरा राजा मिसर मध्ये राज्य करु लागेपर्यंत असे चालले. 19तो राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्याने त्यांचे लहान मुलगे जगू नयेत म्हणून त्यांना टाकून देण्यास त्यांना भाग पाडले. अशा प्रकारे त्याने आपल्या पूर्वजांना छळले. 20ह्याच राजाच्या काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. तीन महिनेपर्यंत त्याचे पालनपोषण त्याच्या वडिलांच्या घरी झाले. 21मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला मुलगा म्हणून त्याचे संगोपन केले. 22मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी झाला.
23तो चाळीस वर्षांचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएली लोक ह्यांची भेट घ्यावी, असे त्याच्या मनात आले. 24मोशेने त्यांतील कोणा एकावर एका मिसरी माणसाच्या हातून अन्याय होत असलेला पाहून त्या माणसाचा कैवार घेतला आणि मिसरी माणसाला ठार करून त्याचा सूड उगवला. 25देव त्याच्या हाताने त्याच्या बांधवांची सुटका करणार आहे, हे त्यांना समजेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. 26दुसऱ्या दिवशी दोन इस्राएली माणसे आपसात भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, “तुम्ही भाऊबंद आहात. एकमेकांवर अन्याय का करता?’ 27तेव्हा जो आपल्या सहकाऱ्यावर अन्याय करत होता, तो त्याला ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश म्हणून कोणी नेमले? 28काल तू मिसरी माणसाला ठार मारले, तसे मलाही मारावयाला पाहतोस काय?’ 29हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान लोकांच्या देशात उपरी झाला. तेथे त्याला दोन मुलगे झाले.
30त्यानंतर चाळीस वर्षांनी सीनाय पर्वताजवळच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. 31हे दृश्य पाहून मोशेला आश्चर्य वाटले आणि ते काय आहे, हे पाहण्याकरता तो जवळ गेला. त्यावेळी प्रभूची वाणी झाली, 32‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामचा, इसहाकचा व याकोबचा देव आहे.’ मोशे घाबरला व त्याला तिकडे पाहायचे धैर्य झाले नाही. 33प्रभूने त्याला म्हटले, ‘तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. 34मिसर देशातल्या माझ्या लोकांचे हाल मी खरोखर पाहिले आहते, त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे. तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’
35‘तुला सत्ताधिकारी व न्यायाधीश कोणी केले’, असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते, त्यालाच, झुडपांत दर्शन झालेल्या देवदूताच्या साहाय्याने, देवाने सत्ताधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले. 36त्याने मिसर देशात, तांबड्या समुद्रात व रानात चाळीस वर्षे अद्भूत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांना बाहेर नेले. 37तोच मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, ‘मला पाठविले त्याप्रमाणे परमेश्वर तुमच्या बांधवांमधून एक संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.’ 38रानातील मंडळींबरोबर, सीनाय पर्वतावर मोशेशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. तो आपल्यासाठी जीवनदायक संदेश घेऊन आला.
39परंतु त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन मिसर देशाकडे फिरवून 40ते अहरोनला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आम्हांला करून दे कारण ज्याने आम्हांला मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले, ते आम्हांला माहीत नाही.’ 41त्या दिवसांत त्यांनी वासराची मूर्ती बनवली व तिच्यापुढे यज्ञ करून आपल्या हातून घडलेल्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला. 42म्हणून देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील ताऱ्यांची पूजा करावयास सोडून दिले, ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहिले आहे:
हे इस्राएलच्या घराण्या,
तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात पशू कापून मला यज्ञात अर्पण केले काय?
43मोलख दैवताचा मंडप व तुमचे मुख्य
दैवत रेफान ह्याचा तारा ह्यांच्या प्रतिमा
तुम्ही पुजण्याकरिता तयार केल्या म्हणून
मी तुम्हांला बाबेलच्या पलीकडे नेऊन ठेवीन.
44परमेश्वर बोलला तेव्हा त्याने मोशेला आदेश दिला होता की, त्याने पाहिलेल्या नमुन्याप्रमाणे परमेश्वराच्या वसतीचा मंडप तयार करण्यात यावा. हा परमेश्वराच्या वसतीचा मंडप आपल्या पूर्वजांकडे होता. 45नंतर जी राष्ट्रे देवाने आपल्या पूर्वजांच्या समोरून घालविली त्यांचा प्रदेश आपल्या पूर्वजांनी त्यांच्या ताब्यात घेतला, तेव्हा त्यांनी तो मंडप यहोशवाबरोबर त्या प्रदेशात आणला आणि दावीदच्या काळापर्यंत परंपरेने तसाच त्यांच्याकडे ठेवला. 46दावीदवर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने याकोबच्या घराण्याच्या परमेश्वरासाठी वसतिस्थान तयार करता यावे म्हणून परमेश्वराकडे याचना केली. 47परंतु शलमोनने परमेश्वरासाठी घर बांधले.
48तथापि परमेश्वर हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हटले आहे त्यानुसार:
49परमेश्वर म्हणतो,
‘आकाश माझे राजासन आहे,
पृथ्वी माझे पादासन आहे,
तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार?
किंवा माझ्या निवासाचे स्थान कोणते?
50मीच माझ्या हातांनी ह्या सर्व वस्तू केल्या नाहीत काय?’”
51स्तेफन पुढे म्हणाला, “अहो ताठ मानेच्या आणि हृदयाची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला नेहमी विरोध करता. जसे तुमचे पूर्वज, तसेच तुम्हीही. 52ज्याचा छळ तुमच्या पूर्वजांनी केला नाही, असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान सेवकाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले, त्यांना तुमच्या पूर्वजांनी ठार मारले आणि आता तुम्ही प्रत्यक्ष त्याला धरून देणारे व ठार मारणारे निघाला आहात. 53तुम्हांला देवदूतांच्याद्वारे नियमशास्त्र देण्यात आले होते, पण तुम्ही ते पाळले नाही.”
स्तेफनचा मृत्यू
54त्याचे हे भाषण न्यायसभेच्या सदस्यांच्या अंतःकरणाला इतके झोंबले की, ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले. 55परंतु पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन स्तेफनने आकाशाकडे पाहिले, तेव्हा देवाचे वैभव व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. 56स्तेफन म्हणाला, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे!”
57ते मोठ्याने ओरडून व कान झाकून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. 58ते त्याला शहराबाहेर घालवून दगड मारू लागले, साक्षीदारांनी त्यांचे कपडे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवले होते. 59ते दगड मारत असताना स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभो येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” 60त्यानंतर गुडघे टेकून त्याने आर्त विनवणी केली, “हे प्रभो, हे पाप त्यांच्या लेखी मोजू नकोस!” ह्या प्रार्थनेनंतर त्याने प्राण सोडला.
Currently Selected:
प्रेषितांचे कार्य 7: MACLBSI
Highlight
Share
Copy
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fen.png&w=128&q=75)
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.