कलस्सैकरांना 4
4
1धन्यांनो, तुमचाही स्वर्गात धनी आहे, हे लक्षात ठेवून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व उचितपणे वागा.
प्रार्थना व रोजची वागणूक
2प्रार्थनेत तत्पर असा व प्रार्थना करताना आभार मानत दक्ष राहा. 3ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी तुरुंगात आहे, त्याविषयीचा संदेश सांगावयास देवाने आम्हांला चांगली संधी द्यावी 4व जसे मी बोलले पाहिजे, तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे म्हणून आमच्यासाठीही प्रार्थना करा.
5बाहेरील लोकांबरोबर सुज्ञतेने वागा. प्रत्येक संधीचा पूरेपूर उपयोग करा. 6तुमचे बोलणे सर्वदा सभ्य व मिठाने रुचकर केलेले असावे व प्रत्येकाला कसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजून घ्यावे.
शुभेच्छा व समारोप
7आपला प्रिय बंधू तुखिक, प्रभूच्या कार्यातील विश्वासू प्रसेवक व माझ्या सोबतीचा सेवक हा माझ्याविषयी सगळे काही तुम्हांला कळवील. 8त्याला मी तुमच्याकडे ह्यासाठी पाठविले आहे की, आमचे वृत्त त्याने तुम्हांला कळवावे व तुम्हांला आनंदित करावे. 9त्याच्याबरोबर प्रिय व विश्वासू बंधू अनेसिम जो तुमच्यातला आहे, त्यालाही पाठविले आहे. ते येथील सर्व वृत्त तुम्हांला कळवतील.
10माझ्याबरोबर तुरुंगात असलेला अरिस्तार्ख तुम्हांला शुभेच्छा देतो. तसेच बर्णबाचा भाऊबंद मार्क हादेखील तुम्हांला शुभेच्छा कळवतो. त्याच्याविषयी तुम्हांला निर्देश देण्यात आला आहे की, तो तुमच्याकडे आला तर त्याचे स्वागत करा. 11युस्त उर्फ येशू हादेखील तुम्हांला शुभेच्छा पाठवत आहे. सुंता झालेल्यांपैकी फक्त हेच देवाच्या राज्याकरिता माझे सहकारी आहेत व त्यांचा मला फारच आधार आहे.
12ख्रिस्त येशूचा सेवक एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे, तो तुम्हांला शुभकामना पाठवतो. तो आपल्या प्रार्थनेमध्ये सर्वदा तुमच्यासाठी आस्थेने विनंती करीत असतो की, त्याच्या इच्छेचे परिपूर्ण पालन करण्यासाठी प्रौढ व दृढनिश्चयी ख्रिस्ती म्हणून देवाने तुम्हांला स्थिर करावे. 13तुमच्यासाठी व जे लावदिकीयात व हेरापलीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे, ह्याची मी साक्ष देतो. 14आपले प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हांला शुभेच्छा देतात.
15लावदिकीयातील बंधू तसेच नुंफा व तिच्या घरी जमणारी ख्रिस्तमंडळी ह्यांना शुभेच्छा सांगा. 16हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लावदिकीयातील ख्रिस्तमंडळीतही वाचावयास मिळावे व लावदिकीयाकडील पत्र तुम्हीही वाचावे. 17आर्खिप्पाला सांगा की, प्रभूच्या सेवाकार्यात जी जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली आहे, ती पार पाडण्याकडे त्याने लक्ष द्यावे.
18मी, पौलाने स्वहस्ते लिहिलेल्या शुभेच्छा. माझ्या बेड्यांची आठवण ठेवा. प्रभूची कृपा तुमच्याबरोबर राहो.
Currently Selected:
कलस्सैकरांना 4: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.