YouVersion Logo
Search Icon

इफिसकरांना 4

4
ख्रिस्त - ख्रिस्तमंडळीचा मस्तक
1म्हणून प्रभूमध्ये बंदिवान असा मी तुम्हांला विनंती करून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. 2नेहमी नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. 3आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. 4तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे. 5प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, 6सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांमध्ये असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे.
7आपणापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या कृपादानाच्या प्रमाणात विशिष्ट वरदान प्राप्त झाले आहे.
8पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे,
त्याने उच्चस्थानी आरोहण केले,
तेव्हा पुष्कळांना कैद करून नेले
व मानवांना देणग्या दिल्या.
9त्याने आरोहण केले, ह्यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता, ह्यापेक्षा दुसरे काय समजावे? 10म्हणून जो खाली उतरला त्यानेच सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले 11आणि त्यानेच काहींना प्रेषित, काहींना संदेष्टे, काहींना शुभवर्तमानप्रचारक, काहींना पाळक व शिक्षक असे नेमले. 12ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र लोकांना सेवाकार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. 13अशा प्रकारे देवाच्या पुत्रावरील विश्वासाने व त्यासंबंधी परिपूर्ण ज्ञानाने आपण प्रौढ होऊन एकीने जीवन जगू म्हणजे आपण सर्व ख्रिस्ताच्या परिपूर्णतेपर्यंत पोहचू. 14त्यामुळे आपण ह्यापुढे लहान मुलांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, चुकीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक बदलत्या शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. 15तर आपण प्रीतीने सत्याला धरून, मस्तक असा जो ख्रिस्त, त्याच्यामध्ये सर्व प्रकारे वाढावे. 16ख्रिस्ताच्या नियंत्रणाखाली सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव शरीराच्या प्रत्येक सांध्यायोगे होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या स्वभावानुसार कार्य करीत असता संपूर्ण शरीर प्रीतीमध्ये वाढत राहते.
जुना जीवितक्रम व नवा जीवितक्रम
17प्रभूच्या नावाने मी तुम्हांला ठामपणे सांगतो व आग्रह धरतो की, यहुदीतर लोक निरर्थक विचारांनी चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. 18त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठोरपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. 19संवेदनशीलता नष्ट झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारचे अशुद्ध वर्तन करण्यासाठी स्वतःला कामातुरपणात झोकून दिले आहे.
20तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही! 21तुम्ही तर त्याच्याविषयी निश्‍चितपणे ऐकले व त्याच्यामध्ये जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला शिक्षण मिळाले. 22म्हणून तुमच्या पूर्वीच्या आचारणाचा कर्ता जो जुना मनुष्य तो भ्रष्ट व देहलालसेने भ्रमिष्ट झाला आहे. त्याचा तुम्ही त्याग करा. 23तुम्ही नव्या मनोवृत्तीचा स्वीकार करा 24आणि देवसदृश निर्माण केलेला, सरळमार्गी आणि पवित्र असा नवा मनुष्य धारण करा.
दिनचर्येकरिता नियम
25लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला; कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. 26तुमचा राग तुम्हांला पाप करण्यास प्रवृत्त करणार नाही, ह्याची काळजी घ्या; दिवसभर राग मनात बाळगू नका. सूर्य मावळण्यापूर्वी तुमचा राग सोडून द्या. 27सैतानाला वाव देऊ नका. 28चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे. 29तुमच्या मुखातून दुर्भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच फक्त निघो, ज्यामुळे ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. 30देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहां. 31प्रत्येक प्रकारची कटुता, राग, क्रोध, गलबला व निंदानालस्ती सर्व प्रकारच्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करा. 32उलट, तुम्ही एकमेकांबरोबर चांगुलपणाने व सहृदयतेने वागा. जशी देवाने ख्रिस्तात तुम्हांला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in