YouVersion Logo
Search Icon

इब्री 12

12
विश्वासाचे प्रमुख उदाहरण म्हणजे येशू
1तर मग आपण विश्वास ठेवणाऱ्या साक्षीदारांच्या एवढ्या महान साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व अडथळे व सहज गुंतविणारे पाप सोडून आपल्याला नेमून दिलेल्या शर्यतीत निर्धाराने धावावे. 2आपण आपला विश्वास उत्पन्न करणारा व पूर्ण करणारा येशू ह्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. जो आनंद त्याच्यापुढे होता, त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून क्रूस सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. 3तुमची मने खचून तुम्ही विश्वास सोडून देऊ नये म्हणून ज्याने पापी लोकांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा.
शिस्तीचा हेतू
4तुम्ही पापाशी झगडत असता तुमचे रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही; 5तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय?
माझ्या मुला,
परमेश्वराच्या शिस्तीचा अनादर
करू नकोस
किंवा त्याच्याकडून तुला शिक्षा
होत असता खचू नकोस
6कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो,
त्याला तो शिस्त लावतो
आणि ज्यांना तो पुत्र म्हणून स्वीकारतो
त्या प्रत्येकाला शिक्षा करतो.
7शिस्तीसाठी तुम्ही अडचणी सहन करीत आहात; देव तुम्हांला पुत्राप्रमाणे वागवितो आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा पुत्र कोण आहे? 8जी शिक्षा सर्वांना मिळालेली आहे ती शिक्षा स्वीकारावयास तुम्ही जर तयार नसाल, तर तुम्ही खरे पुत्र नव्हे, तर अनौरस संतती आहात. 9शिवाय शिक्षा करणाऱ्या आपल्या मानवी पित्याचा आपण आदर राखतो, तर मग आपण जो आत्म्याचा पिता आहे, त्याच्या अधिक प्रमाणात अधीन होऊन जिवंत राहू नये काय? 10आपला मानवी पिता त्याला योग्य वाटेल तशी थोडे दिवस शिक्षा करत होता; पण देव जी शिक्षा करतो, ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पावित्र्याचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो. 11कोणतीही शिक्षा त्यावेळी खेदाची वाटते, आनंदाची वाटत नाही; परंतु ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.
12तर मग लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा 13आणि सरळ मार्गावर चालत राहा, ह्यासाठी की, लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा.
बोध व इशारे
14सर्वांबरोबर शांतीने राहण्याचा व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही, ते पवित्रीकरण मिळविण्याचा झटून प्रयत्न करा; 15-16देवाच्या कृपेकडे पाठ फिरवू नका. ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील, असे कोणतेही कटुतेचे मूळ अंकुरित झाल्यावर उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले, त्या एसावसारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, ह्याकडे लक्ष द्या. 17तुम्हांला माहीत आहे की, त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळविण्याची इच्छा करत असताही त्याला नकार मिळाला. त्याने जरी अश्रू ढाळून पश्चात्ताप करायची संधी शोधली, तरी ती त्याला मिळाली नाही.
ऐहिक सीयोन व स्वर्गीय सीयोन
18प्रज्वलित पर्वत, अंधकार, घोर नैराश्य, वादळ, 19कर्ण्याचा नाद व शब्दध्वनी ह्या इंद्रियगोचर गोष्टींकडे इस्राएली लोक आले होते, ह्याकडे तुम्ही आला नाहीत. तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की, देवाचे आमच्याबरोबर अधिक बोलणे होऊ नये; 20कारण पशूदेखील त्या पर्वताला शिवला तर त्यास धोंड्यांनी मारावे, ही आज्ञा त्यांना असह्य झाली; 21ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, ‘मी फारच भयभीत व कंपित झालो आहे!’
22पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, अगणित देवदूतांबरोबर उत्सव करणारा, 23स्वर्गातील प्रथम जन्मलेल्यांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, परिपूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे, 24नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि ज्या रक्ताचे अभिवचन हाबेलच्या रक्ताच्या वचनापेक्षा श्रेष्ठ आहे, ते शिंपडलेले रक्त ह्यांच्याजवळ आला आहात.
25जो बोलत आहे, त्याचा अवमान करू नये म्हणून जपा; कारण पृथ्वीवर संदेश सांगणाऱ्याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत आणि स्वर्गातून बोलणाऱ्याकडे आपण पाठ फिरवली, तर आपला निभाव कसा लागेल? 26त्या वेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हालविली; परंतु त्याने दिलेले वचन आता असे म्हणते की, ‘आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कंपित करीन.’ 27आणखी एकदा ह्याचा अर्थ असा होतो की, निर्मित वस्तू विचलित होतील व काढून टाकल्या जातील; ते ह्यासाठी की, अचल वस्तू टिकून राहाव्यात.
28म्हणून अविचल राज्य आपल्याला मिळत असल्याकारणाने आपण कृतज्ञ राहू या, म्हणजे देव प्रसन्न होइल अशी त्याची आराधना आदरयुक्त भयाने करता येईल. 29आपला देव खरोखर भस्म करणारा अग्नी आहे.

Currently Selected:

इब्री 12: MACLBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in