इब्री 5
5
1प्रत्येक प्रमुख याजक माणसांमधून निवडलेला व देवविषयक गोष्टींबाबत माणसांकरिता नेमलेला असतो, ह्यासाठी की, त्याने दाने व पापांबद्दल यज्ञ ही अर्पण करावीत. 2अज्ञानी व बहकणारे ह्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वतः दुर्बलतेने वेष्टिलेला आहे 3आणि ह्या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी, तसे स्वतःसाठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे. 4प्रमुख याजकपदाचा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनप्रमाणे पाचारण केले आहे, त्याला तो मिळतो.
5प्रमुख याजक होण्यासाठी ख्रिस्तानेही स्वतःचा गौरव केला नाही. ज्याने त्याला नेमले त्याने त्याला म्हटले आहे,
तू माझा पुत्र आहेस,
आज मी तुला जन्म दिला आहे.
6त्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो,
मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस.
7आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ येशूने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि त्याच्या आदरपूर्वक अधीनतेमुळे ती ऐकण्यात आली; 8तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले, त्यामधून तो आज्ञाधारकपणा शिकला 9आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगाच्या तारणाचा कर्ता झाला, 10त्याला मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधिण्यात आले.
ख्रिस्ताच्या मार्गाने प्रगती करण्याची आवश्यकता
11ह्याविषयी आम्हांला पुष्कळ सांगायाचे आहे, ते तुम्हांला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. 12वास्तविक एवढ्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होते, पण तुम्हांला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकविण्याची जरुरी आहे आणि तुम्हांला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही. 13दुधावर राहणारा नीतिमत्त्वाच्या वचनाशी अपरिचित असतो; कारण तो बालक असतो. 14पण ज्यांना विवेकदृष्टीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.
Currently Selected:
इब्री 5: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.