लूक 6
6
साबाथपालन
1एका साबाथ दिवशी येशू शेतामधून जात असताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातांवर चोळून खाऊ लागले, 2तेव्हा काही परुश्यांनी विचारले, “साबाथ दिवशी जे करणे योग्य नाही, ते तुम्ही का करता?”
3येशूने त्यांना उत्तर दिले, “दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना भूक लागली, तेव्हा त्याने काय केले, 4तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत, त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या व आपल्या साथीदारांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?”
5नंतर येशूने म्हटले, “मनुष्याचा पुत्र साबाथचा प्रभू आहे.”
6दुसऱ्या एका साबाथ दिवशी तो सभास्थानात जाऊन शिकवीत असता तेथे उजवा हात वाळलेला एक माणूस होता. 7तेव्हा काही शास्त्री व परुशी येशूवर दोष ठेवता यावा म्हणून तो साबाथ दिवशी रोग बरा करतो की काय हे पाहायला टपून राहिले. 8त्याने त्यांचे विचार जाणले तरीही त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, “ऊठ व मध्ये उभा राहा,” तो उठून उभा राहिला. 9येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, साबाथ दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य?” 10नंतर त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, “आपला हात लांब कर,” त्याने तसे केले आणि त्याचा हात पूर्ववत बरा झाला.
11हे पाहून त्यांच्या तळपायांची आग मस्तकाला गेली व येशूचे काय करावे, ह्याविषयी ते आपसात चर्चा करू लागले.
बारा प्रेषितांची निवड
12एकदा येशू प्रार्थना करायला डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाकडे प्रार्थना करीत राहिला. 13दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांतून पुढील बारा जणांना निवडून त्यांना प्रेषित असे संबोधनही दिले. 14शिमोन (ह्याला त्याने पेत्रदेखील नाव दिले) व त्याचा भाऊ अंद्रिया तसेच याकोब, योहान, फिलिप, बर्थलमय, 15मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, राष्ट्रवादी शिमोन, 16याकोबचा मुलगा यहुदा आणि जो पुढे विश्वासघात करणारा निघाला, तो यहुदा इस्कर्योत.
17येशू प्रेषितांच्या बरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला. त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती उभा होता. तसेच सर्व यहुदिया व यरुशलेम येथून आलेल्या आणि सोर व सिदोन येथील किनारपट्टीवरील लोकांचा विशाल समुदायसुद्धा तेथे उभा होता. 18हे लोक त्याचा संदेश ऐकायला व रोग बरे करून घ्यायला आले होते. अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना त्याने बरे केले. 19सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना रोगमुक्त करत होते.
धन्योद्गार व दुःखोद्गार
20नंतर येशूने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले,
“अहो दीन जनहो, तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
21अहो भुकेलेले जनहो, तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल. आता रडता ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल.
22मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील. तुम्हांला वाळीत टाकतील. तुमची निंदा करतील आणि तुमच्या नावाला काळिमा फासतील. तेव्हा तुम्ही धन्य. 23त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा कारण पाहा, स्वर्गात तुमचे पारितोषिक मोठे आहे. त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करीत असत.
24परंतु तुम्हां धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांला सुखसोयी मिळाल्या आहेत.
25अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहात त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांला भूक लागेल. अहो, जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल व रडाल.
26जेव्हा सर्व लोक तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांविषयी असेच बोलत असत.
जगावेगळी शिकवण
27परंतु तुम्हां ऐकणाऱ्यांना मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. 28जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 29जो तुझ्या एका गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसराही गाल कर आणि जो तुझा कोट हिरावून घेतो त्याला तुझा शर्टदेखील घेऊन जाण्यास विरोध करू नकोस. 30जो कोणी तुझ्याजवळ मागतो, त्याला दे आणि जो तुझे हिरावून घेतो, त्याच्याकडून ते परत मागू नकोस. 31लोकांनी तुमच्याबरोबर जसे वर्तन करावे अशी तुमची इच्छा असेल, तसेच तुम्हीही वर्तन करा.
32जे तुमच्यावर प्रीती करतात, त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुम्हांला श्रेय ते कोणते? कारण पापी लोकही त्यांच्यावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात. 33जे तुमचे बरे करतात, त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुम्हांला श्रेय ते कोणते? पापी लोकही तसेच करतात. 34ज्यांच्याकडून परत मिळण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले, तर त्यात तुम्हांला श्रेय ते कोणते? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही उसने देतात. 35तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. त्यांचे बरे करा. परतफेडीची अपेक्षा न करता उसने द्या म्हणजे तुम्हांला महान पारितोषिक मिळेल आणि तुम्ही परमेश्वराची मुले व्हाल कारण कृतघ्न व वाईट लोकांनाही तो त्याचा चांगुलपणा दाखवतो. 36जसा तुमचा पिता दयाळू आहे, तसे तुम्ही दयाळू व्हा.
इतरांचे दोष न काढण्याबाबत
37तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा म्हणजे तुम्हांला क्षमा मिळेल. 38द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही द्याल, त्याच मापाने तुम्हांला परत देण्यात येईल.
39नंतर येशूने त्यांना दाखलादेखील दिला की, आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचखळग्यांत पडतील की नाही? 40शिष्य गुरूपेक्षा श्रेष्ठ नाही. प्रशिक्षित झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल.
41तू स्वतःच्या डोळ्यातले मुसळ न पाहता, आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? 42अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणतोस, ‘भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे?’ अरे ढोंग्या, प्रथम स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्ट दिसेल.
झाड आणि त्याचे फळ
43चांगल्या झाडाला वाईट फळ येत नाही. तसेच वाईट झाडाला चांगले फळ येत नाही. 44कारण प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखता येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाही आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाही. 45चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो. तसेच वाईट मनुष्य वाईट भांडारातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे, ते मुखावाटे निघणार.
उक्ती आणि कृती
46तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो, ते का करत नाही? 47जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे, हे मी तुम्हांला दाखवतो. 48तो एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला. पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला, तरीही तो लोंढा त्या घराला हालवू शकला नाही कारण ते मजबूत बांधले होते. 49परंतु जो ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही, तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्या घरावर पुराचा लोंढा आदळला तेव्हा ते लगेच पडले आणि त्याचा भीषण विनाश झाला!”
Currently Selected:
लूक 6: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.