YouVersion Logo
Search Icon

मार्क 14

14
अधिकाऱ्यांची गुप्त मसलत
1ओलांडण सण व बेखमीर भाकरींच्या सणाला अजून दोन दिवसांचा अवधी होता आणि येशूला कपटाने कसे धरावे व ठार मारावे, हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते. 2ते म्हणत होते, “आपण हे सणाच्या दिवसांत करू नये, केले तर लोकांत दंगल होईल.”
येशूला तेलाचा अभिषेक
3येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोनच्या घरी जेवायला बसला असता, एक स्त्री जटामांसीच्या फार मौल्यवान अत्तराने भरलेली संगमरवरी कुपी घेऊन आली. तिने ती फोडून त्याच्या मस्तकावर ओतली. 4कित्येक जण संतप्त होऊन आपसात म्हणाले, “ह्या अत्तराचा असा अपव्यय का केला? 5ते तीनशेपेक्षा अधिक चांदीच्या नाण्यांना विकून गोरगरिबांना मदत करता आली असती”, अशी ते तिच्यावर टीका करीत होते.
6परंतु येशू म्हणाला, “हिला राहू द्या. हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. 7गरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतील व पाहिजे तेव्हा तुम्ही त्यांना साहाय्य करू शकता, परंतु मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही. 8तिला जे काही करता आले, ते तिने केले; तिने माझ्या उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधी द्रव्य लावले आहे. 9मी तुम्हांला निश्‍चितपणे सांगतो, सर्व जगात जेथे जेथे शुभवर्तमानाची घोषणा करण्यात येईल, तेथे तेथे हिने जे केले आहे, ते तिची आठवण म्हणून सांगण्यात येईल.”
यहुदाची फितुरी
10बारा जणांपैकी एक म्हणजे यहुदा इस्कर्योत हा येशूला मुख्य याजकांच्या स्वाधीन करून देण्याच्या हेतूने त्यांच्याकडे गेला. 11त्याचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला. त्यांनी त्याला पैसे देऊ केले म्हणून तो येशूला धरून देण्याची सोईस्कर संधी शोधू लागला.
शेवटचे भोजन
12बेखमीर भाकरींच्या सणाच्या पहिल्या दिवशी ओलांडण सणाचा यज्ञपशू मारत असत. त्या दिवशी येशूचे शिष्य त्याला म्हणाले, “आपण ओलांडण सणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कुठे जाऊन तयारी करावी, अशी आपली इच्छा आहे?”
13त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, “शहरात जा म्हणजे एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हांला भेटेल. त्याच्यामागून जा. 14घरात गेल्यावर तेथल्या घरधन्याला असे सांगा की, गुरुजी विचारतात, ‘माझ्या शिष्यांसह ओलांडण सणाचे भोजन करू शकेन, अशी जागा कोठे आहे?’ 15सजवून तयार केलेली माडीवरची एक प्रशस्त खोली तो तुम्हांला दाखवील, तेथे आपल्यासाठी सर्व तयारी करा.”
16शिष्य निघून शहरात गेले. येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, त्यांनी ओलांडण सणाची तयारी केली.
17संध्याकाळ झाल्यावर येशूचे बारा जणांबरोबर आगमन झाले. 18ते बसून भोजन करत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला ठामपणे सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. तो माझ्याबरोबर जेवणात भाग घेत आहे.”
19ते अस्वस्थ झाले व एकामागून एक त्याला विचारू लागले, “तो मी आहे का?”
20तो त्यांना म्हणाला, “तुम्हां बारा जणांपैकी एक जण म्हणजे जो माझ्याबरोबर वाटीत भाकरीचा तुकडा बुडवत आहे तो. 21मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी धर्मशास्त्रात जसे लिहिले आहे, त्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो, त्याची केवढी दुर्दशा होणार! तो माणूस जन्माला आला नसता तर ते त्याच्या भल्याचे असते!”
22ते भोजन करत असता, येशूने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “घ्या, हे माझे शरीर आहे.”
23त्यानंतर त्याने प्याला घेतला व परमेश्वराचे आभार मानून त्यांना तो दिला. ते सर्व जण त्यातून प्याले. 24येशू त्यांना म्हणाला, “हे माझे कराराचे रक्‍त आहे, हे पुष्कळांकरता ओतले आहे. 25मी तुम्हांला निश्‍चितपणे सांगतो, मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज पुन्हा कधीच पिणार नाही.”
26त्यानंतर एक स्तोत्र गाऊन ते तेथून ऑलिव्ह डोंगराकडे निघून गेले.
शिष्य सोडून जातील - येशूचे भाकीत
27येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व जण माझ्यामुऴे अडखळणार आहात, कारण असे लिहिले आहे, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’ 28पण माझे पुनरुत्थान झाल्यावर तुमच्यापुढे मी गालीलमध्ये जाईन.”
29पेत्र त्याला म्हणाला, “सगळे जरी आपल्याला सोडून गेले, तरी मी आपल्याला कधीच सोडणार नाही.”
30येशू त्याला म्हणाला, “मी तुला खातरीपूर्वक सांगतो, आज रात्री कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
31पेत्र आवेशाने बोलला, “आपल्याबरोबर मला मरावे लागले तरीदेखील मी आपल्याला नाकारणार नाही!” इतर सर्व जणही तेच म्हणत होते.
गेथशेमाने बागेत येशू
32ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” 33त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यांना बरोबर घेतले आणि तो व्याकूळ होऊ लागला. 34तो त्यांना म्हणाला, “माझ्या जिवाला मरणप्राय वेदना होत आहेत. तुम्ही येथे थांबून जागे राहा.”
35काहीसे पुढे जाऊन त्याने जमिनीवर लोटांगण घातले व अशी प्रार्थना केली, “शक्य असेल तर ही घटका माझ्यावरून टळून जावो.” 36तो म्हणत होता, “पित्या, माझ्या पित्या, तुला सर्व काही शक्य आहे, हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीदेखील माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”
37तो येऊन पाहतो तर ते झोपी गेले होते. येशू पेत्राला म्हणाला, “शिमोन, झोपी गेलास का? घटकाभरही तुझ्याने जागे राहवले नाही काय? 38तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा, आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह दुर्बल आहे.”
39त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. 40तो पुन्हा येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत, त्यांचे डोळे फार जड झाले होते. त्याला काय उत्तर द्यावे, हे त्यांना सुचेना.
41तिसऱ्या वेळी येऊन तो त्यांना म्हणाला, “झोपा आणि विसावा घ्या, पुरे झाले! घटका आली आहे! मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. 42उठा, आपण जाऊ या, पाहा, मला धरून देणारा जवळ येत आहे.”
येशूला अटक
43येशू बोलत असताना बारांपैकी एक जण म्हणजे यहुदा तेथे आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडीलजन ह्यांच्याकडची एक टोळी तलवारी व सोटे घेऊन आली होती. 44त्याला धरून देणाऱ्याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती, “मी ज्याचे चुंबन घेईन, तोच तो आहे, त्याला धरा व त्याला नीट बंदोबस्ताने घेऊन जा.”
45यहुदा आल्यावर लगेच येशूकडे गेला आणि, “गुरुवर्य”, असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. 46तेव्हा त्या लोकांनी येशूला धरले व त्याला अटक केली. 47तेथे शेजारी जे उभे होते, त्यांच्यापैकी एकाने तलवार उपसली आणि उच्च याजकांच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला. 48तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “एखाद्या लुटारूवर तलवारी व सोटे घेऊन जावे, तसे तुम्ही मला धरायला निघालात काय? 49मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे आणि तुम्ही मला धरले नाही, परंतु धर्मशास्त्रलेख पूर्ण होणे आवश्यक आहे.”
50त्यानंतर त्याचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
51एक तरुण उघड्या अंगावर केवळ तागाचे कापड पांघरून येशूच्या मागून आला होता. त्याला त्यांनी अटक करण्याचा प्रयत्न केला, 52परंतु तो ते तागाचे कापड टाकून तिथून उघडाच पळून गेला.
न्यायसभेसमोर येशूची चौकशी
53नंतर त्यांनी येशूला उच्च याजकांच्या घरी नेले. तेथे सर्व मुख्य याजक, वडीलजन व शास्त्री एकत्र जमले. 54काही अंतर ठेवून मागे येत असलेला पेत्र रक्षकांबरोबर उच्च याजकांच्या वाड्यातील शेकोटीजवळ बसला. 55मुख्य याजक व न्यायसभेचे सर्व सदस्य येशूला ठार मारण्याकरता त्याच्याविरुद्ध पुरावा शोधत होते, परंतु त्यांना तो मिळेना. 56बऱ्याच जणांनी येशूविरुद्ध खोट्या साक्षी दिल्या, परंतु त्यांच्या साक्षींत मेळ बसेना.
57काही जण उभे राहून येशूविरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले, 58“‘हातांनी बांधलेले हे मंदिर मी मोडून टाकीन व हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर तीन दिवसांत उभारीन’,असे आम्ही ह्याला बोलताना ऐकले.” 59परंतु त्यांच्या ह्या साक्षींतदेखील मेळ बसेना.
60उच्च याजकांनी मध्ये उभे राहून येशूला विचारले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध आरोप करत आहेत ना?”
61तरी पण येशू गप्प राहिला. त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा उच्च याजकांनी त्याला विचारले, “धन्य देवाचा पुत्र जो ख्रिस्त, तो तू आहेस काय?”
62येशू म्हणाला, “मी आहे. तुम्ही मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ परमेश्‍वराच्या उजवीकडे बसलेला व आकाशातील मेघांवर आरूढ होऊन येत असलेला पाहाल.”
63तेव्हा उच्च याजक आपले कपडे फाडून म्हणाले, “आपल्याला आणखी साक्षीदारांची काही गरज नाही! 64हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे, तुमचा निर्णय काय?” त्या वेळी तो मरणदंडाला पात्र आहे, असे सर्वांनी मिळून ठरवले.
65कित्येक जण त्याच्यावर थुंकू लागले, त्याचे डोळे झाकून व त्याला बुक्क्या मारून म्हणू लागले, “आता संदेष्टा म्हणून सांग.” रक्षकांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले व चपराका मारल्या.
पेत्र येशूला नाकारतो
66इकडे पेत्र खाली अंगणात असता उच्च याजकांच्या दासींपैकी एक तेथे आली. 67पेत्राला शेकत असताना पाहून तिने त्याच्याकडे टक लावून म्हटले, “तूही त्या नासरेथकर येशूबरोबर होतास.”
68परंतु तो नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही.” त्यानंतर तो बाहेर देवडीवर गेला, [इतक्यात कोंबडा आरवला!]
69त्या दासीने त्याला तेथेही पाहिले. जे लोक जवळ उभे होते, त्यांना ती पुन्हा सांगू लागली, “हा त्यांच्यापैकीच आहे.” 70तरी त्याने पुन्हा नाकारले. काही वेळाने जवळ उभे राहणारे लोक पेत्राला पुन्हा म्हणाले, “तू खरोखर त्यांच्यापैकी आहेस कारण तू गालीली आहेस.”
71परंतु तो स्वतःला शाप देऊन शपथपूर्वक म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्याला मी ओळखत नाही.”
72त्याच वेळी दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. तेव्हा ‘कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील’, असे जे येशू पेत्राला म्हणाला होता, ते त्याला आठवले आणि तो भावनाविवश होऊन रडला.

Currently Selected:

मार्क 14: MACLBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Free Reading Plans and Devotionals related to मार्क 14

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy