YouVersion Logo
Search Icon

फिलिप्पैकरांना 2

2
ऐक्यासाठी विनंती
1ह्यावरून ख्रिस्तामध्ये काही प्रोत्साहन, प्रीतीचे काही सांत्वन, पवित्र आत्म्याची काही सहभागिता, काही करुणा व सहानुभूती, ही जर आहेत. 2तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकात्मतेने व एकमनाने रहा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा.
नम्रतेसाठी विनंती
3स्वार्थी महत्त्वाकांक्षेने अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, परत स्वतःपेक्षा दुसऱ्यांना लीनतेने श्रेष्ठ माना. 4तुम्ही कोणीही फक्त आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पाहा.
प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण
5जी मनोवृत्ती ख्रिस्त येशूच्यामध्ये होती, ती तुमच्यामध्येही असो:
6तो देवाच्या स्वरूपाचा असूनही
देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे,
असे त्याने मानले नाही,
7तर त्याने स्वतःला रिक्त केले,
म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन
दासाचे स्वरूप धारण केले.
8आणि मनष्यरूपात प्रकट होऊन त्याने
स्वतःला नम्र केले आणि तो मरणापर्यंत
आज्ञाधारक झाला,
अगदी क्रुसावरील मरणापर्यंत.
9ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले
आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिले.
10ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने वाकला जावा;
11आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, असे कबूल करावे.
देवाची निष्कलंक मुले
12प्रियजनहो, मी तुमच्याजवळ असता तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात. तर विशेषकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही तुम्ही आज्ञापालन करावे, हे अधिक महत्त्वाचे आहे. आपले तारण पूर्णत्वास नेण्यासाठी भयाने थरकाप होत असतानाही श्रम करीत राहा; 13कारण इच्छा बाळगण्यासाठी व त्याच्या योजनेनुसार कार्य करण्यासाठी तुम्हांला सक्षम करण्याकरिता परमेश्वर तुमच्यामध्ये सतत कार्य करीत असतो.
14जे काही तुम्ही कराल, ते कुरकुर व वादविवादाशिवाय करा. 15ह्यासाठी की, ह्या दुष्ट व विकृत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची मुले व्हावे. लोकांमध्ये जीवनाचे वचन सांगताना तुम्ही जगात आकाशातील ताऱ्यांसारखे दिसावे. 16असे झाले, तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत, असा अभिमान बाळगण्यास मला ख्रिस्ताच्या दिवशी कारण मिळेल.
17तुमच्या विश्वासाचा यज्ञ अर्पिला जात असता जरी मी स्वतः अर्पिला जात आहे, तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुमच्या सर्वांना माझ्या आनंदात सहभागी करून घेतो. 18त्याचप्रमाणे तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.
तीमथ्य
19तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्यला मी तुमच्याकडे पाठवावे म्हणून मी प्रभूमध्ये आशा बाळगून आहे. 20तुमच्या हिताचा प्रामाणिकपणे विचार करील असा त्याच्यासारखा माझ्याकडे दुसरा कोणी नाही. 21इतर सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात, 22तीमथ्यचे महत्त्व तुम्हांला माहीत आहे की, जसा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर सेवा करतो तशी आम्ही शुभवर्तमानासाठी एकत्रित सेवा केली आहे. 23माझे काय होणार आहे, हे समजताच त्याला रवाना करता येईल, अशी मला आशा आहे. 24तसेच प्रभूवर माझा भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर तुमच्याकडे येईन.
एपफ्रदीत
25माझा बंधू, सहकारी व सहसैनिक, आणि तुमचा निरोप्या तसेच माझ्या गरजेत माझा सेवक एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठविणे मला आवश्यक वाटले; 26तो आजारी आहे, हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याचे अंत:करण जड झाले व तुम्हांला भेटण्याची त्याला उत्कंठा लागली होती. 27तो खरोखर अत्यवस्थ झाला होता, तथापि देवाने त्याच्यावर दया केली. ती केवळ त्याच्यावर नव्हे तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून, माझ्यावरही केली. 28मी त्याला पाठविण्याची त्वरा करीत आहे, तुम्ही त्याला पाहून आनंदित व्हावे व माझे दुःख हलके करावे. 29त्याचे स्वागत प्रभूला स्मरून पूर्ण आनंदाने करा आणि त्याच्यासारख्या सर्वांचा सन्मान करा. 30माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली, ती भरून काढावी म्हणून ख्रिस्तसेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in