प्रकटी 16
16
1पुढे मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी ऐकली. ती त्या सात देवदूतांना म्हणाली जा, “देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओता!”
2पहिल्या देवदूताने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीची आराधना करणाऱ्या लोकांना दुर्गंधी येणारे व वेदनादायक फोड आले. 3नंतर दुसऱ्या देवदूताने आपली वाटी समुद्रात ओतली, तेव्हा समुद्र मृत माणसाच्या रक्तासारखा रक्तमय झाला आणि त्यातील सर्व प्राणीमात्र मरून गेले.
4तदनंतर तिसऱ्या देवदूताने आपली वाटी नद्या व पाण्याचे झरे ह्यात ओतली आणि त्यांचे रक्त झाले. 5तेव्हा मी जलाच्या देवदूताला असे बोलताना ऐकले, “जो तू आहेस व होतास, तो तू पवित्र आहेस! तू असा न्यायनिवाडा केला म्हणून तू न्यायी आहेस! 6त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे रक्त पाडले आणि तू त्यांना रक्त प्यावयास लावले आहे. हीच त्यांची योग्यता आहे!” 7नंतर मी वेदीला असे उत्तर देताना ऐकले, “होय, हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तुझे निर्णय सत्य व न्याय्य आहेत.”
8त्यानंतर चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपून टाकण्याची मुभा देण्यात आली. 9माणसे कडक उष्णतेने करपून गेली, तेव्हा त्या विपत्तीवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची माणसांनी निंदा केली परंतु त्यांनी पश्चात्ताप केला नाही की देवाचा गौरव केला नाही.
10पाचव्या देवदूताने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली, तेव्हा त्याचे राज्य अंधकारमय झाले आणि लोकांनी वेदनांमुळे त्यांच्या जिभा चावल्या. 11त्यांच्या वेदनांमुळे व फोडांमुळे त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली परंतु आपल्या कृत्यांबद्दल पश्चात्ताप केला नाही.
12सहाव्या देवदूताने आपली वाटी फरात महानदीवर ओतली तेव्हा पूर्वेकडून येणाऱ्या राजांचा मार्ग सिद्ध व्हावा म्हणून त्या महानदीचे पाणी आटून गेले. 13नंतर बेडकासारखे दिसणारे तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या, श्वापदाच्या व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडांतून निघताना मी पाहिले. 14ते चमत्कार करणारे मृतांचे आत्मे आहेत, ते सर्वसमर्थ देवाच्या त्या महान दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करावयास त्यांच्याकडे बाहेर जातात.
15“पाहा, जसा चोर येतो, तसा मी येईन! आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे सांभाळतो तो धन्य!”
16नंतर हिब्रू भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी सर्व राजांना एकत्रित केले.
17त्यानंतर सातव्या देवदूताने आपली वाटी हवेत ओतली, तेव्हा उच्च वाणी मंदिरातील राजासनापासून निघाली, ती म्हणाली: “झाले!” 18तेव्हा विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट झाले. शिवाय इतका भयाण भूकंप झाला की, पृथ्वीवर मानव झाल्यापासून इतका भयंकर भूकंप कधी झाला नव्हता! 19मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले. राष्ट्रांची नगरे उद्ध्वस्त करण्यात आली. महान बाबेल नगरीचे देवाने स्मरण केले व तिला त्याचा त्वेषयुक्त, क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला प्यावयास लावला. 20प्रत्येक बेट नाहीसे झाले आणि सर्व डोंगरही दिसेनासे झाले. 21प्रत्येकी सुमारे पन्नास किलो वजनाच्या प्रचंड गारा आकाशातून माणसांवर पडल्या. गारांच्या विपत्तीमुळे लोकांनी देवाला शिव्याशाप दिले, कारण त्या गारांची विपत्ती अतिभयंकर होती.
Currently Selected:
प्रकटी 16: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.