YouVersion Logo
Search Icon

प्रकटी 5

5
देवाच्या कोकराचा साक्षात्कार
1जो राजासनावर बसलेला होता, त्याच्या उजव्या हातात दोन्ही बाजूस लिहिलेली व सात शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली. 2“गुंडाळीवरचे शिक्के फोडून, ती उघडावयास कोण पात्र आहे”, असे मोठ्याने पुकारणारा एक सामर्थ्यशाली देवदूत मी पाहिला. 3परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास समर्थ नव्हता. 4ही गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मी शोकाकुल झालो. 5तेव्हा वडीलजनांच्या मंडळापैकी एक जण मला म्हणाला, “शोक करू नको, पाहा, यहुदाच्या वंशाचा सिंह, दावीदचे मूळ ह्याने जय मिळवला आहे म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास समर्थ ठरला आहे.”
6तेव्हा राजासनाभोवती चार प्राणी व वडीलजनांमध्ये वध करण्यात आल्यासारखे दिसत होते, असे कोकरू उभे राहिलेले मी पाहिले. त्याला सात शिंगे व सात डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठविलेले देवाचे सात आत्मे आहेत. 7त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. 8त्याने गुंडाळी घेतली, तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडीलजन कोकराच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. 9ते नवे गीत गात होते:
“तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के
फोडावयास पात्र आहेस,
कारण तुझा वध करण्यात आला होता
व तुझ्या बलिदानात्मक मृत्यूने तू सर्व
वंश, भाषा बोलणारे, लोक आणि राष्ट्रे
देवासाठी विकत घेतली आहेत
10आणि आमच्या देवासाठी ह्या प्रजेला
तू राज्य व याजक असे केले आहे
आणि हे लोक पृथ्वीवर राज्य करतील.”
11तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडीलजन ह्यांच्याभोवती हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांची वाणी ऐकू आली. 12ते उच्च स्वरात गात होते,
“वधलेले कोकरू
सामर्थ्य, धन, सुज्ञता, पराक्रम, सन्मान,
गौरव व धन्यवाद
हे स्वीकारण्यास पात्र आहे!”
13स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रामध्ये जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात ह्यांना मी असे गाताना ऐकले,
“राजासनावर बसलेल्याला व कोकराला
धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम युगानुयुगे असो!”
14तेव्हा ते चार प्राणी म्हणाले, “आमेन!” आणि वडीलजनांनी लोटांगण घालून आराधना केली.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for प्रकटी 5