YouVersion Logo
Search Icon

प्रकटी 7

7
एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का
1ह्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोपऱ्यांवर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे चार वारे अडवून धरत होते. 2मी आणखी एक देवदूत पूर्व दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते, त्यांना तो ओरडून म्हणाला, 3“आमच्या देवाचे जे दास आहेत, त्यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारीपर्यत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका.” 4ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्त्राएली लोकांच्या बारा वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला. 5-8प्रत्येक वंशापैकी बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला. इस्त्राएली लोकांचे बारा वंश पुढीलप्रमाणे: यहुदा, रऊबेन, गाद, आशेर, नफताली, मनश्शे, शिमोन, लेवी, इस्साखार, जबुलून, योसेफ व बन्यामीन.
उद्धार पावलेल्यांचा साक्षात्कार
9ह्यानंतर शुभ्र झगे परिधान केलेले व हाती झावळ्या घेतलेले प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक आणि भाषा बोलणारे यांचे असंख्य लोक राजासनासमोर व कोकरासमोर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. 10ते उच्च स्वराने म्हणत होते, “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडे व कोकराकडे तारण आहे.” 11तेव्हा राजासन, वडीलजन व चार प्राणी ह्यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर लोटांगण घालून देवाची आराधना करीत म्हणाले, 12“आमेन! धन्यवाद, गौरव, सुज्ञता, आभारप्रदर्शन, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुगे आमच्या देवाची आहेत, आमेन!”
13तेव्हा वडीलजनांपैकी एकाने मला विचारले, “शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले?” 14मी त्याला म्हटले, “महाशय, हे तुम्हांला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठ्या छळणुकीला सामोरे जाऊन येथे आले आहेत, ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकराच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत. 15ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर उभे आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि राजासनावर बसलेला त्यांच्याबरोबर वसती करील. 16ते ह्यापुढे भुकेले व तान्हेलेही होणार नाहीत. त्यांना सूर्य किंवा कोणतीही भस्मसात करणारी उष्णता बाधणार नाही. 17कारण राजासनाच्या मध्यभागी असलेले कोकरू त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in