YouVersion Logo
Search Icon

प्रकटी 8

8
सात कर्ण्यांचा नाद
1कोकराने सातवा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले. 2तेव्हा देवासमोर उभे राहिलेले सात देवदूत मी पाहिले. त्यांना सात कर्णे देण्यात आले होते.
3आणखी एक देवदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धूपपात्र होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह धुपारती करण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. 4देवदूताच्या हातातून धुपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनेसह देवासमोर वर चढला. 5तेव्हा देवदूताने धूपपात्र घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला. मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या व भूकंप झाला. 6मग ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपापले कर्णे वाजविण्यास सिद्ध झाले.
7पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली आणि एक तृतीयांश पृथ्वी जळून गेली. एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले.
8दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले. समुद्राच्या एक तृतीयांश पाण्याचे रक्त झाले. 9समुद्रातील प्राण्यांपैकी एक तृतीयांश प्राणी मरण पावले व एक तृतीयांश तारवांचा नाश झाला.
10मग तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा मशालीसारखा पेटलेला विशाल तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या एक तृतीयांश पाण्यावर पडला. 11(त्या ताऱ्याचे नाव “कडुदवणा”) आणि पाण्याचा एक तृतीयांश भाग कडुदवणा झाला, त्या पाण्याने पुष्कळ माणसे मेली कारण ते पाणी कडू झाले होते.
12त्यानंतर चौथ्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व ताऱ्यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यामुळे त्यांच्या प्रकाशाचे एक तृतीयांश तेज कमी झाले आणि एक तृतीयांश दिवसाचा तसेच एक तृतीयांश रात्रीचाही प्रकाश नाहीसा झाला.
13मी पाहिले तेव्हा एक गरूड अंतराळात उंच उडताना दृष्टीस पडला. त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, “इतर तीन देवदूत कर्णा वाजविणार आहेत, तेव्हा त्यांच्या कर्ण्यांच्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर किती अनर्थ, अनर्थ, अनर्थ ओढवणार आहे!”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in