तीत 1
1
विषयप्रवेश
1देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून:
देवाच्या निवडलेल्या लोकांच्या श्रद्धाबांधणीसाठी व त्यांना आपल्या धार्मिक सत्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मला निवडण्यात व पाठविण्यात आले.
2हे सत्य शाश्वत जीवनाच्या आशेवर आधारलेले असून सत्यवचनी परमेश्वराने काळाच्या प्रारंभापूर्वी ह्या जीवनाचे अभिवचन आम्हांला दिले 3आणि उचित समयी त्याच्या संदेशात ते त्याने प्रकट केले. हा संदेश माझ्याकडे सोपविण्यात आला होता व मी आपल्या तारणाऱ्या देवाच्या आदेशानुसार तो जाहीर करीत आहे.
4हे पत्र मी तीतला लिहिले आहे. ज्या श्रद्धेत आम्ही सहभागी झालो आहोत त्या श्रद्धेत तो माझा खराखुरा पुत्र आहे.
देवपिता व आपला तारणारा येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो.
वडीलजनांची निवडणूक
5मी तुला क्रे त येथे ह्यासाठी सोडून आलो की, तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला दिलेल्या आदेशानुसार तू प्रत्येक नगरात वडीलजन नेमावेत. 6ज्याला नेमावयाचा तो निर्दोष असावा; तो एका स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वास ठेवणारी असावीत व त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसावा, ती बंडखोर नसावीत. 7ख्रिस्तमंडळीचा बिशप हा देवाचा कारभारी आहे, म्हणून तो निर्दोष असला पाहिजे. तो उर्मट, रागीट, मद्यपी, हिंसक व पैशासाठी हपापलेला नसावा, 8तर अतिथिप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, सुज्ञ, नीतिमान, भक्तिमान, शिस्तप्रिय 9आणि दिलेल्या शिक्षणानुसार विश्वसनीय वचनाला धरून राहणारा असावा; ह्यासाठी की, त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व विरोधकांना निरुत्तर करावयासही समर्थ व्हावे.
खोटे शिक्षक
10पुष्कळ लोक निरर्थक बडबड करीत बंडखोरपणाने वागतात व काही लोकांना फसवितात. सुंता झालेल्या लोकांमधून धर्मांतरित झालेल्यांचा अशा लोकांमध्ये विशेषकरून समावेश आहे. 11त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. जे शिकवू नये ते अनीतीने पैसा मिळविण्यासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्यांच्या विश्वासाचा नाश करतात. 12त्या लोकांतील त्यांचाच कोणी एक संदेष्टा म्हणतो की, क्रेत येथील लोक सदा लबाड, दुष्ट, पाशवी, आळशी व खादाड असतात. 13ही साक्ष खरी आहे, म्हणून त्यांच्या पदरी स्पष्ट दोष घाल, 14ह्यासाठी की, त्यांनी यहुदी कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांचे आदेश ह्यांकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे. 15शुद्ध लोकांना सर्व काही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे ह्यांना काहीच शुद्ध नाही. त्यांचे मन व सदसद्विवेक बुद्धी ही विटाळलेली आहेत. 16आपण देवाला ओळखतो असे ते जाहीर करतात परंतु कृतींनी त्याला नाकारतात. ते तिरस्करणीय व आज्ञाभंग करणारे असून प्रत्येक चांगल्या कामासाठी अपात्र आहेत.
Currently Selected:
तीत 1: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.