11
1मी ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुसरण करतो, तसे तुम्हीही माझे अनुसरण करा.
उपासनेत मस्तक आच्छादून घेणे
2सर्व गोष्टीत तुम्ही माझी आठवण करता म्हणून मी तुमची प्रशंसा करतो व ज्या रूढी मी तुम्हाला सोपवून दिल्या, त्या तुम्ही घट्ट धरून ठेवल्या आहेत. 3परंतु एक गोष्ट तुम्हाला समजावी अशी माझी इच्छा आहे, प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे आणि प्रत्येक स्त्रीचे मस्तक तिचा पती आहे, ख्रिस्ताचा मस्तक परमेश्वर आहे. 4जो प्रत्येक पुरुष प्रार्थना करताना किंवा संदेश सांगताना आपल्या डोक्यावर आच्छादन ठेवतो, तो त्याच्या मस्तकाचा अनादर करतो. 5तसेच जी स्त्री डोक्यावर आच्छादन न घेता प्रार्थना करते किंवा संदेश सांगते, ती आपल्या पतीचा अनादर करते. तसे करणे म्हणजे जणू काय तिने आपल्या डोक्याचे मुंडण केल्यासारखे आहे. 6एखाद्या स्त्रीला डोक्यावर आच्छादन घेण्याची इच्छा नसेल, तर तिने केस कापावे किंवा मुंडण करावे आणि केस कापणे किंवा मुंडण करणे हे तिला लाजिरवाणे वाटत असेल, तर तिने डोक्यावर आच्छादन घ्यावे.
7पुरुषाने आपले मस्तक झाकणे योग्य नाही, कारण तो परमेश्वराचे प्रतिरूप व गौरव आहे; परंतु स्त्री पुरुषाचे गौरव आहे. 8कारण पुरुष स्त्रीपासून झाला नाही, परंतु स्त्री पुरुषापासून झाली. 9पुरुष स्त्रीसाठी निर्माण करण्यात आला नव्हता, परंतु स्त्री पुरुषासाठी निर्माण करण्यात आली. 10या कारणासाठी स्त्रीने आपल्या अधिकाराचे चिन्ह म्हणून देवदूतांकरिता स्वतःचे मस्तक आच्छादावे. 11प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही आणि पुरुषही स्त्रीपासून स्वतंत्र नाही. 12कारण जशी स्त्री पुरुषापासून, त्याचप्रमाणे सर्व पुरुष स्त्रीपासूनच जन्मले, परंतु सर्वकाही परमेश्वरापासून आहे.
13त्यासंबंधी तुम्हीच निर्णय घ्या: स्त्रीने आपले मस्तक आच्छादून न घेता परमेश्वराची प्रार्थना करणे योग्य आहे काय? 14निसर्ग आपणास शिकवितो की लांब केस असणे हे पुरुषास लज्जास्पद आहे, 15परंतु जर स्त्रीचे लांब केस आहेत तर ते तिचे गौरव आहे, कारण आच्छादन म्हणूनच तिला लांब केस दिलेले आहेत. 16याबाबतीत कोणी वाद घालत असेल, तर आम्हामध्ये आणि परमेश्वराच्या सर्व मंडळ्यांमध्ये इतर रीत प्रचलित नाही.
प्रभूभोजना संबंधी चुका दुरुस्त करणे
17आता खालील गोष्टीबद्दल मला तुमची प्रशंसा करता येत नाही, कारण तुमचे सभेमध्ये एकत्र येणे तुमचे हित करण्यापेक्षा अधिक नुकसानच करते. 18पहिली गोष्ट अशी की मंडळी म्हणून तुम्ही एकत्र येत असला तरी, तुमच्यात फूट आहे, असे मी ऐकतो आणि त्यावर काही अंशी माझा विश्वास आहे. 19तुम्हामध्ये मतभेद असणे गरजेचे आहे, म्हणजे परमेश्वराने मान्यता दिलेले कोण आहेत, हे आपोआप उघड होईल. 20तुम्ही एकत्र येता, तेव्हा ते केवळ प्रभुभोजन खाण्यासाठी नव्हे, 21जेव्हा तुम्ही भोजन करता, तेव्हा तुमच्यातील काहीजण इतरांचा विचार न करता स्वतःचे भोजन करतात. याचा परिणाम, एकजण उपाशी राहतो व दुसरा द्राक्षारसाने ओतप्रोत भरतो. 22खाणेपिणे करण्यासाठी तुम्हाला स्वतःची घरे नाहीत काय? किंवा तुम्ही परमेश्वराच्या मंडळीचा अनादर करून ज्यांच्याजवळ काहीच नाही, त्यांना लाजविता काय? मी तुम्हाला काय म्हणावे? मी तुमची प्रशंसा करावी काय? याबाबतीत अजिबात नाही.
23जे मला प्रभूपासून प्राप्त झाले ते मी तुम्हाला सोपवून दिले आहे: ज्या रात्री प्रभू येशूंचा विश्वासघात करण्यात आला, त्या रात्री त्यांनी भाकर घेतली, 24आणि आभार मानून ती मोडली आणि ते म्हणाले, “हे माझे शरीर तुमच्याकरिता दिले जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.” 25त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर, प्याला घेतला व म्हणाले, “हा प्याला माझ्या रक्ताने केलेला नवा करार आहे; ज्या ज्यावेळी तुम्ही हा प्याल, त्यावेळी हे माझ्या स्मरणार्थ करा.” 26कारण ज्यावेळी तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे पुनरागमन होईपर्यंत प्रभूच्या मृत्यूची घोषणा करता.
27आणि म्हणून, जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खातो किंवा प्रभूचा प्याला पितो, तो प्रभूचे शरीर आणि रक्त याविरुद्ध पाप करतो. 28याच कारणासाठी ही भाकर खाण्यापूर्वी आणि हा प्याला पिण्यापूर्वी प्रत्येकाने आपले आत्मपरीक्षण करावे. 29जो ख्रिस्ताचे मंडळीरूपी शरीर न ओळखता अयोग्य प्रकारे ही भाकर खातो आणि हा प्याला पितो, तो स्वतःवर न्याय ओढवून घेतो. 30म्हणूनच तुमच्यामध्ये अनेकजण दुर्बल व आजारी आहेत, एवढेच नव्हे तर काहीजण मृत्यू पावले आहेत. 31परंतु जर तुम्ही स्वतःला पडताळून पाहिले असते, तर तुमचा असा न्याय झाला नसता. 32जरी आपला न्याय प्रभूने अशा रीतीने केला, तरी तुम्हाला शिस्त लागावी, यासाठी की शेवटी जगाबरोबर आपणही दोषी ठरविले जाऊ नये.
33म्हणूनच, प्रिय बंधूंनो व भगिनींनो, तुम्ही भोजनासाठी एकत्र येता, तेव्हा सर्वजण एकमेकांसाठी थांबून एकत्रित भोजन करा. 34तुमच्यापैकी कोणी भुकेला असला तर त्याने घरीच काहीतरी खाऊन यावे, यासाठी की जेव्हा तुम्ही एकत्रित जेवता त्यावेळी दंडपात्र होऊ नये.
इतर बाबींसंबंधी मी तिकडे आल्यावर पुढील मार्गदर्शन करेन.