1 करिंथकरांस 14
14
उपासनेमध्ये सुबोधता
1प्रीतीचा मार्ग अनुसरा, तरीपण आत्म्याच्या देणग्यांची इच्छा बाळगत राहा, विशेषतः संदेश सांगण्याचे. 2कारण जेव्हा तुम्ही अन्य भाषा बोलता तेव्हा माणसाशी नव्हे तर परमेश्वराशी बोलता. निश्चित, तुम्ही आत्म्याद्वारे गूढ बोलत असाल तर तुमचे बोलणे कोणालाही समजणार नाही. 3परंतु जो कोणी संदेश देतो तो लोकांची आत्मिक वृद्धी, प्रोत्साहन, आणि समाधान व्हावे म्हणून बोलतो. 4जो अन्य भाषेत बोलतो तो स्वतःचीच उन्नती करतो. परंतु जो संदेश देतो, तो मंडळीची प्रगती करण्यास मदत करतो. 5तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे अशी माझी इच्छा आहे, परंतु त्याऐवजी तुम्ही संदेश देणारे व्हावे. कारण अन्य भाषा बोलण्यार्यांनी अर्थ नाही सांगितला तर मंडळीची उन्नती कशी होईल, पण त्यापेक्षा संदेश देणारे अधिक श्रेष्ठ आहेत.
6बंधू व भगिनींनो, समजा मी तुमच्याकडे आलो आणि अन्य भाषेत बोलू लागलो, तर तुम्हाला माझा काय फायदा, याउलट मी तुमच्यासाठी काही प्रकटीकरण, किंवा ज्ञान किंवा संदेश दिला किंवा वचनाचा बोध आणला तर चांगले होणार नाही का? 7बासरी किंवा वीणा यांसारख्या निर्जीव वस्तू ध्वनी उत्पन्न करतात, परंतु प्रत्येक वाद्याच्या स्वरात भिन्नता असल्याशिवाय कोणते वाद्य वाजत आहे हे कसे समजणार? 8जर कर्णे स्पष्ट स्वर काढणार नाही, तर युद्धावर जाण्यासाठी तयारी कोण करेल? 9तुमच्याबाबतीत असेच आहे. त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेत बोलल्याशिवाय, तुम्ही काय म्हणता हे इतरांना कसे समजेल? तुम्ही फक्त वार्याबरोबर बोलत आहात असे होईल. 10निःसंशय जगामध्ये निरनिराळ्या भाषा आहेत, परंतु एकही अर्थाविना नाही. 11जर मला एखाद्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याची क्षमता नाही, तर माझ्याशी बोलणारा मनुष्य मला विदेशी वाटेल आणि मीही त्याला विदेशी वाटेन. 12तुमच्याबाबतीत असेच आहे. ज्याअर्थी तुम्ही आत्मिक दानांसाठी उत्सुक आहात, तर मग मंडळीची वृद्धी व्हावी यासाठी ती दाने विपुल प्रमाणात मिळावी म्हणून नेहमी प्रयत्न करा.
13या कारणासाठी एखादा अन्य भाषेत बोलतो, तर त्याने आपण काय बोललो याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. 14कारण मी अन्य भाषेत प्रार्थना करतो, तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझे मन निष्फळ आहे. 15मी काय करावे? मी आत्म्याने प्रार्थना करेन, परंतु माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करेन, मी आत्म्याने गीते गाईन व त्याचबरोबर बुद्धीनेही गीते गाईन. 16जेव्हा तुम्ही फक्त आत्म्याने परमेश्वराची उपकारस्तुती कराल, तर जो चौकशी करणारा किंवा अविश्वासू व्यक्ती, ज्याला तुम्ही काय बोलता हे समजत नाही तो तुमच्या स्तुतीला “आमेन” कसा म्हणू शकेल? 17तुम्ही पुरेशी स्तुती करता, परंतु याद्वारे कोणाचीच उन्नती होणार नाही.
18मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक अन्य भाषेत बोलू शकतो, याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. 19परंतु मंडळीत अन्य भाषेतून दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, इतरांना बोध होईल असे पाच शब्द बोलणे मी अधिक पसंत करेन.
20प्रिय बंधूंनो व भगिनींनो, तुम्ही लेकरांसारखे विचार करण्याचे सोडून द्या. वाईटाच्या बाबतीत तुम्ही बालकांसारखे, परंतु विचारांच्या बाबतीत प्रौढ व्हा. 21नियमशास्त्रात आपल्याला सांगितले आहे:
“अन्य भाषा बोलणारे
परक्यांच्या ओठांद्वारे
मी या लोकांशी बोलेल,
परंतु तरीही हे लोक माझे ऐकणार नाहीत.
असे प्रभू म्हणतात.”#14:21 यश 28:11‑12
22अन्य भाषा बोलता येणे ही विश्वास ठेवणार्यांसाठी चिन्ह नसून, विश्वास न ठेवणार्यांसाठी चिन्ह आहे. परंतु संदेश देणे, हे विश्वास ठेवणार्यांसाठी आहे, विश्वास न ठेवणार्यांसाठी नाही. 23तरीपण चौकशी करणारा किंवा अविश्वासी मनुष्य तुमच्या मंडळीत आला आणि त्याने तुम्हा सर्वांना अन्य भाषेतून बोलताना ऐकले, तर तुम्ही सर्वजण वेडे आहात असेच त्याला वाटेल. 24परंतु तुम्ही सर्वजण संदेश देत असताना एखादा चौकशी करणारा किंवा अविश्वासू मनुष्य आत आला तर त्याला पापी असल्याची खात्री पटेल आणि सर्व त्याचा निवाडा करतील. 25त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी उघड होतील; आणि, “तुम्हामध्ये निश्चितच परमेश्वर आहे!” असे जाहीर करून तो पालथा पडेल व परमेश्वराची उपासना करेल.
उपासनेमध्ये सुव्यवस्था
26मग बंधूंनो व भगिनींनो, आपण काय म्हणावे? जेव्हा तुम्ही एकत्र येता, त्यावेळी तुमच्यापैकी प्रत्येकाजवळ असलेले गीत किंवा बोधपर शब्द, किंवा प्रकटीकरण, किंवा अन्य भाषा, किंवा अर्थ सांगण्याची प्रत्येकाची तयारी असावी. या सर्वगोष्टी अशा रीतीने व्हाव्या की ज्याद्वारे मंडळीची उन्नती होईल. 27कोणी अन्य भाषेत बोलतो, तर दोन किंवा जास्तीत जास्त तीन क्रमानुसार, एकजण एकावेळी बोलेल आणि दुसरा अर्थ सांगेल. 28पण अर्थ सांगणारा उपस्थित नसला, तर अन्य भाषा बोलणार्यांनी मंडळीत शांत राहवे. त्याने स्वतःशी व परमेश्वराशी बोलावे.
29संदेश देणार्यांपैकी दोघांनी किंवा तिघांनीच बोलावे आणि इतरांनी संदेशाची काळजीपूर्वक पारख करावी. 30बसलेल्यांपैकी एखाद्याला काही प्रकटीकरण झाले, तर पहिल्या संदेश देणार्यांनी शांत व्हावे. 31ते एकामागून एक संदेश देतील म्हणजे प्रत्येकाला बोध मिळून त्यांना उत्तेजन मिळेल. 32संदेश देणार्याचे आत्मे संदेश देणार्यांच्या नियंत्रणात असतात. 33कारण परमेश्वर हे अव्यवस्था व गोंधळ यांचे परमेश्वर नसून शांततेचे आहेत—हे प्रभूच्या सर्व मंडळ्यांमध्ये दिसले पाहिजे.
34स्त्रियांनी मंडळीमध्ये शांत राहवे. स्त्रियांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी अधीन राहवे. 35त्यांना काही गोष्टींची चौकशी करावयाची असल्यास, त्यांनी आपल्या पतीला घरी विचारावे. कारण एखाद्या स्त्रीने मंडळीला प्रवचन देणे ही लज्जास्पद बाब आहे.
36परमेश्वराच्या वचनाचा प्रारंभ तुम्हापासूनच झाला काय? आणि हे वचन फक्त तुम्हा लोकांपर्यंतच पोहोचले काय? 37आपल्याला पवित्र आत्म्याकडून संदेश देण्याचे किंवा दुसरे दान मिळाले आहे, असे वाटणार्यांनी हे ओळखावे, की मी जे लिहित आहे ती प्रभूची आज्ञा आहे. 38जर कोणी याकडे दुर्लक्ष करेल, तर त्यांच्याकडेही दुर्लक्ष केल्या जाईल.
39यास्तव, माझ्या बंधूंनो व भगिनींनो, संदेश देण्याची उत्कट इच्छा धरा आणि अन्य भाषेतून जे बोलतात त्यांना मना करू नका. 40तरीपण प्रत्येक गोष्ट सुव्यवस्थित आणि योग्यरीतिने केली जावी.
Currently Selected:
1 करिंथकरांस 14: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.