YouVersion Logo
Search Icon

1 करिंथकरांस 3

3
मंडळीतील नेते
1प्रिय बंधुनो आणि भगिनींनो, आत्म्याच्याद्वारे जीवन जगत असलेल्या लोकांबरोबर बोलावे तसे मी तुमच्याबरोबर बोलू शकलो नाही, कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये लहान बालक असून अजूनही दैहिक आहात. 2मी तुम्हाला दूध दिले, जड अन्न दिले नाही, कारण तुम्ही त्यासाठी तयार नव्हता आणि निश्चित त्यासाठी तुम्ही अजूनही तयार नाही. 3तुम्ही अजूनही दैहिक आहा. तुम्हामध्ये भांडणे आणि मत्सर आहेत, तुम्ही दैहिक आहात की नाही? तुम्ही केवळ सामान्य मानवासारखे वागता की नाही? 4तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे” आणि दुसरा “मी अपुल्लोसाचा अनुयायी आहे,” यावरून तुम्ही सामान्य मनुष्य आहात नाही काय?
5तर मग काय, अपुल्लोस तरी कोण आहे? मी पौल कोण आहे? आम्ही तर केवळ परमेश्वराचे सेवक, त्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला—प्रभुने प्रत्येकाला कामगिरी सोपवून दिली होती. 6मी बी पेरले, अपुल्लोसाने पाणी घातले, परंतु परमेश्वराने वाढविले. 7पेरणारा किंवा पाणी घालणारा कोणी काही नाही, तर फक्त परमेश्वरच जे त्याची वाढ करतात. 8जो पेरतो व जो पाणी घालतो त्यांचा हेतू एकच आहे आणि त्या दोघांनाही त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ मिळेल. 9आम्ही परमेश्वराच्या सेवेतील सहकारी आहो. तुम्ही परमेश्वराचे शेत आहा, परमेश्वराची इमारत आहा.
10परमेश्वराने जी कृपा मला दिली आहे, त्यानुसार मी कुशल बांधकाम करणार्‍यासारखा पाया घातला आणि आणखी कोणी त्यावर बांधकाम करीत आहे. परंतु प्रत्येकाने बांधकाम काळजीपूर्वक केले पाहिजे. 11जो पाया अगोदरच घातलेला आहे, जे स्वतः येशू ख्रिस्त आहे, त्याव्यतिरीक्त दुसरा पाया कोणालाही घालता येणार नाही. 12जर या पायांवर कोणी सोने, चांदी, रत्ने व माणके आणि कोणी केवळ लाकूड, गवत व पेंढया वापरून बांधकाम करेल. 13तर त्या प्रत्येकाचे काम जसे आहे तसे दिसेल, कारण तो दिवस ते प्रकाशात आणेल. अग्निद्वारे ते प्रकट होईल, प्रत्येकाचे काम कसे आहे हे अग्निने पारखले जाईल. 14बांधलेले टिकून राहिले, तर बांधकाम करणार्‍याला त्याचे प्रतिफळ मिळेल. 15परंतु जर ते जळून गेले, तर बांधकाम करणार्‍याला हानी सोसावी लागेल; परंतु तो स्वतः वाचेल, परंतु जणू काय अग्नी ज्वालांतून बाहेर ओढून काढल्यासारखाच वाचेल.
16तुम्ही स्वतः परमेश्वराचे मंदिर आहा आणि परमेश्वराचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो हे तुम्हाला माहीत नाही का? 17जर कोणी परमेश्वराच्या मंदिराचा नाश करतो, तर परमेश्वरसुद्धा त्या व्यक्तिचा नाश करतील. कारण परमेश्वराचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्ही मिळून ते मंदिर आहा.
18तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. जर तुमच्यापैकी कोणी या युगाच्या रितीप्रमाणे स्वतःला ज्ञानी समजत असेल, तर ज्ञानी होण्यासाठी त्याला “मूर्ख” व्हावे लागेल, 19कारण या जगाचे ज्ञान परमेश्वराच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. असे लिहिले आहे: “ते ज्ञानी लोकांना त्यांच्याच धूर्तपणात पकडतात,”#3:19 ईयोब 5:13 20आणि पुन्हा, “ज्ञानी लोकांचे विचार निरर्थक असतात हे प्रभुला ठाऊक आहे.”#3:20 स्तोत्र 94:11 21तेव्हा मानवी नेत्यांची बढाई मारू नका! कारण सर्वकाही तुमचे आहे. 22मग तो पौल, अपुल्लोस किंवा केफा#3:22 केफा म्हणजे पेत्र किंवा जग, जीवन आणि मरण किंवा सांप्रत काळ किंवा भविष्यकाळ हे सर्व तुमचे आहेत. 23पण तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त परमेश्वराचे आहेत.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in