YouVersion Logo
Search Icon

1 पेत्र 3

3
1पत्नींनो याचप्रकारे तुम्ही तुमच्या पतीच्या आज्ञेत राहा, म्हणजे त्यांच्यापैकी कोणी जर परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवीत नाहीत, तर ते वचनाशिवाय त्यांच्या पत्नींच्या वर्तणुकीद्वारे जिंकले जाऊ शकतात; 2कारण ते तुमच्या जीवनातील शुद्धता आणि आदर पाहतात. 3जसे की केशरचना आणि सोन्याचे दागदागिने घालणे किंवा आकर्षक वस्त्रे घालणे या बाह्य गोष्टींवर तुमचे सौंदर्य केवळ अवलंबून नसावे, 4तर याउलट ते तुमच्या अंतःकरणाच्या, न झिजणार्‍या पण सौंदर्यपूर्ण शांत आणि सौम्य आत्म्याचे असावे, जे परमेश्वराच्या दृष्टीने अति मोलवान आहे. 5कारण पूर्वीच्या काळातील पवित्र स्त्रिया ज्यांची परमेश्वरावर आशा होती, त्या अशाच प्रकारे स्वतःला सजवित असत. त्यांनी स्वतःला त्यांच्या पतीच्या अधीन केले होते, 6ज्याप्रमाणे सारा अब्राहामाच्या आज्ञेत राहिली आणि त्याला तिचा प्रभू असे म्हणाली. जर तुम्ही भीती न बाळगता जे चांगले ते करीत आहात, तर तुम्ही तिच्या मुली आहात.
7पतींनो, त्याच प्रकारे तुम्ही आपल्या पत्नीबरोबर राहत असताना त्या नाजूक आहेत म्हणून सुज्ञतेने राहा, तुमच्याबरोबर त्यादेखील कृपेच्या जीवनाच्या देणग्यांच्या वतनदार आहेत, म्हणून त्यांना मान द्या म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही.
चांगले करण्यासाठी दुःख सहन करणे
8सारांश, तुम्ही सर्व एकचित्ताने एकमेकांवर खर्‍या प्रीतीने व सहानुभूतीने बंधुप्रीती करणारे, दयाळू व नम्र असे व्हा. 9वाईटाची फेड वाईटाने किंवा अपमानाची फेड अपमानाने करू नका. याउलट, वाईटाची फेड आशीर्वाद देऊन करा, कारण आशीर्वाद हे वतन मिळविण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. 10कारण,
“जो जीवनावर प्रीती करतो
आणि चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो,
तर त्यांनी आपली जीभ वाईटापासून
आणि आपले ओठ कपट बोलण्यापासून राखावे.
11त्यांनी वाईटाचा त्याग करावा आणि चांगले ते करावे;
त्यांनी शांतीचा यत्न करावा व तिच्यामागे लागावे.
12कारण प्रभूचे नेत्र नीतिमानांवर आहेत,
आणि त्यांचे कान नीतिमानांच्या प्रार्थनेकडे लागलेले असतात.
परंतु प्रभूचे मुख जे वाईट करतात त्यांच्याविरुद्ध आहे.”#3:12 स्तोत्र 34:12‑16
13चांगले करण्याची आस्था असेल, तर सहसा कोणी तुम्हाला अपाय करणार नाही. 14जर तुम्ही चांगले केल्याबद्दल सहन करता, तर तुम्ही आशीर्वादित आहात. “त्यांच्या अफवांना भिऊ नका आणि घाबरू नका.”#3:14 यश 8:12 15ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात आदरणीय माना. तुमच्यामध्ये जी आशा आहे व ती का आहे, याविषयी विचारपूस करणार्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा आणि ते सौम्यतेने व आदरपूर्वक करा. 16आदरयुक्त, शुद्ध विवेकबुद्धीला अनुसरून राहा, म्हणजे ख्रिस्तामधील तुमच्या चांगल्या वागणुकीविरुद्ध जे लोक द्वेषभावाने बोलतात, त्यांना निंदानालस्तीची लाज वाटेल. 17तुम्ही दुःख सोसावे अशी परमेश्वराची इच्छा असेल, तर वाईट करून दुःख भोगण्यापेक्षा, चांगले करून दुःख सोसणे, अधिक चांगले आहे! 18नीतिमान असताना अनीतिमान लोकांना, तुम्हाला परमेश्वराकडे न्यावे म्हणून ख्रिस्तानेसुद्धा पापांसाठी एकदाच दुःख सोसले, शारीरिक दृष्टीने त्यांचा मृत्यू झाला होता, परंतु आत्म्यामध्ये त्यांना जिवंत केले होते. 19जिवंत झाल्यानंतर येशू गेले आणि बंदीशाळेतील आत्म्यांना संदेश दिला 20ज्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नव्हते; पूर्वी नोआहच्या काळामध्ये जहाज बांधले जात असताना परमेश्वराने धीराने त्यांची वाट पाहिली. त्यामध्ये असलेले फक्त थोडे लोक, सर्व मिळून आठजण पाण्यामधून वाचले होते. 21ते पाणी आपल्यासाठी बाप्तिस्म्याचे चित्र आहे, ते शरीराची घाण काढून नाही तर परमेश्वराकडे सदसद्विवेकबुद्धीची प्रतिज्ञा केल्याने आता तुम्हालासुद्धा वाचविते. ते तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे वाचविते. 22ते येशू आता स्वर्गात गेले आहेत आणि परमेश्वराच्या उजवीकडे असून सर्व स्वर्गदूत, अधिकार आणि सत्ता त्यांच्या अधीन आहेत.

Currently Selected:

1 पेत्र 3: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in