YouVersion Logo
Search Icon

1 तीमथ्य 6

6
1जे दास म्हणून जुवाखाली आहेत त्यांनी आपआपल्या धन्यास सर्व सन्मानास योग्य मानावे, यासाठी की परमेश्वराच्या नावाची आणि शिकवणीची निंदा होऊ नये. 2त्यांचा धनी विश्वासी असल्यास त्यांना ते बंधूसारखे आहेत, त्यांनी त्यांचा अवमान करू नये, उलट जास्त आदराने सेवा करावी, कारण जे तुमच्या सेवेचा लाभ घेणारे आहेत ते विश्वासणारे व प्रिय आहेत.
खोटे शिक्षक
या गोष्टी त्यांना शिकवून पालन करण्यास सांग. 3जर कोणी, इतर कोणतेही मत शिकवितो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा योग्य बोध आणि सुभक्तीचे शिक्षण मान्य करीत नाही, 4तर तो अहंकारी आहे व त्याला काहीच समजत नाही. त्याला शब्दयुद्ध व वादविवाद यांची विकृत आवड आहे. यांच्यापासूनच हेवा, कलह, कोणाची बदनामी होईल असे बोलणे, दुष्ट संशय, 5आणि ज्यांच्यापासून सत्य हिरावून घेतले आहे आणि ज्यांना भक्ती द्रव्यलोभाचे एक साधन वाटते, अशा भ्रष्ट मनाच्या माणसांमध्ये सतत भांडणे होतात.
6परंतु संतोषासहित असणारी सुभक्ती ही मोठीच मिळकत आहे. 7कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपण जाताना बरोबर काहीही घेऊन जाणार नाही. 8म्हणून आपल्याजवळ पुरेसे अन्नवस्त्र असले की त्यामध्ये आपण तृप्त असावे. 9जे श्रीमंत होण्याची इच्छा धरतात, ते परीक्षेत आणि पाशात व अति मूर्खपणाच्या आणि अपायकारक अभिलाषांच्या आहारी जातात, जी त्यांना अधोगतीला नेऊन त्यांचा संपूर्ण नाश करतात. 10कारण पैशाचा लोभ सर्वप्रकारच्या दुष्टाईचे एक मूळ होय. पैशाच्या आसक्तीने कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस अनेक दुःखांनी भेदून घेतले आहे.
तीमथ्याला शेवटचा कार्यभार
11परंतु हे परमेश्वराच्या माणसा, तू या सर्व गोष्टींपासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग. 12विश्वासाचे सुयुद्ध लढ. परमेश्वराने तुला केलेले पाचारण आणि सार्वकालिक जीवन धरून ठेव, ज्याचा अनेक साक्षीदारांसमक्ष तू अंगीकार केला आहे. 13सर्वांना जीवन देणार्‍या परमेश्वरासमक्ष आणि पंतय पिलातासमोर निर्भयपणाने साक्ष देणार्‍या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आज्ञा करतो 14आपले प्रभू येशू ख्रिस्त परत येईपर्यंत या आज्ञा दोषरहित आणि निर्दोष ठेव. 15-16परमेश्वर जे योग्य समयी त्याला पूर्ण करतील, परमेश्वर जे धन्यवादित व एकच सर्वसमर्थ, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जे अगम्य प्रकाशात राहतात, ज्यांना कोणीही पाहिले नाही, आणि कोणीही पाहू शकत नाही; त्यांना सदासर्वकाळ गौरव आणि चिरकाल सामर्थ्य असो. आमेन.
17जगातील श्रीमंतांना निक्षून सांग की त्यांनी गर्विष्ठ आणि उद्धट होऊ नये; त्या धनावर विसंबून राहू नये. तर परमेश्वर जे आपल्या उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतात, त्याचा अभिमान बाळगा व त्यांच्यावर भरवसा ठेवा. 18त्यांना चांगले ते करण्यासाठी, सत्कर्माविषयी धनवान व गरजवंतांना औदार्याने देणे व परोपकारी असण्याविषयी आज्ञा द्या. 19अशाप्रकारे, ही संपत्ती त्यांच्या भावी युगाच्या पायाभरणीसाठी खर्च केली जाईल, जेणेकरून जे जीवन जगू शकतील ते वास्तव आहे.
20हे तीमथ्या, जी ठेव तुला सोपविली आहे तिचे रक्षण कर आणि अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि ज्ञानाच्या फुशारक्या मारणार्‍याबरोबर मूर्खपणाचे वाद वर्ज्य कर. 21कित्येक ती स्वीकारून विश्वासापासून ढळले आहेत.
परमेश्वराची कृपा तुझ्याबरोबर असो.

Currently Selected:

1 तीमथ्य 6: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in