2 करिंथकरांस 1
1
1परमेश्वराच्या इच्छेने, ख्रिस्त येशूंचा प्रेषित झालेला पौल आणि आपला बंधू तीमथ्य याजकडून,
करिंथ येथील परमेश्वराची मंडळी आणि अखया प्रांतातील चहूकडील सर्व पवित्र लोकांस:
2परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.
सर्व सांत्वन करणार्या परमेश्वराची स्तुती
3आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता आणि आपला परमेश्वर, करुणेचा पिता आणि सर्व सांत्वन करणारे परमेश्वर यांची स्तुती असो. 4ते आपल्या सर्व दुःखांमध्ये आपले सांत्वन करतात, यासाठी की जे सांत्वन आम्हाला परमेश्वराकडून मिळाले आहे, त्या सांत्वनाने जे कोणत्याही दुःखात आहेत त्यांचे सांत्वन करावे. 5ज्याप्रकारे आम्ही ख्रिस्ताच्या अगणित दुःखांमध्ये सहभागी आहोत, त्याच प्रकारे आमचे सांत्वनही ख्रिस्ताद्वारे विपुल होते. 6जर आम्ही दुःखी आहोत तर ते तुमच्या सांत्वनासाठी व तारणासाठी; जर आम्हाला सांत्वन लाभले आहे, तर ते तुमच्या सांत्वनासाठी, यासाठी की जी दुःखे आम्ही सोसतो व जी तुम्हीही सोसत आहात, त्यामुळे तुम्हामध्ये धीर व सहनशीलता उत्पन्न व्हावी 7आणि तुमच्याबद्दलची आमची आशा स्थिर आहे व जसे तुम्ही आमच्या दुःखामध्ये तसेच आमच्या सांत्वनातही सहभागी झाला आहात.
8प्रिय बंधूंनो व भगिनींनो, आशिया प्रांतात ज्या दुःखाच्या अनुभवातून आम्हास जावे लागले, त्याबद्दल तुम्ही अज्ञानी असावे अशी आमची इच्छा नाही. आमच्या सहनशक्तीपलीकडे आम्ही ओझ्याखाली अगदी दबून गेलो की; आम्ही जीवनाची आशा सोडून दिली होती. 9खरोखर आम्हाला मृत्यूची दंडाज्ञा ठरलेली आहे असे वाटले, हे यासाठी झाले की आम्ही केवळ स्वतःवर अवलंबून न राहता, जे मृतांना उठवितात त्या परमेश्वरावरच अवलंबून राहावे. 10त्यांनी आम्हाला मरणाच्या धोक्यातून सोडविले आणि ते पुन्हा आम्हाला असेच सोडवतील. आम्ही त्यांच्यावर आशा ठेवली आहे की ते आम्हाला असेच पुढेही सोडवित राहतील. 11परंतु तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हाला मदत करावी. कारण जो कृपेचा अनुग्रह सर्वांच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून आम्हास मिळाला आहे, त्याबद्दल आमच्यावतीने अनेकजण परमेश्वराची स्तुती करतील.
पौलाच्या बेतात बदल
12हे आम्हाला गर्वाचे कारण आहे: आमच्या सर्व व्यवहारात आमच्या विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की या जगात आणि तुमच्या संबंधात, आम्ही पवित्र आणि ईश्वरी प्रामाणिकपणाने भरलेले होतो. हे ऐहिक ज्ञानावर नव्हे तर परमेश्वराच्या कृपेवर अवलंबून राहिल्यामुळे आम्ही करू शकलो. 13तुम्हाला जे समजत नाही किंवा वाचता येत नाही असे आम्ही काहीच लिहित नाही. आमची आशा आहे की, 14जरी तुम्ही थोडेफार आम्हाला ओळखता आणि पुढे तुम्हाला पूर्णपणे कळून येईल की प्रभू येशूंच्या दिवशी जसा तुम्हाला आमचा अभिमान आहे, तसाच आम्ही पण तुमच्याविषयी अभिमान बाळगू.
15या गोष्टीचा मला भरवसा होता की मी प्रथम तुमची भेट घ्यावी यासाठी की तुम्हाला दोनदा लाभ व्हावा. 16मी मासेदोनियास जाताना, वाटेत थांबून तुम्हाला भेटावे आणि तसेच मासेदोनियाहून परत येतांना भेटावे आणि तुम्ही मला पुढे यहूदीयाकडे वाटेस लावले असते. 17मी हे बेत चंचलवृतीने केले काय? मी ऐहिक रीतीने माझ्या योजना करतो काय किंवा “होय, होय” आणि “नाही, नाही” असे म्हणतो का?
18ज्याप्रकारे परमेश्वर खात्रीने विश्वासू आहे, तेवढ्याच खात्रीने आमचा संदेश “होय” आणि “नाही” असा नाही. 19तीमथ्य, सीला#1:19 ग्रीक सिल्वानस व मी, तुम्हाला परमेश्वराचे पुत्र येशू ख्रिस्त यांच्याबद्दल संदेश सांगत आलो तो “नाही” आणि “होय” असा नाही, परंतु त्यांच्यामध्ये नेहमीच “होय” आहे. 20परमेश्वराने कितीही अभिवचने दिलेली असोत, ख्रिस्तामध्ये ती “होय” आहेत. परमेश्वराच्या नावाचे गौरव करीत आम्ही त्यांच्याद्वारे “आमेन” म्हणतो. 21आता हेच परमेश्वर जे तुम्हाला व आम्हाला असे आपणा दोघांना ख्रिस्तामध्ये स्थिर करतात. त्यांनी आमचा अभिषेक केला आहे, 22त्यांच्या मालकीहक्काचा शिक्का आमच्यावर मारला आहे आणि आमच्या अंतःकरणात पवित्र आत्मा ठेव म्हणून ठेवला आहे, जे येणार आहे त्याची हमी देत आहे.
23परमेश्वराला मी माझा साक्षीदार म्हणून हाक मारतो—आणि माझे जीवन पणाला लावले आहे—तुमची गय करावी म्हणून मी करिंथास परतलो नाही. 24तुमच्या विश्वासावर अधिकार दाखवावा म्हणून नव्हे, कारण विश्वासामुळेच तुम्ही स्थिर आहात, परंतु आम्ही तुमच्याबरोबर सहकर्मी होऊन आनंदासाठी परिश्रम करतो.
Currently Selected:
2 करिंथकरांस 1: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.