YouVersion Logo
Search Icon

2 करिंथकरांस 11

11
पौल आणि खोटे प्रेषित
1माझी आशा आहे की तुम्ही माझा थोडा मूर्खपणा सहन करून घ्याल. हो, कृपा करून सहन करून घ्या. 2तुम्हासाठी माझी जी आस्था आहे ती दैवी आस्था आहे. मी तुम्हाला एक पती, ख्रिस्त त्यांचे वचन दिले होते, म्हणजे मी तुम्हाला एक शुद्ध कुमारी म्हणून त्यांना सादर करावे. 3परंतु हव्वा जशी सापाकडून धूर्ततेने फसविली गेली, तसेच तुमची मने कशाने का होईना ख्रिस्तावरील तुमच्या शुद्ध व प्रामणिक भक्तीपासून भटकून जातील, अशी मला भीती वाटते. 4जर कोणी तुम्हाकडे येऊन आम्ही प्रचार करतो त्या येशूंऐवजी दुसर्‍या येशूंचा प्रचार करतो किंवा तुम्ही जो आत्मा स्वीकारला होता त्याऐवजी दुसरा आत्मा स्वीकारला, किंवा जी शुभवार्ता तुम्ही स्वीकारली त्या शुभवार्तेहून भिन्न अशी शुभवार्ता तुम्ही स्वीकारली, तर तुम्ही हे सहजपणे स्वीकारता व सहन करून घेता.
5जे “उच्च संदेष्टे”#11:5 किंवा प्रख्यात प्रेषित आहेत त्यांच्यापेक्षा मी कमी प्रतीचा आहे असे मी समजत नाही. 6मी अशिक्षित वक्ता असेन, परंतु मला ज्ञान आहे आणि ते आम्ही अनेक प्रकारे पटवून दिले आहे. 7परमेश्वराच्या शुभवार्तेचा संदेश तुम्हाला फुकट सांगितला व यात मी स्वतःला हीन केले व तुम्हाला उच्च केले तर यात मी पाप केले काय? 8इतर मंडळ्यांचे वेतन घेऊन मी जणू काय त्यांनाच लुबाडले यासाठी की मला तुमची सेवा करता यावी. 9आणि मी जेव्हा तुमच्याजवळ होतो आणि मला गरज पडली, मी कोणालाही ओझे झालो नाही, कारण मासेदोनियातून जे बंधू आले त्यांनी माझ्या गरजांची परिपूर्ती केली व माझे ओझे कोणत्याही प्रकारे तुम्हावर पडणार नाही आणि मी असेच पुढेही करेन. 10जोपर्यंत ख्रिस्ताचे सत्य मजमध्ये आहे, तोपर्यंत अखया प्रांतातील कोणीही मी करीत असलेल्या अभिमानास प्रतिबंध करू शकणार नाही 11का? कारण मी तुमच्यावर प्रीती करीत नाही? मी प्रीती करतो हे परमेश्वराला माहीत आहे!
12मी जे करतो ते करीत राहीन, यासाठी की जे आम्ही त्यांच्या समान आहोत असे मानतात व त्याबाबत प्रौढी मिरविण्याची संधी शोधतात त्यांना ती मिळू नये. 13कारण असे लोक खोटे प्रेषित, फसविणारे कामकरी, ख्रिस्ताचे प्रेषित आहोत असा समज करून फसविणारे आहेत. 14यात आश्चर्य वाटत नाही! कारण स्वतः सैतानही प्रकाशाचा दूत असे रूप धारण करतो. 15मग त्याचे सेवकही नीतिमान असल्याचे ढोंग करतात यात काही नवल नाही. त्यांच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा शेवट होईल.
पौल आपल्या दुःखसहनाची प्रौढी मिरवितो
16पुन्हा मी तुम्हाला सांगतो: मला मूर्ख समजू नका; आणि तसे तुम्ही मला समजत असाल तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा, यासाठी की मला थोडा गर्व करण्याचा प्रसंग मिळेल. 17जसे प्रभू बोलतात तसा मी बोलत नाही, परंतु माझ्या स्वविश्वासाच्या प्रौढीमध्ये मूर्खपणाने बोलतो. 18देहाला अनुसरून अनेक लोक प्रौढी मिरवितात, मग मी सुद्धा प्रौढी मिरवीन. 19तुम्ही फार शहाणे आहात म्हणून तुम्ही मूर्खांचे आनंदाने सहन करून घेता. 20खरे पाहता, जे तुम्हाला गुलाम बनवितात किंवा तुमचे हिरावून घेतात किंवा गैरफायदा घेतात, स्वतःस उच्च करतात किंवा तुमच्या तोंडात चापट मारतात, तरी तुम्ही या गोष्टी सहन करून घेता. 21मला सांगावयास लाज वाटते की याबाबतीत आम्ही दुर्बल आहोत!
जर कशाबद्दल कोणी गर्व करण्याचे धैर्य करीत असेल तर मला देखील गर्व करण्याचे धैर्य होईल. हे मी पुन्हा मूर्खासारखा बोलत आहे. 22ते इब्री आहेत का? तर मी पण आहे. ते इस्राएली आहेत का? मग मी देखील आहे. ते अब्राहामाचे संतान आहेत ना? मग, मी देखील आहे. 23ते ख्रिस्ताचे सेवक आहेत ना? मी अधिक आहे. असे मी वेड्यासारखे बोलतो! अधिक श्रम केले आहे, वारंवार तुरुंगात पडलो आहे, तीव्र फटके खाल्ले आणि अनेक वेळा मृत्यूला तोंड दिले. 24यहूद्यांनी पाच वेळेला एक कमी चाळीस फटक्यांची मला शिक्षा दिली. 25तीन वेळा मला छड्यांनी मारण्यात आले. एकदा मला धोंडमार झाला. तीन वेळा माझे तारू फुटले, एक रात्र आणि एक दिवस मी समुद्रात घालविला. 26मी सतत प्रवास केले आहेत आणि नद्यांची संकटे, लुटारूंची संकटे, यहूदी लोकांची संकटे, गैरयहूदी लोकांची संकटे, शहरातील संकटे, गावातील संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या विश्वासणार्‍यांपासून संकटे. 27मी श्रम व कष्ट केले आणि अनेकदा झोपेशिवाय राहिलो आहे. अनेक वेळा मी उपाशी व तान्हेला होतो; पुष्कळदा भोजनाशिवाय राहिलो आहे; मी थंडीने कुडकुडलो व नग्न होतो. 28मग याव्यतिरिक्त, दररोज सर्व मंडळ्यांच्या चिंतेचे ओझे माझ्यावर आहे. 29जर कोणी अशक्त आहे, तर मला अशक्तपणा जाणवत नाही का? कोणी पापात अडखळविला गेला, तर त्याचे मला दुःख होणार नाही काय?
30जर मला अभिमान मिरवायचा असेल, तर ज्या गोष्टींमध्ये माझा दुबळेपणा दिसून येतो त्यांचा मी अभिमान मिरवीन. 31परमेश्वर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता, ज्यांची युगानुयुग स्तुती असो, त्यांना ठाऊक आहे की मी लबाडी करीत नाही. 32उदाहरणार्थ, दिमिष्क शहरात अरीतास राजाच्या राज्यपालाने मला पकडण्यासाठी वेशींमध्ये पहारे बसविले होते; 33परंतु मला एका टोपलीत बसविले ती टोपली शहराच्या भिंतीच्या एका झरोक्यातून खाली सोडण्यात आली आणि अशा रीतीने मी तिथून निसटलो.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in