12
पौलाला झालेला दृष्टान्त व त्याचा काटा
1मी प्रौढी मिरवित जाणारच. यामुळे काही निष्पन्न होणार नाही, तरी प्रभूपासून मला जे दृष्टान्त आणि प्रकटीकरणे झाली; त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगत जातो. 2मला एक मनुष्य ख्रिस्तामध्ये माहीत आहे, त्याला चौदा वर्षांपूर्वी तिसर्या स्वर्गात वर उचलून नेण्यात आले होते. तो शरीराने किंवा शरीराविरहित मला ते माहीत नाही; परमेश्वराला माहीत आहे. 3आणि मला माहीत आहे की हा मनुष्य शरीराने किंवा शरीराविरहित हे मला माहीत नाही, परमेश्वराला माहीत आहे, 4स्वर्गामध्ये घेतला गेला, आणि ज्या गोष्टींचे वर्णन करून सांगता येणार नाही अशा गोष्टी ऐकल्या. त्या गोष्टी दुसर्यांना सांगण्याची परवानगी नाही. 5मी अशा मनुष्याबद्दल प्रौढी मिरवीन, मी स्वतःबद्दल तर नाही, परंतु फक्त माझ्या दुबळेपणाची प्रौढी मिरवीन. 6मी प्रौढी मिरवावी असे ठरविले तर तसे केल्याने मी मूर्ख ठरणार नाही, कारण मी सत्य बोलत आहे, परंतु मी तसे करणार नाही. कारण मी करतो व बोलतो त्यापेक्षा कोणीही मला जास्त मानू नये, अशी माझी इच्छा आहे. 7मला झालेल्या श्रेष्ठ प्रकटीकरणांमुळे मी फुगून जाऊ नये व बढाया मारू नये म्हणून मला शारीरिक काटा देण्यात आला आणि सैतानाचा दूत त्रास देण्याकरिता ठेवण्यात आला. 8मी प्रभूला तीन वेळा हे माझ्यापासून काढून घ्यावे म्हणून विनंती केली. 9त्यांनी म्हटले, “माझी कृपा तुला पूर्ण आहे. कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते.” कारण माझ्या अशक्तपणाबद्दल मी प्रौढी मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर राहील. 10ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान व कष्ट, छळ व अडचणी, याविषयी मी अगदी संतुष्ट आहे; कारण जेव्हा मी अशक्त आहे, तेव्हाच मी सबळ असतो.
पौलाची करिंथकरांबद्दलची आस्था
11अशा रीतीने प्रौढी मिरवायला लावून, मी स्वतःला मूर्ख बनविले आहे आणि तुम्ही मला तसे वागायला भाग पाडले आहे. खरेतर तुम्ही माझी प्रशंसा करावयास पाहिजे होती, जरी मी तुच्छ असलो तरी त्या “उच्च प्रेषितांच्या” तुलनेत मी कमी नाही. 12मी तुमच्याबरोबर राहत असताना मी निश्चित प्रेषित आहे, याचा पुरावा धीराने तुमच्यामध्ये अनेक चमत्कार, चिन्हे आणि महत्कृत्ये केली यामधून दिसून येते. 13मी माझे ओझे तुमच्यावर टाकले नाही तर इतर मंडळ्यांच्या तुलनेत कोणत्या गोष्टीत तुम्ही कमी भरला? या चुकीबद्दल तुम्ही मला कृपा करून क्षमा करा!
14आता मी तिसर्यांदा तुमच्या भेटीला येण्याची तयारी करत आहे; आणि मी तुम्हावर ओझे होणार नाही, कारण मला तुमची संपत्ती नको परंतु तुम्ही हवे आहात. तसे पाहिले तर, मुलांनी आपल्या आईवडिलांसाठी संचय करण्याची गरज नाही तर उलट आईवडिलांनीच आपल्या मुलांसाठी करावे. 15मी तुम्हासाठी जे काही आहे ते आनंदाने सर्व खर्च करण्यासाठी तयार आहे आणि मला स्वतःसही खर्च करण्यास तयार आहे. जर मी तुमच्यावर अधिक प्रीती करतो, तर तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता का? 16काही असो, मी तुमच्यावर ओझे झालो नाही. तरीही, मी धूर्त आहे आणि मी आपल्याला फसविले असे तुम्हाला वाटते का? 17ज्या लोकांना मी तुमच्याकडे पाठविले त्यांच्याद्वारे मी तुमचा गैरफायदा घेतला का? 18तीताला मी विनंती करून तुमच्या भेटीला पाठविले आणि त्याच्याबरोबर आमच्या भावाला पाठविले, तीताने तुमचा गैरफायदा घेतला का? कारण आम्ही एकाच आत्म्याच्या सारख्याच पावलांवर पाऊल टाकून चाललो नाही का?
19आम्ही स्वतःच्या बचावासाठी हे करतो असे तुम्हाला वाटते का? आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्याशी बोलत आहोत. प्रिय मित्रांनो, जे काही आम्ही करतो ते तुमच्या वृद्धीसाठी आहे. 20कारण मला अशी भीती वाटते की जेव्हा मी येईन, तेव्हा तुम्ही मला जसे पाहिजे तसे आढळणार नाही, आणि जसा तुम्हाला पाहिजे तसा मी तुम्हाला आढळणार नाही. मला भीती वाटते की तुम्हामध्ये भांडणे, द्वेष, राग, स्वार्थी आकांक्षा, निंदा, चहाड्या, आढ्यता आणि अव्यवस्था यांनी भरलेले असे आढळाल. 21होय, मला वाटते की मी पुन्हा आलो की माझा परमेश्वर मला तुमच्यापुढे नम्र करेल आणि ज्या अनेकांनी पूर्वी पाप केलेले आहे आणि आपल्या हातून घडलेल्या अशुद्धता, लैंगिक पाप व कामातुरपणा, या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही त्याबद्दल मला दुःख करावे लागेल.