YouVersion Logo
Search Icon

2 करिंथकरांस 7

7
1यास्तव, आपल्याला अशी अभिवचने मिळाली आहेत, म्हणून प्रिय मित्रांनो देहाला व आत्म्याला अशुद्ध करणार्‍या सर्व गोष्टींपासून आपण स्वतःला शुद्ध करू या आणि परमेश्वराविषयी आदरयुक्त भय बाळगून आपल्या पवित्रतेला सिद्ध करू या.
मंडळीने पश्चात्ताप केल्याबद्दल पौलाला आनंद
2तुमच्या हृदयात आमच्यासाठी जागा करा. आम्ही कोणाविरुद्ध अन्याय केला नाही. आम्ही कोणालाही मार्गभ्रष्ट केले नाही किंवा कोणाचा गैरफायदा घेतला नाही. 3तुम्हाला दंडाज्ञा व्हावी म्हणून मी हे सांगत नाही, कारण मी पूर्वीच सांगितले आहे की तुम्हाला आमच्या हृदयात स्थान आहे आणि आम्ही जगू किंवा मरू तेव्हा तुमच्याबरोबर असू. 4मी अगदी मोकळेपणाने तुमच्याबरोबर बोलतो; मला तुमचा अतिशय अभिमान आहे. मी खूप उत्तेजित झालो आहे; आमच्या या सर्व दुःखात माझ्या आनंदाला कोणतीच सीमा उरली नाही.
5मासेदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक रूपात विसावा मिळाला नाही. आम्ही चहूकडून संकटात होतो; बाहेर कलह व आत भय होते. 6मग निराश झालेल्यांना सांत्वन देणार्‍या परमेश्वराने तीताच्या येण्याने आमचे सांत्वन केले. 7त्याच्या केवळ येण्याने नव्हे परंतु तुम्ही त्याचे जे सांत्वन केले त्यामुळेही, माझ्यासंबंधाने तुमची उत्सुकता, तुमचे अति दुःख, तुमची माझ्यावरील आस्था या सर्वगोष्टी त्याने मला सांगितल्या, तेव्हा माझा आनंद पूर्वीपेक्षाही ओसंडून वाहू लागला.
8जरी माझ्या पत्रामुळे मी तुम्हाला दुःख दिले याचे मला मुळीच वाईट वाटत नाही. याबद्दल निश्चितच मला दुःख झाले खरे, पण माझ्या पत्राने तुम्हाला थोडाच काळ दुःखी केले हे मी समजतो. 9तुम्हाला दुःखी केले म्हणून नव्हे, तर त्या दुःखाने तुम्ही पश्चात्तापाकडे वळलात म्हणून मला आनंद वाटतो. तुमचे दुःखी होणे हे परमेश्वराच्या इच्छेनुसार झाले आणि यामुळे आमच्यामुळे तुमची कोणतीही हानी झाली नाही. 10कारण दैवी दुःखाने पश्चात्ताप व त्याचा परिणाम तारण, परंतु ऐहिक दुःखाने मरण येते. 11या दैवी दुःखाने तुमच्यामध्ये काय उत्पन्न केले आहे ते पाहा: किती उत्सुकता, तुम्हाला स्वतः स्पष्ट करण्याची उत्कंठा, किती संताप, किती भय, किती तळमळ, किती आस्था, किती न्याय मिळावा अशी इच्छा आणि या प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःस निर्दोष असे सिद्ध केले आहे. 12मी तुम्हाला पत्र लिहिले ते, ज्याने चूक केली त्याच्यासाठी नव्हे आणि ज्याच्याविरुद्ध चूक केली त्यांच्यासाठी सुद्धा नव्हे, तर परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही किती समर्पित आहात हे स्पष्ट करण्यासाठी लिहिले. 13या सर्व गोष्टींद्वारे तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिले.
परंतु याहून अधिक आनंद आम्हाला मिळाला तो तीताच्या आनंदाने! कारण तुम्ही त्याच्या आत्म्याला ताजेतवाने केले. 14मला तुमच्याबद्दल केवढा अभिमान आहे, हे मी त्याला सांगितले होते आणि तुम्ही मला मुळीच निराश केले नाही. जे काही आम्ही तुम्हाला सांगितले ते सर्व खरे होते, तसेच मी तीतापुढे काढलेले तुमच्याबद्दलचे अभिमानाचे शब्दही खरे ठरले आहेत! 15ज्या रीतीने भयाने व थरथर कापत तुम्ही सर्वांनी आज्ञांकितपणा दाखवून त्याचा स्वीकार केला, या सर्वगोष्टी आठवून, तुमच्याविषयीची त्याची प्रीती अधिक वाढली आहे. 16तुमच्यावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो याचा मला आनंद आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in