YouVersion Logo
Search Icon

2 पेत्र 2

2
खोटे शिक्षक व त्यांचा नाश
1परंतु लोकांमध्ये सुद्धा खोटे संदेष्टे होते, तसेच तुमच्यामध्ये खोटे शिक्षक असतील, ते गुप्त रीतीने विध्वंसक पाखंडी मते प्रचारात आणतील, ज्याने त्यांना विकत घेतले अशा सार्वभौम प्रभूला नाकारतात आणि स्वतःवर आकस्मिक नाश ओढवून घेतील. 2पुष्कळजण त्यांच्या अनैतिक कृत्यांचे अनुकरण करतील व सत्याच्या मार्गाची त्यामुळे निंदा होईल. 3हे शिक्षक त्यांच्या लोभापायी बनावट गोष्टी सांगून तुमच्याकडून पैसे मिळवतील. त्यांच्यासाठी नेमलेला दंड दीर्घकाळापासून त्यांच्यावर लटकत आहे आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.
4कारण जर परमेश्वराने पाप करणार्‍या देवदूतांना राखले नाही, परंतु नरकात पाठविले, निबिड काळोखाच्या बंधनात न्यायासाठी अटकेत ठेवले. 5त्यांनी प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्त्वाचा संदेश देणारा नोआहचे सात जणांसह रक्षण केले. 6पुढे येणार्‍या अनीतिमानास उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्यांची राख केली व त्यांनी त्यांना विध्वंसाची शिक्षा केली. 7त्यांनी अनीतिमान लोकांच्या कामातुर वर्तनास दुःखी झालेल्या नीतिमान लोटाची सुटका केली, 8(कारण तो नीतिमान मनुष्य त्यांच्यामध्ये दिवसेंदिवस राहून त्यांची अधर्मी कृत्ये पाहून व ऐकून त्याचा नीतिमान जीव तीव्र दुःखी झाला होता.) 9नीतिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. 10विशेषकरून अशा लोकांसाठी हे खरे आहे जे देहाच्या भ्रष्ट अभिलाषांच्या मागे लागतात आणि अधिकारास तुच्छ मानतात.
धाडसी आणि उद्धट असून ते स्वर्गीय प्राण्यांची निंदा करण्यास घाबरत नाहीत; 11स्वर्गातील देवदूत अधिक समर्थ आणि बलवान आहेत तरीसुद्धा प्रभूकडून अशा प्राण्यांचा न्याय होत असताना ते त्यांची निंदा करीत नाहीत. 12परंतु हे लोक जे काही त्यांना समजत नाही त्या गोष्टींविषयी निंदा करीत असतात. ते उपजत निर्बुद्ध प्राणी पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या पशूंसारखे स्वतःचा सुद्धा नाश करून घेतील.
13त्यांनी केलेल्या हानीचे प्रतिफळ त्यांच्या पदरी पडेल. दिवसाच्या प्रकाशात चैनबाजी करण्यात ते आनंद मानतात, ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर मेजवान्या करताना ते फसवेगिरीने वागतात व त्यात त्यांना मौज वाटते. 14त्यांच्या नजरेत व्यभिचार भरला असून पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात. त्यांची हृदये लोभात निर्ढावलेली असतात; ते शापग्रस्त लोक आहेत! 15ते सरळ मार्ग सोडून बहकले आहेत आणि दुष्टपणाचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलामच्या मार्गाने गेले आहेत. 16परंतु त्याच्या अयोग्य कृत्याबद्दल गाढवाद्वारे त्याचा निषेध करण्यात आला. मुक्या गाढवाने मनुष्यवाणीने बोलून संदेष्ट्याच्या वेडेपणाला आळा घातला.
17हे लोक कोरड्या झर्‍यांसारखे, वादळाने उडविलेल्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यासाठी काळाकुट्ट अंधार राखलेला आहे. 18कारण जेव्हा चुकीने वागणार्‍या लोकांमधून कोणी बाहेर पडले असतील, त्यांना हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या फुगीर गोष्टी बोलून आणि देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भुरळ घालतात. 19हे त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात जेव्हा ते स्वतःच दुष्टतेचे दास आहेत, कारण “लोक ज्याच्या अधिकारात आहेत, ते त्याचे दास आहेत.” 20प्रभू व तारणारा येशू ख्रिस्तांच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जर पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते. 21नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे यापेक्षा तो मार्ग त्यांना माहीत झालाच नसता, तर ते त्यांच्यासाठी बरे झाले असते. 22अशा लोकांसाठी या म्हणी खर्‍या आहेत: “कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो,”#2:22 नीती 26:11 आणि “धुतलेली डुकरीण तिच्या चिखलात लोळण्यास परत जाते,” अशा म्हणींप्रमाणे त्यांची गत झालेली असते.

Currently Selected:

2 पेत्र 2: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in